नैसर्गिक आपत्तीचे भान ठेवून दहिहंडीचे आयोजन

Mumbai
MNS's Dombivali Dahihandi canceled for flood victims
दहिहंडी

दहिहंडीच्या उत्सवासाठी वर्षभर तरूणाई मेहनत घेत असते. या सणाकडे अनेक मंडळे डोळे लावून बसलेले असतात. पण कोल्हापूर, सांगली याठिकाणी उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक दहिहंडी आयोजकांनी यंदाचे कार्यक्रम रद्द केले आहेत. पूरग्रस्तांना मदत करतानाच दहिहंडी उत्सवाचेही आयोजन व्हायला हवे. या परिस्थितीत सुवर्णमध्य काढून उत्सव साजरा करण्याची विनंती दहिहंडी समन्वयक समितीने केली आहे.

सद्यस्थितीला अनेक दहिहंडी मंडळांकडून पूरग्रस्त भागातील जनतेसाठी मदतीचा ओघ सुरू झाला आहे. समन्वय समितीही आपल्यापरीने मदत करणार आहे. त्यासाठी मुळात उत्सव साजरा होणे गरजेचे आहे,असे मत समन्वय समितीचे सचिव सुरेंद्र पांचाळ यांनी मांडले. यंदाच्या दहिकाल्याच्या उत्सवात सुरक्षित आयोजनाची सर्वस्वी काळजी घेण्याची जबाबदारी ही सगळ्यांची आहे. दहिहंडी पथकाने पोलीस आणि वाहतूक अधिकारी यांना सर्वतोपरी मदत करणे गरजेचे आहे. गोविंदांच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, हार्नेस बेल्ट, चेस्ट गार्ड आणि प्रोटेक्टर इत्यादी गोष्टींची पुर्तता सुरक्षिततेच्या दृष्टीने होणे गरजेचे आहे.

जितक्या थरांचा सराव केला आहे तितकेच थर लावावेत अशी मागणी त्यांनी केली आहे. हायकोर्टाच्या आदेशानुसार प्रत्येक गोविंदाचा १० लाख रूपयांचा विमा दहिहंडी पथकाने काढणे गरजेचे आहे. समन्वय समितीकडे ७०० हून अधिक मंडळांनी आतापर्यंत नोंदणी केली आहे. त्यापैकी अनेक मंडळांनी विम्यासाठीची नोंदणी केली आहे, असे पांचाळ यांनी सांगितले.

कोर्टाच्या आदेशाचे पालन
हायकोर्टाच्या आदेशानुसार 14 वर्षार्ंखालील मुलांना दहिहंडी उत्सवामध्ये सहभागी करून घेण्यासाठी मज्जाव आहे. या आदेशाचे काटेकोरपणे पालन करणे मंडळांकडून गरजेचे आहे. त्यासाठीच गोविंदा पथकातील बालगोविंदाचे जन्माचा दाखला तपासण्यात येणार आहे.