अनाथ मुलांनीही साजरी केली भाऊबीज

Mumbai
अनाथ मुलांची भाऊबीज
दीपस्तंभ फाऊंडेशनतर्फे भाऊबीज साजरी करण्यात आली. (फोटो - दीपक साळवी)

दिवाळी हा सण आनंदाचा… भरभराटीचा आणि उत्साहाचा. दिवाळी म्हटलं की कुटुंबात एकच जल्लोष असतो. लहान थोरांपासून सर्वांमध्येच एक चैतन्याचे वातावरण असते. मात्र ज्यांचे कुटुंबच नाही, त्यांची दिवाळी कशी असते? असा प्रश्न जर तुम्हाला विचारला तर त्याचे उत्तर देता येणार नाही. कारण कुटुंबाशिवाय दिवाळी साजरी करण्याला अर्थच नाही. हीच पोकळी ओळखली दीपस्तंभ फाऊंडेशन या संस्थेने आणि जन्म झाला एका आगळ्यावेगळ्या उपक्रमाचा. यावर्षी दीपस्तंभच्या पुढाकाराने ३८ अनाथ मुला-मुलींनी दिवाळी आणि भाऊबीज साजरी केली आहे.

काय आहे हा उपक्रम

दीपस्तंभ फाऊंडेशन मुंबईत मागच्या ११ वर्ष तर पुण्यात १८ वर्षांपासून अनाथ मुलांना दिवाळीचा आनंद देण्याचा प्रयत्न करत आहे. यावर्षी मुंबईत विक्रमगड, जव्हार, वाडा, मोखाडा आणि उस्मानाबाद येथून आत्महत्याग्रस्त कुटुंबाची किंवा इतर कारणांमुळे अनाथ झालेल्या ३८ मुलांना दोन दिवस मुंबईत आणून त्यांचा दिवाळीनिमित्त पाहुणचार केला गेला. दीपस्तंभाच्या पुढाकाराने मालाड, शिवडी, वरळी येथील २० कुटुंबांनी या मुलांच्या राहण्याची व्यवस्था स्वतःकडे केली होती.

तब्बल दोन दिवस या मुलांचा मुक्काम या कुटुंबात असतो. याचा प्रामुख्याने उद्देश असा की, या मुलांना कुटुंब व्यवस्थेचा परिचय व्हावा. पालकांचे छत्र हरपल्यामुळे यांना कुटुंब वात्सल्याचा आनंद मिळत नाही. नात्यामधले प्रेम, माया, जिव्हाळा काय असतो? तो कळत नाही. सणावारात घरात काय परंपरा पाळावी लागते, याचा विसर पडलेला असतो. आपल्या सण-संस्कृतीचे धडे त्यांनी पुन्हा गिरवावेत यासाठी दीपस्तंभतर्फे त्यांना दरवर्षी दिवाळीनिमित्त विविध कुटुंबाचा पाहुणचार घडवून आणले जाते.

यावर्षी उस्मानाबाद जिल्ह्याच्या यमगर वाडी प्रकल्पाच्या एकलव्य आश्रमशाळेतील २० मुले मुंबईत आले आहेत. आश्रमशाळेतील मुलांची संख्या जास्त आहे. मात्र प्रातिनिधिक स्वरुपात २० मुले आली आहेत. मात्र त्यांच्यासोबत जाताना शाळेतील इतर सर्व मुलांसाठी शालेय वस्तू देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे फाऊंडेशनचे राजू गिजरे यांनी सांगितले. मुबंईत आणल्यावर आम्ही मुलांची सर्वात आधी वैद्यकिय तपासणी करुन घेतो. त्यानंतर त्यांना ठरलेल्या कुटुंबात मुक्कामाची व्यवस्था केली जाते. वेळात वेळ काढून त्यांना सहलीलाही घेऊन जातो. भाऊबीज मात्र दरवर्षी साजरी सामुदायिक पद्धतीने साजरी केली जाते, अशी माहिती गजरे यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here