रस्ते दुरुस्तीसाठी पागोटे ग्रामस्थांचा सिडकोवर मोर्चा

१५ दिवसात काम करण्याचे आश्वासन

Mumbai

द्रोणागिरी नोडमधील रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करावी यासाठी पागोटे ग्रामस्थांनी सिडकोच्या विरोधात गुरुवारी मोर्चा काढला होता. आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी सिडको कार्यालयाबाहेर धरणे धरून जोरदार घोषणाबाजी केली. कार्यकारी अभियंता भगवान साळवे यांनी 15 दिवसांत हे रस्ते दुरुस्त केले जातील, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

सिडको हद्दीतील द्रोणागिरी नोडमधील नवघर ते एपीएम टर्मिनल रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, धुळीचे साम्राज्य पसरले आहे. या मार्गावर नेहमी कंटेनर, ट्रेलरसारख्या अवजड वाहनांची मोठी वाहतूक असते. त्यामुळे तेथून प्रवास करणे ग्रामस्थांना अवघड झाले आहे. शाळेतील मुले, कामगार यांना यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. हे रस्ते दुरुस्त करावे यासाठी सिडकोला अनेक वेळा निवेदने देण्यात आली होती. मात्र सिडको प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत होते. अखेर ग्रामस्थांनी सरपंच भार्गव पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला होता. पोलिसांनी हा मोर्चा सिडको कार्यालयाच्या प्रवेश द्वारावर अडविल्यानंतर ग्रामस्थांनी धरणे धरले. अखेर कार्यकारी अभियंता साळवे यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस मेघनाथ तांडेल आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.