घरदेश-विदेशपाकिस्तानचे एफ-१६ विमान पाडले

पाकिस्तानचे एफ-१६ विमान पाडले

Subscribe

पाकिस्तानच्या हवाई दलाचे ’एफ-१६’ विमान भारताने त्यांच्याच हद्दीत पाडले. या विमानाने भारतीय हद्दीत घुसून सीमा भागात बॉम्ब फेकले होते. पाकिस्तान सीमेच्या आत ३ किलोमीटर अंतरावर हे विमान पाडल्याची माहिती आहे. पाकचे हे विमान पडताना दिसले, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी सांगितले.रवीशकुमार आणि एअर व्हाईस मार्शल आर. जी. के. कपूर यांनी बुधवारी येथे संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यात रवीशकुमार म्हणाले की, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी भारतात अजून आत्मघाती दहशतवादी हल्ले करणार असल्याची सबळ पुरावे भारताला मिळाले होते. त्यामुळे भारताने जैश-ए-मोहम्मदच्या प्रशिक्षण तळांवर दहशतवादविरोधी कारवाई केली. त्याला बधुवारी पाकिस्तानने त्यांच्या हवाई दलाच्या मदतीने प्रत्युत्तर देताना भारतीय लष्करी तळांवर बॉम्बफेक केली. मात्र सतर्कता आणि तयारीमुळे पाकिस्तानचा हा प्रयत्न भारताने परतून लावला. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही दलाच्या प्रमुखांशी बैठक घेत देशाच्या संरक्षण सिद्धतेची माहिती घेतली.

पाकिस्तानी हवाई दलाची विमाने तत्परतेने शोधून भारतीय हवाई दलाने त्वरीत कारवाई केली. या हवाई लढाईत एक पाकिस्तानी हवाई दलाचे विमान, भारतीय मिग-२१ विमानांनी पाडले. पाकिस्तानी विमान आकाशातून पाकिस्तानच्या बाजूला कोसळताना पायदळाने पाहिले, असे रवीशकुमार म्हणाले.

- Advertisement -

मंगळवारी भारताने बाळाकोट येथील जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांच्या तळावर हवाई हल्ला केला होता. त्यानंतर बुधवारी सकाळी पाकिस्तानी एफ-१६ विमानांनी काश्मीरमध्ये राजौरी भागात भारताच्या हद्दीत बॉम्बफेक केली. मात्र भारतीय हवाई दल सतर्क असल्यामुळे भारतीय लढाऊ विमानांनी पाकिस्तानच्या एफ-१६ विमानांना चोख प्रत्युत्तर दिले. या लढाईत भारतीय मिग-२१ विमानांनी पाकिस्तानचे एक एफ-१६ विमान पाडण्यात भारताला यश आले आहे. जम्मू-काश्मीरच्या राजौरी भागात पाकिस्तानने टाकलेल्या बॉम्बचे काही तुकडे लष्कराच्या तळाजवळ सापडले आहेत. त्याची छायाचित्रेही वृत्तसंस्थांनी प्रदर्शित केली आहेत.

अरबी समुद्रात दक्षतेचा इशारा

पुलवामातील आत्मघातकी हल्ल्यानंतर पाकिस्तानला अद्दल घडवण्यासाठी पाकव्याप्त काश्मीरमधील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या अड्ड्यांवर भारतीय हवाईदलाने केलेल्या हल्ल्याचे पडसाद मुंबईच्या सुरक्षेत उमटू नयेत यासाठी नौदलाने मुंबईच्या समुद्रात हायअलर्ट जारी केला आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईकडे वक्रनजर असलेल्यांकडून या शहरावर हल्ला होऊ शकतो, अशी शक्यता गुप्तचर संघटनांनी वर्तवल्यानंतर मुंबई बंदरातील सुरक्षा अधिक सतर्क करण्यात आली आहे. नौदलाने आपली स्वतंत्र पेट्रोलिंग सुरू केली आहेच. पण सागरी पोलीस, सीमा सुरक्षा दलालाचीही गस्त वाढवण्यात आली आहे.

- Advertisement -

या यंत्रणांबरोबरच केंद्रिय औद्योगिक सुरक्षा दलाचीही गस्त ठेवण्यात आली आहे. समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मच्छिमारांनी कुठल्याही संशयास्पद गोष्ठीची तात्काळ माहिती द्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

पाकव्याप्त काश्मीरमधील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी सोमवारी मध्यरात्री वायूदलाने पुकारलेल्या धडक कारवाईच्या पार्श्वभूमीवर सार्‍या देशभर दक्षतेचा इशारा दिला आहे. विशेषत: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईकडे वक्रदृष्टीने पाहण्याच्या पाकिस्तानच्या आजवरच्या कुरापतीची दखल घेत शहर आणि शहरालगतच्या सर्वच प्रकल्पांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. भाभा अणुशक्ती केंद्र, आरसीएफ खत कारखाना, चेंबूरचा तेल शुध्दीकरण कारखाना, बुचर बेटावरील तेल साठे असे अत्यंत महत्त्वाचे प्रकल्प मुंबईच्या समुद्र किनार्‍यावर आहेत. याशिवाय उरण येथील नौदल शस्त्रागार, ओएनजीसीचे तेल आणि वायूचे साठे, वायूधारीत ऊर्जा प्रकल्प, गॅस बॉटलिंग प्रकल्प आणि जवाहरलाल नेहरू बंदर हे प्रकल्प अरबी समुद्राला थेटून उभे आहेत.

यापैकी एका जरी प्रकल्पाला धक्का पोहोचला तरी देशाला मोठ्या आपत्तीला सामोरे जावे लागेल. हे लक्षात घेऊन शस्त्रागारासह सगळ्याच प्रकल्पांची सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. यातील बहुतांश प्रकल्पांची सुरक्षा ही केंद्रिय औद्योगिक सुरक्षा दलाकडे आहे. अरबी समुद्राला थेटूनच हे प्रकल्प असल्याने समुद्रातील सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. मुंबईच्या समुद्राची गस्त नौदलाच्या हाती असून, विमानवाहू आणि क्षेपणास्त्राने सज्ज असलेली जहाजे बंदर सीमेवर तैनात करण्यात आली आहेत. मासेमारीसाठी समुद्रात रवाना झालेल्या मच्छीमारांना संशयास्पद हालचालींची माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासंबंधीच्या सूचना किनार्‍यावरील अधिकार्‍यांना घेण्यास मेरिटाईम बोर्डाने सांगितले आहे. नव्याने समुदात जाऊ पाहणार्‍या मच्छीमारी बोटींना अटकाव घालण्यात आला आहे.

नौदलाच्या विशेष गस्तीबरोबरच सीमा सुरक्षा, सागरी पोलीस यांची संयुक्त गस्तही वाढवण्यात आली आहे. समुद्रातून शहरात येणारे सगळे मार्ग सील करण्यात आले असून, शहरात येणार्‍यांची कसून चौकशी केली जात आहे. नेहरू बंदरासह ओएनजीसी, आरसीएफ आणि तेल शुध्दीकरण कारखान्यात केंद्रिय औद्योगिक सुरक्षा दलाची यंत्रणा तैनात आहे. या सुरक्षा दलाची स्वतंत्र गस्त अरबी समुद्रात तैनात ठेवण्यात आली आहे.

नेव्हल वेस्टर्न कमांड सतर्क
अरबी समुद्रातील सुरक्षेची जबाबदारी नौदलाच्या वेस्टर्न कमांडकडे आहे. वेस्टर्न कमांडच्यावतीने अरबी समुद्राची सुरक्षा सातत्याने राखली जाते. नियत परिस्थितीत यात बदल होण्याचा प्रश्नच नाही. आमची यंत्रणा २४ तास सतर्क आहे. सार्‍या तयारीने आमचे जवान गस्तीवर आहेत.
– नरेंद्र विस्पुते, पीआरओ, नौदल वेस्टर्न कमांड

औद्योगिक सुरक्षाही तैनात
जवाहरलाल नेहरू बंदराच्या सुरक्षेची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्या केंद्रिय औद्योगिक सुरक्षा दलाची स्वतंत्र गस्त समुद्रात तैनात करण्यात आली आहे. बंदराच्या सुरक्षेबरोबरच समुद्रातील सुरक्षाही महत्वाची असल्याने ती अधिक सतर्क करण्यात आली आहे.
– दिनेश पाटील, विश्वस्त, जवाहरलाल नेहरू बंदर

२७०० कोटींच्या शस्त्रला खरेदीला मंजुरी

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या कारवाईनंतर घडामोडींना वेग आला आहे. सीमेवर युद्धजन्य परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 2700 कोटींच्या शस्त्र खरेदीला तातडीने मंजूरी दिली आहे. नवी दिल्लीत पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीदरम्यान संरक्षण साहित्य खरेदीला मंजुरी देण्यात आली. दिल्लीत केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत 2700 कोटी किंमतीचे संरक्षण साहित्य खरेदी करण्यास तातडीने मंजुरी देण्यात आली.

भारतीय नौसेनेसाठी तीन कॅडेट प्रशिक्षण युद्धनौका खरेदी करण्यात येणार आहेत. या युद्धनौकेच्या माध्यमातून महिला अधिकार्‍यांसह कॅडेट अधिकार्‍यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ही युद्धनौका चिकित्सा सेवा, मनुष्य सहाय्यता आणि आपत्कालीन मदत देण्यासाठी सक्षम आहे. तसेच युद्धनौकेद्वारे बचावकार्य आणि सर्च ऑपरेशन राबवता येणार आहे. राजस्थानातल्या गंगानगर जिल्ह्याला लागून असलेल्या पाकिस्तानमधील सीमारेषेत पाकिस्तानने सैन्यबळ वाढवलं आहे

तसेच बिकानेरच्या जवळपासच्या भागातील सैन्याच्या हालचाली तीव्र झाल्या आहेत. पाकिस्तानने सिंध भागातील तीन मोठ्या एअरबेसवरून लढाऊ विमानांची उड्डाणे वाढवली आहेत. ज्यात कराचीहून जेएफ 17 थंडर, शाहबाजमधून एफ 16 आणि न्यू छोर एअरबेसमधून एफ 16सारख्या लढाऊ विमानांनी भरारी घेतली आहे. पाकिस्तानातील नियंत्रण रेषेतील 10 किलोमीटर आतपर्यंत हवाई क्षेत्रात लढाऊ विमाने सराव करत आहेत. तसेच बहावलपूरमधील पाकिस्तानी सैन्याच्या 31 कोरच्या इन्फ्रंट्री, मॅकेनाइज्ड व आर्म्ड फोर्सेसचीही ये-जा वाढली आहे. नियंत्रण रेषेवरही वातावरण शांत आहे.

हेलिकॉप्टर अपघातात नाशिकचे मांडवगणे शहीद

श्रीनगरनजिक बुधवारी झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात नाशिकमधील पायलट निनाद मांडवगणे शहीद झाले. लखनौला राहणार्‍या निनाद यांनी दोनच दिवसांपूर्वी आपल्या मुलीचा वाढदिवस साजरा केला होता. त्यासाठी नाशिकमधून त्याचे आई-वडीलही गेले होते.

नाशिकच्या डीपीजीनगरातील स्टेट बँक ऑफिसर्स कॉलनीमध्ये राहणार्‍या निनाद मांडवगणे हे औरंगाबादमधील सैनिकी सेवा पूर्व प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून हवाईदलात भरती झाले होते. त्यांची नियुक्ती काश्मीरमधील श्रीनगर भागात होती. बुधवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास त्यांचे हेलिकॉप्टर श्रीनगर भागात कोसळल्याचे हवाईदल सूत्रांनी सांगितले. या अपघातात त्यांच्यासमवेत अन्य पाच सहकारीदेखील शहीद झालेत. नाशिकचे निनाद औरंगबादच्या सैनिकी सेवा पूर्व संस्थेच्या (एसपीआय) २६ व्या कोर्सचे माजी विद्यार्थी होते. तेथून त्यांची निवड पुणे येथे एनडीएमध्ये झाली. त्यानंतर ते हेलिकॉप्टर पायलट झाले. निनाद यांची पत्नी लखनौ येथे राहते. दोनच दिवसांपूर्वी त्यांच्या मुलीचा वाढदिवस कुटुंबाने साजरा केला. लष्कराकडून मात्र अधिकृत प्रतिक्रीया आलेली नाही.

पाकच्या गोळीबारानंतर भारताचा काऊंटर अ‍ॅटॅक

पाकिस्तानातील दहशतवादी शिबिरांवर भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तान बिथरला आहे. त्याने नियंत्रण रेषेलगत भारतीय लष्कराच्या चौक्यांवर गोळीबार सुरू केला आहे. त्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले असून पाकिस्तानी लष्कराच्या पाच चौक्या उद्ध्वस्त केल्या आहेत. या कारवाईत पाकिस्तानचे अनेक सैनिक जखमी झाल्याचे भारतीय लष्करी अधिकार्‍याने सांगितले.जम्मू-काश्मीरमधील राजौरी आणि पुंछ जिल्ह्याजवळील नियंत्रण रेषेलगत असलेल्या क्षेत्रात हा गोळीबार करण्यात आला. सोमवारी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमाराला पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार सुरू केला. या हल्ल्यात पाकिस्तानी सैन्याने सामान्य नागरिकांचा आपल्या बचावासाठी उपयोग केल्याची माहिती लष्कराने दिली.

पाकिस्तानी सैनिकांनी सीमाभागात राहणार्‍या लोकांच्या घरांमधून मोर्टार आणि मिसाईल डागल्याचे पाहिले गेल्याचेही अधिकारी म्हणाला. मात्र, भारतीय जवानांनी प्रत्युत्तर देताना पाकिस्तानी नागरिकांच्या वस्त्यांपासून दूर असणार्‍या पाकिस्तानी चौक्यांना लक्ष्य केले. यामुळे अनेक पाकिस्तानी सैनिक जखमी झाले. दोन्ही बाजूंच्या गोळीबारात ५ भारतीय सैनिकही किरकोळ जखमी झाले आहेत. यांपैकी दोघांना उपचारासाठी लष्कराच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

चिठ्ठी येताच नरेंद्र मोदी भाषण सोडून निघाले

भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला असून बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील विज्ञान भवन येथील एक कार्यक्रम अर्धवट सोडून निघाले. भाषण सुरु असताना नरेंद्र मोदी यांना सुरक्षा रक्षकाने एक चिठ्ठी आणून दिली आणि यानंतर मोदी भाषण आवरते घेत तिथून निघून गेले. मोदींनी अशा पद्धतीने कार्यक्रम अर्धवट सोडल्याने तर्कवितर्कांना उधाण आले होते.

बुधवारी सकाळी पाकिस्तानच्या एफ-१६ विमानांनी नियंत्रण रेषा ओलांडून भारताच्या हद्दीत बॉम्बफेक केली. या पार्श्वभूमीवर दिल्लीत वरिष्ठ पातळीवर बैठकांचे सत्र सुरु झाले होते. सकाळी संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन आणि तिन्ही दलांच्या प्रमुखांची बैठक झाली. यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे उपस्थित होते. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विज्ञान भवन येथे युवा सांसद पुरस्कार प्रदान सोहळ्यात उपस्थित होते. मोदी उपस्थितांना संबोधित करत असताना त्यांना सुरक्षा रक्षकाने एक चिठ्ठी आणून देताच मोदींनी भाषण आवरतं घेतले आणि एका बैठकीसाठी निघून गेले.

पायलट वर्थमानला सुखरूप परत करा

पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय पायलट अभिनंदन वर्थमान यांना तात्काळ आणि सुखरूपपणे भारताच्या हवाई करण्यात यावे, अशा स्पष्ट शब्दांत भारताने पाकला बजावले आहे. पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय पायलटला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची हमी पाकने द्यायला हवी. भारतीय पायलटचा जखमी अवस्थेतील फोटो पाककडून जारी करण्यात आला आहे. यावर भारताने तीव्र आक्षेप घेतला आहे. हे सरळसरळ आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्याचे आणि जिनेव्हा परिषदेतील ठरावाचे उल्लंघन आहे, असे भारताने पाकला बजावले आहे.

मुंबई हायअलर्टमुळे अधिवेशन गुंडाळणार?

भारत आणि पाकिस्तान सीमा रेषेवरील तणावपूर्ण वातावरणामुळे मुंबईत देखील हाय अलर्ट जारी करण्यात आला असून अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे अजून ३ दिवस शिल्लक असताना ते गुरूवारीच गुंडाळण्याची शक्यता आहे. यापूर्वी २ मार्चपर्यंत अधिवेशन चालणार होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपक्षीय बैठक गुरूवारी बोलावली असून या बैठकीत अधिवेशनाचा कार्यकाल लवकर गुंडाळण्याचा निर्णय घेतला जाईल. पाकिस्तानी विमानांनी भारतीय हद्दीत केलेल्या घुसखोरीच्या पार्श्वभूमीवर मुंबईवरील सुरक्षा व्यवस्थेवरचा ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला जाईल असे समजते. यासंदर्भात बुधवारी मुंबईतल्या पोलीस अधिकार्‍यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विधिमंडळ सुरू असल्याने बंदोबस्तासाठी सुमारे ६ हजार पोलीस तैनात केल्याची माहीती मुख्यमंत्र्यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईला हायअलर्टचा इशारा दिल्यानंतर सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी विधानभवनात बुधवारी तातडीची एक बैठक बोलावली होती. या बैठकीला पोलीस महासंचालक दत्तात्रय पडसळगीकर, पोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल, अतिरिक्त पोलीस महासंचालक परमवीर सिंग वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. फडणवीस यांनी सर्व पोलीस अधिकार्‍यांकडून राज्यातील व मुंबईतील सुरक्षेचा आढावा घेत सर्वांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

भारतीय हवाई दलाने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यानंतर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसह राज्याला अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. या संबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीची बैठक बोलावून राज्याच्या सुरक्षिततेचा आढावा घेतला असून सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याची सूचना सुरक्षा यंत्रणेला देण्यात आली आहे. या बैठकीत सुरक्षा यंत्रणेतील अधिकार्‍यांसह राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर आणि मुंबईचे पोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल हजर होते. दहशतवादी संघटनेच्या निशाण्यावर असणार्‍या मुंबई शहराच्या सुरक्षिततेसाठी हवाई दल आणि सागरी सुरक्षा यंत्रणा, रेल्वे यंत्रणेला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत पोलीस नाकाबंदीत वाढ करण्यात आली असून धार्मिक स्थळे, विमानतळ आदी ठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तान कुठल्याही थराला जाण्याची शक्यता असून भारतातील मुख्य शहरे पाकिस्तानच्या निशाण्यावर असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बुधवारी दुपारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरक्षा यंत्रणांची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, मुंबई पोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल यांच्यासह सुरक्षा यंत्रणेतील ज्येष्ठ अधिकारी हजर होते. या बैठकीत मुंबईसह राज्यातील मुख्य शहरात अतिदक्षतेचा (हायअलर्ट) इशारा देण्यात आला आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर हे दहशतवाद्यांच्या कायम निशाण्यावर राहिले आहे. सुरक्षा भेदून शहरावर कुठल्याही क्षणी दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच निवडणुकीच्या काळात हल्ल्याची शक्यता अधिक असून मुंबई पोलिसांसह राज्यातील पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शहरातील विमानतळ, रेल्वे स्थानके, धार्मिक स्थळ, पंचतारांकित हॉटेल, प्रेक्षणीय स्थळ, तसेच गर्दीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली असून, मुंबई पोलिसांची गुप्तचर यंत्रणा सतर्क झाली आहे.

मुंबईतील नामांकित शाळा प्रशासन तसेच स्कूल बस संघटनांना सावधगिरीचा इशारा देण्यात आलेला आहे. मुंबईत पोलिसांनी नाकाबंदीत वाढ केली असून मुंबईत येणारे आणि मुंबईतून बाहेर जाणार्‍या वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. रेल्वे स्थानकावर लोहमार्ग पोलिसांकडून प्रवाशांची कसून तपासणी सुरू आहे. रेल्वे पोलिसांचे घातपातविरोधी पथके प्रत्येक रेल्वे स्थानकात येणार्‍यांची तपासणी करीत आहे. मुंबईतील सागरी पोलिसांकडून समुद्रात पोलीस गस्त वाढवण्यात आली आहे.

राजधानी दिल्लीप्रमाणेच मुंबईलाही खास हवाई कवच देण्यात आले आहे. उपलब्ध माहितीनुसार, हे हवाई कवच बॅलेस्टिक मिसाईल डिफेन्स सिस्टिम आहे. शत्रूच्या क्षेपणास्त्रांचा रिअल टाईम मागोवा घेतानाच ती हवेतल्या हवेतच उद्ध्वस्त करण्याची क्षमता या प्रणालीत आहे. पृथ्वीच्या वातावरणातच नव्हे, तर वातावरणाच्या बाहेर जाऊन आपली ही क्षेपणास्त्रे शत्रूच्या क्षेपणास्त्रांचा नायनाट करू शकतात. देशाच्या दिशेने येणारे 2000 किलोमीटर पल्ल्याचे बॅलेस्टिक मिसाईल नष्ट करण्याची क्षमता या यंत्रणेत आहे, असे सांगण्यात येते. मुंबईत नेमक्या कोणत्या ठिकाणी ही यंत्रणा बसविलेली आहे, हे एक राष्ट्रीय गुपित आहे.

मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक

भारताने मंगळवारी केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून बुधवारी भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. भारताकडूनही त्याला प्रत्युत्तर देण्यात आले. सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना विशेषाधिकार देण्यात आल्याचे समजते.

पंतप्रधानांच्या निवासस्थानी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि गुप्तचर सुरक्षा यंत्रणांच्या उच्चस्तरीय अधिकार्‍यांची आढावा बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याकडून पंतप्रधान मोदींनी सध्या सुरू असलेल्या घटनांची माहिती घेतली. जवळपास अर्धा तास सुरू असलेल्या या बैठकीत पंतप्रधानांनी सुरक्षेसंबंधीच्या तयारीची तिन्ही सुरक्षा प्रमुखांकडून माहिती घेतली.

भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सकाळी गृहमंत्रालयानेही बैठक बोलावली होती. त्यापूर्वी चीनमध्ये भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी भारताने केलेल्या कारवाईचे समर्थन करताना दहशतवादाला सहन न करण्याचे इतर देशांना आवाहन केले. भारत, चीन आणि रशिया या तीन देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत त्या बोलत होत्या.

एअर स्ट्राईकची माहिती केवळ सात जणांना होती

भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर केलेली कारवाई अतिशय गुप्त ठेवण्यात आली होती. देशातील फक्त सात जणांना या कारवाईची माहिती होती. त्यांच्या व्यतिरिक्त कोणालाही कानोकान खबर नव्हती. एअर स्ट्राईक करणार्‍या वैमानिकांनाही या हल्ल्याची सूचना अंतिम क्षणी देण्यात आली होती.

मंगळवारी मध्यरात्री भारतीय हवाई दलाच्या मिराज २००० विमानांनी पाकिस्तानातील बालकोट, मुझफ्फराबाद आणि चकोटीतील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. भल्या पहाटे केलेल्या या कारवाईत हवाई दलाच्या वैमानिकांनी लक्ष्याचा अचूक वेध घेतला. गुप्तचर विभागाच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. याची माहिती केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, लष्कर प्रमुख बिपिन रावत, हवाई दल प्रमुख बी. एस. धनोआ, नौदल प्रमुख सुनील लांबा, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन, यांच्यासह गुप्तचर विभाग आणि रॉचे प्रमुखांना या कारवाईची माहिती होती.

हवाई दलाची कामगिरी यशस्वी झाल्याची माहिती अजित डोवाल यांनी पंतप्रधान मोदींच्या कॅबिनेटच्या सुरक्षा समितीच्या बैठकीत दिली. कॅबिनेटच्या सुरक्षा समितीच्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृह मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन, अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. हवाई दलाच्या धडाकेबाज कारवाईत जैशचे 25 टॉप कमांडर मारले गेल्याचं डोवाल यांनी समिती सदस्यांना सांगितलं. भारतीय हवाई दलाच्या एअर स्ट्राईकमध्ये जैशचे बहुतांश टॉप कमांडर मारले गेले. त्यामुळे या हल्ल्यात जैशचे मोठे नुकसान झाले आहे,’ अशी माहिती डोवाल यांनी दिली.

पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवादी तळांवर मोठ्या संख्येने भरती सुरू होती, असे डोवाल म्हणाले. ‘भारताच्या हल्ल्यात जैशचे दहशतवादी, प्रशिक्षक, टॉप कमांडर आणि जिहादी मारले गेले. या ठिकाणी आत्मघाती हल्ले घडवण्याच्या तयारीत असलेल्या 42 जणांना प्रशिक्षण देण्यात येत होते. याबद्दलची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली. यानंतर या भागातील सूत्रांच्या मदतीने अधिकची माहिती मिळवल्यानंतर हवाई दलाने गुप्तचर विभागाच्या मदतीने दहशतवादी तळांवर जोरदार हल्ले चढवले.

सरकारने देशाला विश्वासात घ्यायला हवे २१ विरोधी पक्षांची मागणी

देशातील लष्करी दलांच्या बलिदानाचे राजकारण होत असल्याबद्दल देशातील २१ विरोधी पक्षांनी आपला राग व्यक्त केला. तसेच देशाची स्वायत्तता, एकता आणि अखंडतेचे संरक्षण करण्यासाठी सरकारने देशाला विश्वासात घ्यायला हवे, अशी मागणीही त्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

विरोधी पक्षांची बैठक संसदेच्या वाचनालयात पार पडली. ही बैठक तब्बल तीन तास चालली. या बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त पत्रकात विरोधी पक्षांनी भारतीय लष्कराचे कौतुक केले. तसेच देशाच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली. विरोधी पक्षांनी पुलवामामध्ये पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याची निंदा केली. तसेच हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहून देशाच्या लष्करासोबत खंबीरपणे उभे राहण्याचे ठरवले. पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक घेऊन कोणताही निर्णय जाहीर केला नसल्याबद्दल चिंताही व्यक्त केली.

या बैठकीला काँग्रेस नेते राहुल गांधी, युपीए अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस नेते ए. के. अ‍ॅन्थनी, गुलाम नबी आझाद, अहमद पटेल, शरद पवार (राष्ट्रवादी), चंद्राबाबू नायडू (टीडीपी), ममता बॅनर्जी (तृणमूल), शरद यादव (एलजेडी), टी शिवा (डीएमके), सिताराम येचुरी (सीपीआय-एम), सतिशचंद्र मिश्रा (बसप), मनोज झा (आरजेडी), संजय सिंग (आप), सुधाकर रेड्डी (सीपीआय), दानिश अली (जद-से), शिबू सोरेन (झामुमो), उपेंद्र कुशवाह (आरएलएसपी), अशोक कुमार सिंग (जेव्हीएम), जतिन राम मांझी (एचएएम), कोदंडराम (टीजेएस) हे नेते उपस्थित होते.

पाकिस्तानने बोलावली अणुविषयक बैठक

भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील दहशतवादी शिबिरांवर हल्ला केल्यानंतर पाकिस्तानातील सरकार आणि लष्कर गोंधळून गेले आहे. अशावेळी काय करायचे हे कळत नसल्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला घाबरवण्यासाठी थेट अणुविषयक समितीची बैठक बोलावली होती. मात्र त्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाने पाकिस्तानला दम दिला असून पाकची पुन्हा नाचक्की झाली आहे.

पाकिस्तानचे अणुविषयक धोरण ठरविण्याची, संशोधनासंबंधी निर्णय घेण्याची व नियंत्रणाची संपूर्ण जबाबदारी नॅशनल कमांड अ‍ॅथॉरिटीकडे (एनसीए) आहे. भारताच्या एअर स्ट्राईकनंतर काल पाकच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक झाली होती. त्यात अणुविषयक समितीशी चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार इम्रान खान यांनी ही बैठक बोलावली होती.

भारताशी तणाव निर्माण होताच पाकिस्तानकडून नेहमीच अणुहल्ल्याच्या वल्गना केल्या जातात. आताही पाककडून असाच दबावाचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठीच ही बैठक बोलावण्यात आली असे बोलले जात होते. मात्र त्याचा उलटाच परिणाम झाला आहे. अणुविषयक बैठक बोलावल्याचे कळताच अमेरिका, रशियाने पाकिस्तानला सबुरीने घेण्याचा सल्ला दिला आहे.

भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळले

भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर जम्मू-काश्मीरमधील बडगाव जिल्ह्यात अपघातग्रस्त झाले. त्यात ६ जण मृत्यूमुखी पडले आहेत.

बडगाव जिल्ह्यातील गारेन कलान खेड्याजवळील मोकळ्या जागेत सकाळी १०.०५ वाजता हे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले. घटनास्थळाहून पाच मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या एकाचे नाव हुस्सेन गनाई असून तो स्थानिक रहिवाशी आहे. तर चार जण भारतीय हवाई दलाचे कर्मचारी आहेत.

नवी दिल्लीतील अधिकार्‍यांनी ते एमआय-१७ हेलिकॉप्टर असल्याचे सांगितले. सुरुवातीला कोसळलेले हे हेलिकॉप्टर भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान असल्याचे सांगितले गेले. तसेच पाकिस्तानच्या हल्ल्यात ते कोसळल्याचेही म्हटले जात होते. मात्र हे हेलिकॉप्टर असून ते अपघातग्रस्त झाल्याचे उघड झाले आहे.

पाकिस्तानचा कांगावा,२०१६ मधील विमान दुर्घटनेचा व्हिडिओ केला व्हायरल

भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानचे लष्कर बिथरले आहे. त्यातच पाकिस्तानने बुधवारी सकाळी भारताच्या हद्दीत घुसखोरी केली. त्यावेळी, भारताचे दोन विमान पाडल्याचा खोटा दावा तेथील मीडियाकडून व लष्कराकडून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, भारतीय वायू सेनेच्या कोसळलेल्या जुन्याच विमानांचे फोटो आणि एक व्हिडिओही व्हायरल करण्यात आला आहे.

भारतीय हवाई दलाने मंगळवारी पाकिस्तानमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मदची प्रशिक्षण शिबिरे उद्ध्वस्त केली. भारताच्या या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानी हवाई दलाने बुधवारी भारतात घुसून प्रतिहल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. पण, भारतीय हवाई दलाने हा हल्ला हाणून पाडला. दुसरीकडे पाकिस्तानच्या हद्दीत घुसलेली दोन भारतीय विमाने पाडण्यात आली असून, दोन वैमानिकांना ताब्यात घेतल्याचा खोटा दावाही पाकिस्तानने केला आहे. तसेच पाकच्या माध्यमांकडूनही भारताची दोन विमाने पाडल्याचा दावा करण्यात येत आहे. या दाव्यासोबत जोधपूर येथे 2016 मध्ये क्रॅश झालेल्या भारतीय विमानाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्यात येत आहेत. तर या पसरविण्यात येणार्‍या फेकन्यूजमध्ये एक व्हिडिओ ओडिशामधील विमान अपघाताचा असून काही फोटो राजस्थानच्या बारनेर येथील विमान अपघाताचे आहेत.

विशेष म्हणजे पाकिस्तानच्या माहिती मंत्रालयानेही खोटाच व्हिडिओ शेअर करत हा दावा केला आहे. तर पाकिस्तान रेडिओच्या ट्विटर अकाऊंटवरूनही ही खोटी बातमी पसरवण्यात आली आहे.

सोशल मीडियावरील जोश

इन पाकिस्तानियो का टैलेंट देख, हसी आना पक्का हैं और इनको कश्मीर लेना हैं। हद हैं भाई

उठा उठा विमाने आली
कंठस्नानाची वेळ झाली

अरे पागल पाकिस्तान यह विरों की भूमी है, कायोरोंसे क्या हारोंगे, भारत माँ को मत देना चुनौती, वरना घरमे घुसघुसकर जन्नत भेजेंगे

काल पाकड्यांवरच्या हल्ल्याचा किती तो उत्साह, पण फक्त हिंदूंमध्येच दिसला, बाकीचे किती शांत होते, अरे शिका जरा तटस्थपणा

मोदीजी का दरारा तो देखो, ५७ मुस्लीम राष्ट्र होते हुए भी एकभी पाकिस्तान के साथ खडा नही हो रहा

कल हिंदुस्थान ने घुसकर मारा था, आज पाकिस्तान को घुसनेपर मारा है, हमारा हौसला बुलंद। जय हिंद कि सेना

पाकिस्तान की रहम की भीख ठुकरा दो । पाकिस्तान पर आक्रमण कर दो ।

पाकिस्तानची घाबरगुंडी; इम्रान खानचा शांततेचा प्रस्ताव
पाकिस्तानमधील बालाकोट येथील दहशतवादी तळावर करण्यात आलेला एअर स्ट्राईक, पाकिस्तानी विमानांनी भारतात घुसखोरी करून बॉम्बफेक केल्यानंतर त्यांना मिळालेले चोख प्रत्युत्तर आणि पाडण्यात आलेले पाकिस्तानचे एफ-१६ विमान यामुळे घाबरलेल्या पाकिस्तानने आता भारताकडे शांतता प्रस्ताव ठेवला आहे. पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी युद्धाने प्रश्न सुटणार नसल्याने शांततेने बसून चर्चा करू, असे भारताला उद्देशून म्हटले आहे. आमची कृती केवळ याच उद्देशाने होती की, तुम्ही आमच्या देशात येत असाल तर आम्हीही तशी कारवाई करू शकतो. भारताची दोन मिग पाडण्यात आली आहेत, असे इम्रान खान यांनी पाकिस्तानी जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात म्हटले आहे.

भारताच्या दहशतवादविरोधी कृतीला पाकिस्तानी हवाई दलाने भारतातील लष्करी आस्थापनांना लक्ष्य करून प्रत्युत्तर दिले मात्र त्यांचा हा प्रयत्न भारतीय हवाईदलाने यशस्वीरित्या निष्कळ केला, असे भारतीय परराष्ट्र खात्याने स्पष्ट केल्यानंतर काही मिनिटांतच पाकिस्तानकडून शांतता प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

प्रत्येक युद्ध हे केवळ दुरविचारीच असते असे नाही तर ते कुठे घेऊन जाईल हे सांगता येत नाही. त्यामुळे युद्ध टाळून दोन्ही बाजूंनी शांततेने विचार आणि आचार करायला हवा, असे इम्रान खान म्हणाले. मी भारताला विचारतो: तुमच्याकडे जी शस्त्रे आहेत आणि आमच्याकडे जी शस्त्रे आहेत त्यामुळे अविचार कोणालाही परवडणारा नाही. जर परिस्थिती चिघळली तर ती ना माझ्या नियंत्रणात असेल ना नरेंद्र मोदी यांच्या नियंत्रणात, असेही खान म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -