भारत-चीन सीमेवर कर्तव्य बजावताना कोरोनाची लागण; जवानाचा मृत्यू

सिक्कीम इथे आपलं कर्तव्य बजावत असलेले ३० वर्षांचे जवान अमोल किरण आदलिंगे यांना कोरोनाची लागण झाली.

जगभरात कोरोनाचा कहर सुरू असून भारत-चीन सीमेवर कर्तव्य बजावत असणाऱ्या जवानांना देखील कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले आहे. सिक्कीम इथे आपलं कर्तव्य बजावत असलेले ३० वर्षांचे जवान अमोल किरण आदलिंगे यांना कोरोनाची लागण झाली. या जवानाची कोरोनाविरोधातली झुंज अपयशी ठरली आणि त्याचा मृत्यू झाला आहे. जवान अमोल यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा-मुलगी असा परिवार आहे. जवान अमोल यांच्या पार्थिवावर सिक्कीम इथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे.

जवानाची कोरोनाशी झुंज अपयशी

अमोल हे पंढरपूर जिल्ह्यातील कमलापूर गावचे रहिवासी होते. भारत-तिबेट सीमा पोलीस दलात २०१२ मध्ये त्यांची भरती झाली आणि भारत-चीन सीमेवर कर्तव्य बजावण्यासाठी त्यांना पाठवण्यात आलं होतं. भारत-चीन सीमेवर असणाऱ्या थंडीत आपलं कर्तव्य बजावत असताना अचानक त्यांची प्रकृती खराब झाली. त्यानंतर कोरोनाची चाचणी करण्यात आली आणि त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते मात्र जवान अमोल यांची कोरोनाविरुद्धची लढाई अपयशी ठरली आहे.

देशातही कोरोनाचा फैलाव सुरूच

देशात गेल्या २४ तासांत ७८ हजार ५२४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ९७१ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ६८ लाख ३५ हजार ६५६वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ५ हजार ५२६ रुग्णांचा मृत्यू झाला असून ५८ लाख २७ हजार ७०५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या ९ लाख २ हजार ४२५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्रालयाने दिली आहे.


मुंबई पोलिसांकडून मीडियाचे TRP रॅकेट उघड; Republic TV ची चौकशी होणार