पंकजा मुंडे शिवसेनेच्या वाटेवर?

Mumbai
पंकजा मुंडे

अंतर्गत राजकारण आणि पक्षात कमी होत जाणारे महत्त्व यामुळे भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे या खूप नाराज आहेत. पंकजा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून भाजप हे नाव काढून टाकल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. येत्या १२ डिसेंबरला दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मदिनी आपली पुढची राजकीय वाटचाल ठरवणार असल्याचे फेसबुक पोस्टच्या माध्यमातून पंकजा यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले आहे. पंकजा १२ डिसेंबरला कोणता राजकीय भूकंप करतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले असून त्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

विशेष म्हणजे पंकजा या शिवसेनेत प्रवेश करणार, असे बोलले जात असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही सोमवारी सकाळी नाशिक येथील पत्रकार परिषदेत पंकजा मुंडेच नव्हेतर अनेक बडे नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे सूचक वक्तव्य केले. त्यामुळे या चर्चा आणखीनच रंगू लागल्या आहेत. यावर भाजपचे नेता चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन या अफवा असल्याचे म्हटले आहे. पंकजा मुंडे कालही भाजपमध्ये होत्या, आजही आहेत आणि उद्याही राहणार, असे पाटील यांनी यावेळी ठणकावून सांगितले.

पंकजा सध्या भाजपमध्ये अस्वस्थ आहेत. विधानसभा निवडणुकीत त्यांचा धनंजय मुंडे यांनी पराभव केला होता. सर्व राज्यात लक्षवेधी ठरलेली ही लढत गाजली होती. मी जनतेच्या मनातली मुख्यमंत्री आहे, असा दावा करणार्‍या पंकजा यांना या पराभवामुळे मोठा धक्का बसला. त्यांच्या राजकीय कारकिर्दीला हा मोठा आघात मानला जातो. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून त्या अस्वस्थ असून त्या भाजपला रामराम करतील, असे चित्र आहे. त्यामुळे ‘मला तुमच्याशी बोलायचे आहे’, असे सांगत त्यांनी फेसबुकवरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सुरूवातीच्या काळात पंकजा मुंडे यांनी स्वत:ला मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून प्रोजेक्ट करायला सुरुवात केली होती. त्याची चर्चाची अनेकदा झाली. त्यातूनच देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यात शीतयुद्धाला सुरुवात झाल्याचं बोलले जाते. त्यानंतर पंकजा यांच्यावर धनंजय मुंडे यांनी चिक्की प्रकरणात अनेक आरोप केले. त्या आरोपांना भाजपमधल्याच काही लोकांनी खतपाणी पुरवले, असे त्यांना वाटत होते. त्यानंतर त्यांच्यात आणि फडणवीसांमध्ये फारसे सख्य राहिले नाही. पंकजा यांच्या विधानसभेतल्या पराभवाला भाजपमधल्याच विशेषतः फडणवीस आणि त्यांच्या समर्थक लोकांनी बळ पुरवल्याची कार्यकर्त्यांची भावना असल्याचे सांगितले जाते.

पंकजा भाजप सोडणार नाहीत- चंद्रकांत पाटील
पंकजा मुंडे इतर पक्षामध्ये जात असल्याच्या अफवा समोर येऊ लागल्या आहेत. मात्र या अफवांवर विश्वास ठेवू नये. पंकजा यांचे वडिल गोपीनाथ मुंडे यांचे भाजपमधील योगदान मोठे आहे. पंकजा यांनी त्यांच्या कार्याला उभारी दिली आहे. विशेष म्हणजे आमचे त्यांच्याशी बोलणे झाले असून पक्षांतराच्या केवळ अफवा आहेत, असे स्पष्टीकरण पाटील यांनी यावेळी दिले. तसेच मुंडे आणि महाजन परिवाराचे ठाकरे कुटुंबाशी जुने ऋणानुबंध आहेत. तसेच १२ डिसेंबर रोजी भाजपचे सर्व नेते गोपीनाथ गडावर जातात. एकदा अमित शहादेखील गोपीनाथ गडावर गेले होते. त्यामुळे पंकजा मुंडे भाजप सोडून कुठेही जाणार नाहीत. यावर आम्हाला विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे

नमस्कार मी पंकजा गोपीनाथ मुंडे…
पाच वर्षे सत्तेच्या माध्यमातून तुमची सेवा केली. मला ही सेवेची संधी केवळ आणि केवळ तुमच्या विश्वासामुळे मिळाली आणि आज पराभवानंतर माझ्याहीपेक्षा व्यथित माझ्या लोकांनी मला इतके मेसेजेस केले, इतके फोन केले, इतके निरोप दिले. “ताई आम्हाला भेटायला वेळ द्या,” …”ताई आम्हाला तुम्हाला बघून तरी जाऊ द्या “…किती संवेदना तुम्ही माझ्यासाठी व्यक्त केली . मी तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. आज राजकारणामध्ये झालेले बदल, जबाबदारीत झालेले बदल या सगळ्या बदलत्या संदर्भांचा विचार करुन आपला सर्वांचा पुढचा प्रवास ठरवण्याची आवश्यकता आहे. १२ डिसेंबरला मी तुमच्याशी संवाद साधणार आहे, असे पंकजा यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here