घरमहाराष्ट्रऊसतोड शेतकऱ्यांच्या हातातील कोयता बाजूला करणार - पंकजा मुंडे

ऊसतोड शेतकऱ्यांच्या हातातील कोयता बाजूला करणार – पंकजा मुंडे

Subscribe

‘ऊसतोड शेतकऱ्यांच्या हातातील कोयता बाजूला करण्यासाठी मुंडे साहेबांनी लढाई दिली. पाच वर्षात आम्ही सर्व कायद्यांचा अभ्यास करुन ऊसतोड कामगारांसाठी मंडळ उभे केले आहे. पुढच्या पाच वर्षांत माझ्या या ऊसतोड भावांवर कोयता उचलण्याची वेळ येऊ नये, असे काम आम्ही करणार आहोत’, असे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाले. बीडच्या सावरगाव येथील भगवान गडावर आयोजित दसरा मेळाव्यात त्या बोलत होत्या. या दसरा मेळाव्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते. यावेळी पंकजा मुंडे यांनी अमित शहांचे स्वागत केले. ‘राष्ट्रभक्ती आणि विचारांचे सोने लुटण्यासाठी आलेल्या आपल्या देशाचे कणखर गृहमंत्री अमित शहा ज्यांनी या देशामध्ये एक संविधान आणि एकच विधान पाहिजे या अनेक वर्षांच्या मागणीला न्याय दिला त्या अमितभाई शहांचे भगवान बाबांच्या या जन्मभूमीमध्ये भगवान भक्तांकडून हार्दिक स्वागत करते’, अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे स्वागत केले.

ऐक्यासाठी राष्ट्रभक्ती हा एकमेव धागा – पंकजा मुंडे

‘या देशात सर्वांना एकत्र आणण्यासाठी राष्ट्रभक्ती हा एकमेव धागा आहे जो सर्व रंगाना एकत्र आणू शकतो. काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द करुन राष्ट्रभक्तीचे खऱ्या अर्थाने तुम्ही उदाहरण दाखवून दिले आहे. देशातील सर्वच राष्ट्रभक्तांना सन्मान देणारा हा निर्णय आहे. त्यामुळेच आज जेव्हा तुमचे स्वागत झाले तेव्हा आम्ही ३७० तोफांची सलामी दिली. भगवान बाबा यांच्या सीमोल्लंघन करण्याचे काम गोपीनाथ मुंडे यांनी सुरु केले होते. तेव्हापासून दसरा मेळाव्याला येणारा प्रत्येक भक्त एक संदेश येथून घेऊन जातो. त्यामुळे फुल कोणत्याही रंगाचे असो मग ते भगवा, निळा किंवा हिरवा रंगाचे असो या सर्वांना राष्ट्रभक्तीच एका धाग्यात एकत्र आणू शकते. गोपीनाथ मुंडे यांनी वंचितांना शिक्षण आणि न्याय मिळवण्यासाठी जे काम केले तेच काम आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नेतृत्वात होत आहे. मुंडे साहेबांचे हेच काम पुढे करायचे आहे’, असे पंकजामुंडे म्हणाल्या.

- Advertisement -

हेही वाचा – भगवान गडावर भाजपचा दसरा मेळावा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -