५ दिवसांत ते ५ नगरसेवक पुन्हा शिवसेनेत; मातोश्रीवर घेतला ठाकरेंचा आशीर्वाद

Mumbai
parner five corporator join shiv sena
पारनेरच्या त्या पाच नगरसेवकांनी आमदार निलेश लंकेसमवेत मातोश्रीवर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

राष्ट्रवादीत गेलेल्या पारनेरच्या ५ नगरसेवकांनी आज पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. या नगरसेवकांनी आज दुपारी मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्ष प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. नंदकुमार देशमुख, नंदा देशमाने, वैशाली औटी, डॉ. सय्यद, किसन गंधाडे अशी आज मातोश्रीवर दाखल झालेल्या नगरसेवकांची नावे आहेत. यावेळी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, पारनेरचे आमदार निलेश लंके, संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यांची उपस्थिती होती. मिलिंद नार्वेकर यांनी या नगरसेवकांना परत शिवसेनेत आणण्यासंदर्भात त्यांच्याशी यशस्वी चर्चा केली होती.

पारनेरमधील अंतर्गत राजकारणामुळे या पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पारनेरचे शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी यांच्यासोबत संघर्ष झाल्यामुळे या पाच नगरसेवकांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र विरोधी पक्षात गेल्यास आपलेच नुकसान होऊ शकते, यामुळे पारनेरचे विद्यमान आमदार निलेश लंके यांनी त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश मिळवून दिला होता. खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला होता.

महाविकास आघाडीतील घटक पक्षांनीच एकमेकांच्या नगरसेवकांची फोडाफोडी केल्यामुळे हा प्रकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. त्यानंतर शरद पवार यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अजित पवार यांनी देखील मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यामुळे या प्रकरणावर आता पडदा पडेल, हे निश्चित झाले होते.

आज हे पाचही नगरसेवक मुंबईत आले होते. आधी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, आमदार नीलेश लंके यांच्या समवेत बैठक घेतली. त्यानंतर मातोश्रीवर जाऊन पुन्हा शिवसेनेत प्रवेश घेतला.