घरलोकसभा २०१९ग्राउंड रिपोर्टमावळ : पवार कुटुंंब विरुद्ध महायुती

मावळ : पवार कुटुंंब विरुद्ध महायुती

Subscribe

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी सोमवारी, २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यात मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांसह पुणे जिल्ह्यातील मावळ या लोकसभा मतदारसंघाकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागून आहे. कारण या ठिकाणचा उमेदवार हा थेट पवार घराण्यातील आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा नातू आणि अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार हे या ठिकाणी उमेदवार आहेत. पवार घराण्यातील दोन सदस्य यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यातील मावळ लोकसभा मतदारसंघ आणि दुसरा बारामती मतदारसंघ आहे. बारामतीमधून शरद पवार यांची मुलगी सुप्रिया सुळे निवडणूक लढवत आहे. त्यामुळे पवार कुटुंबियांसाठी मावळ आणि बारामती हे दोन मतदारसंघातील निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.

चौथ्या टप्प्यात मावळ मतदारसंघात मतदान होणार आहे. शनिवारी या ठिकाणचा प्रचार थंडावला. प्रचारादरम्यान संपूर्ण पवार कुटूंब मावळ मतदारसंघात उतरले होते. विशेष म्हणजे अजित पवार या मतदारसंघात ठाण मांडून होते. त्यामुळे साहजिकच राष्ट्रवादीतील मोठे नेतेही मावळच्या प्रचारात सहभागी होते. या लोकसभा मतदारसंघात पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड आणि पिंपरी हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. त्यातील पनवेल, उरण, चिंचवड या तीन विधानसभा क्षेत्रात भाजपचा आमदार निवडून आला आहे. तर कर्जत विधानसभेत राष्ट्रवादी काँगे्रेसचा, पिंपरीमध्ये शिवसेनेचा आमदार आहे. अशा प्रकारे या मतदारसंघात भाजपचे सर्वाधिक आमदार असल्याने भाजपचे नेटवर्क तुलनेने मजबूत आहे.

- Advertisement -

मात्र या क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचेही प्राबल्य जास्त आहे. अजित पवार यांची राजकीय कर्मभूमी या ठिकाणी आहे. त्यामुळे अजित पवारांनी या ठिकाणी त्यांच्या मुलाला उमेदवारी देण्यात शरद पवारांना इच्छा नसूनही भाग पाडले. मुलाला खासदार करून अजित पवार यांना मुलाचा राज्याभिषेक करायचा आहे. म्हणून यंदाची मावळ येथील लढाई ही पवार कुटुंबीय विरुद्ध श्रीरंग बारणे अशी बनली आहे. अर्थात महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनाही शिवसेना-भाजपने वार्‍यावर सोडले नाही. त्यांच्याकरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभा झाल्या. तसेच महायुतीचे इतरही नेतेमंडळी बारणे यांच्या प्रचारासाठी सक्रिय होते. मात्र केवळ पवार कुटुंबियातील सदस्य उमेदवार असल्याने यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

महायुती, महाआघाडीसह वंचित बहुजन आघाडीकडेही येथील मतदारांचे लक्ष आहे. झोपडपट्टीबहुल भाग असला, तरी प्राधिकरणासह काही भाग नव्याने विकसित झाला असल्याने हा मतदारसंघ संमिश्र आहे. त्यामुळे २००९ मध्ये राष्ट्रवादी, तर २०१४ मध्ये शिवसेनेचा विजय झाला. बारणे आणि भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्यात दिलजमाईसाठी बराच कालावधी गेला. दुसरीकडे पार्थ पवार यांचीही उमदेवारी घोषित होण्याला बराच वेळ लागला होता. प्रचारात बारणे यांनी वैयक्तिक गाठीभेटींवर भर दिला. महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी या काळात राष्ट्रवादीतून भाजपत गेलेल्या स्थानिक पदाधिकार्‍यांच्या गाठीभेटी घेतल्या. वंचित बहुजन आघाडीबाबतही येथील मतदारांत उत्सुकता आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात सुमारे सहा लाख दलित व मुस्लीम मते आहेत. त्यातील सुमारे दीड लाख मते पिंपरी विधानसभा मतदारसंघात आहेत.

- Advertisement -

महायुतीसाठी जमेची बाजू अशी आहे की, इथे शिवसेनेसह भाजप आणि आरपीआयनेही (आठवले गट) प्रचारासाठी यंत्रणा कामाला लावली. मतदारसंघात आमदार शिवसेनेचा आहे. त्यांच्याकडून आणि भाजप नगरसेवकांकडून कोपरा सभांवर भर देण्यात आला. तर विरोधी बाब अशी आहे की, मतदारसंघ संमिश्र स्वरूपाचा आहे. त्यातच शिवसेनेचे केवळ चारच नगरसेवक या मतदारसंघात आहेत. त्यामुळे सर्वच स्तरातील मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान शिवसेनेपुढे आहे. त्यासाठी त्यांची भाजपवर मदार आहे.

महाआघाडीसाठी जमेची बाजू अशी आहे की, पिंपरी विधानसभेतून पहिला आमदार राष्ट्रवादीचा झाला होता. तसेच राष्ट्रवादीतून भाजपत गेलेले बडे पदाधिकारी या मतदारसंघात आहेत. त्यांना महाआघाडीने गळ घातली आहे. महाआघाडीचे एकदिलाने काम सुरू आहे. तर विरोधी बाब अशी आहे की, विधानसभेचा हा मतदारसंघ आरक्षित असल्याने येथे मागासवर्गीय मतदारांची संख्या जास्त आहे. या मतदारांचे वंचित बहुजन आघाडी आणि महाआघाडीमध्ये मोठे विभाजन होऊ शकते. त्याचा फटका महाआघाडीला बसू शकतो.

Nityanand Bhise
Nityanand Bhisehttps://www.mymahanagar.com/author/bnityanand/
राष्ट्रीय भावना अधिक असलेला तितकाच सामाजिक जाणिवांबाबत हळवा असलेला मी धर्म, देव, श्रद्धा या बुरसटलेल्या, थोतांड गोष्टी मानणार्यामधला नाही, मी पुरोगामी नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -