घरमहाराष्ट्रआणीबाणीच्या काळात तुरुंगावास भोगलेल्या ३२६७ जणांना मानधन सुरु!

आणीबाणीच्या काळात तुरुंगावास भोगलेल्या ३२६७ जणांना मानधन सुरु!

Subscribe

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जाहीर केलेल्या आणीबाणीदरम्यान ज्यांनी तुरुंगवास भोगला, त्यांना पेन्शन देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यातल्या ३ हजाराहून अधिक जणांना पेन्शन सुरू देखील झाली आहे.

१९७५ ते १९७७ या दरम्यान आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्या व्यक्तींना मानधन देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या मानधन योजनेसाठी ३२६७ अर्ज आले असल्याची माहिती राज्यमंत्री मदन येरावार यांनी विधानसभेत दिली. मानधन देण्यासाठी दोन प्रवर्ग तयार केले असून एक महिन्यापेक्षा कमी काळ तुरुंगवास भोगलेल्या व्यक्तींना ५,००० आणि एक महिन्याहून अधिक काळ तुरुंगवास भोगलेल्यांना १०,००० रूपये एवढे मासिक मानधन दिले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते.

जिल्हाधिकाऱ्यांमार्फत होणार प्रतिज्ञापत्रांची शहानिशा

आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्यांकडे पुराव्यांची मागणी न करता १०० रूपयांच्या स्टॅम्प पेपरवर संबंधितांनी प्रतिज्ञापत्र दिले, तर तोच पुरावा ग्राह्य धरावा, असा आदेश शासनाने काढला आहे का? असा मूळ प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला होता. जर असा आदेश असेल तर अनेकजण याचा गैरफायदा घेतील आणि त्यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार होण्याची शक्यता असल्यामुळे हा आदेश रद्द करावा, अशी मागणी पुढे आली आहे काय? असाही प्रश्न पवार यांनी उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना राज्यमंत्री मदन येरावार म्हणाले की, ‘जरी स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र मागवले असले तरी सरसकट पेन्शन दिली जात नाही. त्या अर्जाची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली जाते. सर्व पुरावे तपासल्यानंतरच संबंधित व्यक्तीला मानधन सुरु केले जाते. सध्या ३२६७ अर्जांपैकी ११७९ लोकांनी प्रतिज्ञापत्र सादर केलेले आहेत आणि त्यांना मानधन सुरु करण्यात आलेले आहे’.

- Advertisement -

हेही वाचा – अधिवेशनाला येणाऱ्या आमदारांना चोरीचा फटका; एक्स्प्रेसमधून पत्नीची पर्सच पळवली

शेकापचा अजित पवारांना परखड सवाल

ही चर्चा होत असताना शेकपचे आमदार पंडीत पाटील सांगितले की, ‘अजित पवार यांच्या सरकारने माझ्या वडिलांना जेलमध्ये टाकले होते. पुढे जाऊन या योजनेची रक्कम वाढवणार का? आणि ज्यांना मानधनाची गरज नाही त्यांना केवळ सन्मानपत्र देणार का?’ असा प्रश्न उपस्थित केला. याला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, त्यांना मानधन नको असेल तर त्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येईल. तसेच ज्यांनी केवळ एक दिवस तुरुंगवास भोगला असेल त्यांना देखील या योजनेत सामावून घेतले जाणार आहे’.

पंडीत पाटील यांच्या खोचक प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, ‘आणीबाणीच्या काळात मी १६ वर्षांचा होतो आणि त्या काळात माझे सख्खे मामा एन.डी. पाटील यांना तुरुंगात जावे लागले होते. जर माझे सरकार असते तर माझ्या मामांना जेल झाली नसती’, असे सांगत त्यांनी पंडीत पाटील यांच्यावर पलटवार केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -