घरमहाराष्ट्र३० मेला होणार मोदींचा दुसरा शपथविधी!

३० मेला होणार मोदींचा दुसरा शपथविधी!

Subscribe

ऐतिहासिक यश मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शपथविधी ३० मे रोजी होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

लोकसभा निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपनं ऐतिहासिक निकाल नोंदवत स्वबळावर ३०० जागांचा टप्पा पार केला आहे. या पार्श्वभूमीवर आता मोदींचा दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी शपथविधी होणार असून त्यांच्या मंत्रिमंडळात कुणाला कोणतं खातं मिळणार? याविषयीही उत्सुकता आहे. दरम्यान, मतमोजणीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शपथविधी २६ मे रोजी होणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र, आता मोदींचा शपथविधी ३० मे रोजी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याच दिवशी सरकारमधले इतर काही मंत्री देखील शपथ घेतील असं देखील सांगितलं जात आहे.

भाजपचं ऐतिहासिक यश!

२०१४प्रमाणे यंदा मोदी लाट नसल्यामुळे भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी मित्रपक्षांची मदत घ्यावीच लागेल, अशी अटकळ बांधली जात होती. त्या पार्श्वभूमीवर मतमोजणीपूर्वी भाजपनं काही प्रमाणात इतर पक्षांशी चर्चा देखील सुरू केली होती. सर्वाधिक प्रयत्नशील विरोधात दिसत होते. त्यामुळे शरद पवार, चंद्राबाबू नायड, सोनिया गांधी यांच्या बैठका देखील होत होत्या. त्यामुळे भाजपला घेरण्याच्या तयारीत सर्वच विरोधक असताना निकाल मात्र वेगळेच लागले. भाजपनं २०१४पेक्षाही दणदणीत यश मिळवत एकट्याच्या जोरावर ३०० चा आकडा पार केला. मित्रपक्षांच्या जागा धरल्या, तर एनडीएचा आकडा ३५०च्याही पुढे जातो. त्यामुळे काँग्रेसचं भाजपला सत्तेतून खाली खेचण्याचं स्वप्न प्रत्यक्षात उतरलं नाही. काही राज्यांमध्ये तर काँग्रेसचं पानीपत झालं. महाराष्ट्रात काँग्रेसला फक्त एकच जागा जिंकता आली. त्यामुळे काँग्रेसला मित्रपक्षांसोबतही तीन अंकी आकडा गाठता आला नाही. त्यामुळे देशात पुन्हा एकदा मोदी सरकारच येण्यावर शिक्कामोर्तब झालं.

- Advertisement -

सविस्तर वाचानरेंद्र बाहुबली!

विरोधी पक्षनेतेपद तरी मिळेल का?

दरम्यान, या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा प्रस्ताव सोनिया गांधींसमोर ठेवल्याचं बोललं जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधींनी पत्रकारांसमोरच राजीनामा देणार असल्याचंही राहुल गांधींनी सोनिया गांधींना सांगितलं आहे. त्यामुळे सोनिया गांधी राहुल गांधींचा प्रस्ताव स्वीकारतील का? याविषयी सगळ्यांनाच उत्सुकता आहे. मात्र, दुसरीकडे सर्व विरोधी पक्षांना एकत्र बांधून विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे राहुल गांधींनी राजीनामा दिल्यास विरोधी पक्षनेतेपद कोण सांभाळणार? हाही मुद्दा काँग्रेसमध्ये चर्चिला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -