बापाच्या विसर्जनाला कडेकोट बंदोबस्त

50 हजार पोलीस तैनात; पाच हजार सीसीटीव्ही कॅमेर्‍यांद्वारे नजर

Mumbai

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणेशाच्या आगमनानंतर आता गुरुवारी 12 सप्टेंबरला विसर्जनासाठी मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत. गणपती विसर्जनादरम्यान शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला असून संपूर्ण शहरात 50 हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पाच हजार सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने मॉनिटरिंग केले जाणार असल्याचे पोलीस उपायुक्त प्रणय अशोक यांनी सांगितले. दुसरीकडे गणेशोत्सावात वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष नियोजन केले आहे. गणपती विसर्जनासाठी घेतलेल्या वाहनांची तपासणी करा तसेच वाहनचालकांना शक्यतो गाडी सोडून जाण्यास सांगू नये. त्यासाठी गणेश भक्तांनी मुंबई पोलिसांसह वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात गणपतीला आराध्य दैवताचे स्थान असून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र गणेशोत्सव मोठ्या आनंदात आणि उत्सावात साजरा केला जातो. 2 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली होती, त्यानंतर दीड, पाच, सात दिवसांच्या गणपतीसह गौरी विसर्जन कुठल्याही विर्घ्नाशिवाय पार पडले होते. गुरुवारी 12 सप्टेंबरला अनंत चर्तुदशी असल्याने मुंबई शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. शहरात सुमारे 50 हजार पोलीस बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहेत. मुंबई पोलिसांच्या मदतीला अतिरिक्त साडेचार ते पाच हजार पोलीस , सिव्हील डिफेन्सचे जवान, एसआरपीएफ, सीआरपीएफ, बीएसएफच्या कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. शहरात काही अतिसंदेवनशील ठिकाणे असून या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

129 हून अधिक विर्सजनाची ठिकाणी असून विर्सजनाच्या दिवशी या ठिकाणीही अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात येईल असे सांगण्यात आले. गिरगाव, शिवाजीपार्क, मालाडच्या मालवणी टी जंक्शन, जुहू चौपाटी आणि पवईतील गणेश घाट या पाच महत्त्वाच्या विसर्जन ठिकाणी मुंबई शहर वाहतूक पोलिसांकडून नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. काही मार्गात बदल करण्यात आले आहे. यावेळी वाहतुकीला काही रस्ते बंद ठेवण्यात आले तर काही ठिकाणी एक दिशा मार्ग, तेरा ठिकाणी अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

संपूर्ण शहरात पाच हजार सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून त्यांच्या मदतीने गर्दीच्या ठिकाणी लक्ष ठेवण्यात येणार आहे. रेतीत वाहने अडकू नये म्हणून तीन हजार प्लेट बसविण्यात आले आहे. वाहतूक पोलिसांचे साडेतीन ते चार हजार पोलीस कर्मचारी, सशस्त्र दलाचे जवान, होमगार्ड, वाहतुक रक्षक, जलसुरक्षा दलाचे जवान, नागरीक संरक्षण दलाचे जवान आणि सहा ते साडेसहा हजाराहून स्वयंसेवक वाहतूक पोलिसांच्या मदतीसाठी तैनात करण्यात आले आहे. गेल्या वर्षी ध्वनी प्रदुषण करणार्‍या काही मंडळांवर कारवाई करण्यात आली होती. यावेळेस ध्वनी प्रदुषण करणार्‍या मंडळावर नजर ठेवण्यात येणार आहे. दहशतवादी हल्ल्याचा धोका टाळण्यासाठी क्युआरटीच्या पथकांसह मुंबई पोलिसांच्या दहशतवाद विरोधी कक्षाच्या कर्मचार्‍यांना तैनात ठेवण्यात आले आहेत. कुठल्याही अफवांवर मुंबईकरांनी विश्वास ठेवू नये. शांतता राखावी असे पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास मुंबईकरांनी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुम क्रमांक 100, ट्विटर किंवा 7738133133 तसेच 7738144144 या मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे तक्रार अथवा पोलीस मदतीसाठी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.