जळगाव हत्याकांडप्रकरणी 3 आरोपींना अटक

अत्याचारातून ही घटना घडल्याची माहिती पोलीस तपासातून पुढे आली, संशयितांनी दिली कबुली

रावेर भागात बोरखेडा रस्त्यावर असलेल्या शेतातल्या घरात चार अल्पवयीन भावंडांची हत्या झाल्याच्या घटनेने संपूर्ण जळगाव जिल्हा हादरला होता. या घटनेप्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली आहे. अत्याचारातून ही घटना घडल्याची माहिती पोलीस तपासातून पुढे आली आहे.

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दोन दिवसांपूर्वी बोरखेडा घटनेतील मृतांच्या पालकांची भेट घेऊन कुटुंबाचे सांत्वन केले होते. त्यावेळी त्यांनी पोलिसांनी चांगला तपास कमी वेळेत केला असून, याप्रकरणी खटला जलदगती न्यायालयात चालवला जाईल, असेही सांगितले होते. या प्रकरणात अॅड. उज्वल निकम हे सरकारी वकील असतील, असा शब्दही त्यांनी दिला होता. १६ ऑक्टोबर रोजी सकाळी बोरखेडा रस्त्यावरील शेतात असलेल्या भिलाला कुटुंबातील मोठी मुलगी सईता, मुलगा रावल, अनिल व सुमन या चौघा भावंडांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले होते. हे पाहताच शेतमालकाने या घटनेची माहिती पोलिसांना दिली होती. त्यानंतर श्वानपथकाच्या सहाय्याने केलेल्या तपासातून या घटनेतील संशयितांना अटक करण्यात आली.