मोहोळ तालुक्यातील मतदान केंद्रावर लाठीचार्ज; राष्ट्रवादीच्या युवानेत्याला अटक

Mohol
police
फोटो प्रातिनिधिक आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे. मतदानाच्या दरम्यान मोहोळ मतदारसंघातील खंडोबाची वाडी येथे घोळका करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यामध्ये दोन महिला, तीन पुरुष आणि एक लहान मुलगा जखमी झाला आहे. गोंधळ वाढल्याने पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला. याप्रकरणी माजी आमदार राजन पाटील यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादीचे युवा नेते बाळराजे पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन मोहोळ पोलिस ठाण्यात बसवून ठेवले होते.

मात्र याची माहिती मिळताच माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि माजी आमदार राजन पाटील मोहोळ पोलीस ठाण्यात दाखल झाले. तेथे त्यांनी ठिय्या मारल्यानंतर बाळराजे यांची सुटका करण्यात आली. त्यानंतर शिंदे अन्य ठिकाणी रवाना झाले.

महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला आज सुरुवात झाली. यापैकी सोलापूर जिल्ह्यातील मतदान सकाळपासून चांगलेच गाजत आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेतला. काँग्रेस किंवा वंचित बहुजन आघाडीचे बटन दाबले तरी मतदान भाजपला जात असल्याचा आरोप दोन्ही नेत्यांनी केला. त्यातच मोहोळ तालुक्यात लाठीचार्जची घटना घडली आहे.

महाराष्ट्रात आज दुसऱ्या टप्प्यासाठी १० मतदारसंघात मतदान पार पडत आहे. बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातुर आणि सोलापूर या मतदारसंघात आज मतदान होत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here