घरताज्या घडामोडीखूशखबर! राज्यात १२ हजार ५०० पोलिसांची भरती, मंत्रिमंडळाचा निर्णय!

खूशखबर! राज्यात १२ हजार ५०० पोलिसांची भरती, मंत्रिमंडळाचा निर्णय!

Subscribe

गेल्या ६ महिन्यांपासून राज्यात कोरोनामुळे सगळ्यांचच आर्थिक गणित कोलमडलेलं असताना आता राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यामध्ये तब्बल १२ हजार ५०० पोलिसांची नव्याने भरती केली जाणार आहे. यासंदर्भात आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला आहे. बैठक झाल्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यामुळे राज्यात पोलीस भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी ही दिलासादायक आणि आनंदाची बातमी ठरली आहे. कोरोना काळात राज्याची आर्थिक स्थिती खालावत चाललेली असताना अशा प्रकारचा निर्णय होणं ही आनंदाची बाब असल्याची प्रतिक्रिया आता पोलीस भरतीसाठी इच्छुक असलेल्यांमधून उमटू लागली आहे.

आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महाराष्ट्रात १२ हजार ५०० पोलिसांची नव्याने भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने पोलीस भरती होणार आहे. या भरतीची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार असून त्यासंदर्भात माहिती जाहीर केली जाईल. राज्यातल्या शहरी आणि ग्रामीण भागातील तरुण-तरुणींना याद्वारे पोलिसात भरती होण्याची संधी मिळणार आहे.

अनिल देशमुख, गृहमंत्री

- Advertisement -

या भरतीमध्ये पोलीस शिपाई संवर्गातील १२ हजार ५२८ पदे १०० टक्के भरण्यात येत आहेत. यासंदर्भात वित्त विभागाच्या ४ मे २०२० च्या शासन निर्णयातून सूट देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने सामाजिक व शैक्षणिक दृष्टया मागासवर्गाच्या आरक्षणास दिलेल्या अंतरिम स्थगितीच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणी सामान्य प्रशासन विभाग व विधी व न्याय विभागाच्या सल्ल्यानुसार पुढील कार्यवाही करण्याचे मंत्रिमंडळाने गृह विभागाला निर्देशित केले आहे. पोलीस शिपाई संवर्गातील २०१९ या वर्षामधील ५२९७ पदे तसेच २०२० या वर्षामधील ६७२६ पदे व मिरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयासाठी निर्माण करण्यात आलेल्या पहिल्या टप्यातील नवनिर्मित ९७५ पदांपैकी पोलीस शिपाई संवर्गातील ५०५ अशी एकूण १२ हजार ५२८ पदे १०० टक्के भरण्यात येणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -