कोरोना व्हायरस : मजुरांची बेकायदेशीरपणे वाहतुक करणारा ट्रक पोलिसांनी पकडला!

जेएनपीटीत अडकून पडलेल्या या मजूरांची बेकायदेशीरपणे वाहतूक करून त्यांना बाहेर घेवून जाण्याचा प्रयत्न या चालकाकडून करण्यात येत होता.

Uran

राजकुमार भगत

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र सोशल डिस्टन्सिंग आणि गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात येत असताना बेकायदेशीरपणे १०० मजूरांची ट्रेलरवरून वाहतूक करणाऱ्या चालकाविरोधात उरण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेएनपीटीत अडकून पडलेल्या या मजूरांची बेकायदेशीरपणे
वाहतूक करून त्यांना बाहेर घेवून जाण्याचा प्रयत्न या चालकाकडून करण्यात येत होता. अब्दूल कयूम गोस (५०) रा. उत्तरप्रदेश असे या आरोपीचे नाव आहे.

उरण तालुक्यातील जेएनपीटी परिसरात हजारो परप्रांतिय मजूर अडकून पडले आहेत. आपल्या घरी जाण्यासाठी त्यांना कोणतेही वाहन मिळत नसल्यामुळे आणि येथे खाण्याचे वांदे झाल्यामुळे हे मजूर मिळेल त्या मार्गाने व वाहनाने आपल्या घरी जाण्यासाठी निघाले आहेत. सोमवारी रात्री
१०.३० वाजण्याच्या सुमारास एका ट्रेलरवर बसून १०० मजूर आपल्या घराकडे जाण्यास निघाले होते. पोलिसांच्या गस्ती दरम्यान चिर्ले टोलनाक्याजवळ हा ट्रक अडवून त्याच्यातील सर्व मजूरांना उतरवून त्यांना या धोकादायक प्रवासाबाबत माहिती दिली आणि चालकाविरोधात महाराष्ट्र कोव्हीड-19 उपाय योजना अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.