घरमहाराष्ट्रऐन लग्न सराईत निवडणुकीचा प्रचार; पुढाऱ्यांची मात्र फरफट

ऐन लग्न सराईत निवडणुकीचा प्रचार; पुढाऱ्यांची मात्र फरफट

Subscribe

नागरी विकासाच्या कामांपेक्षा मतदार संघातील नागरिकांच्या बारशापासून बाराव्यापर्यंत सुखदु:खाच्या प्रसंगी हजेरी लावण्यास राजकीय नेतेमंडळी प्राधान्य देत असतात. कारण तो त्यांच्या हुकमी जनसंपर्काचा एक भाग असतो. लग्न ही त्यातील एक महत्त्वाची घटना. विभागाचे नगरसेवक किंवा आमदारांनी लग्नाला हजेरी लावली की त्या कुटुंबालाही समाधान वाटत असते. त्यामुळेच राजकीय नेते मतदार संघातील लग्न सहसा चुकवीत नाहीत. यंदा मात्र ऐन निवडणुकीच्या हंगामात सलग लग्नाचे मुहुर्त आल्याने नेत्यांची चांगलीच दमछाक होऊ लागली आहे. निवडणुकीचा प्रचार करायचा की लग्नाला हजेरी लावायची, असा प्रश्न त्यांना पडू लागला आहे.

मुंबई-ठाणे परिसरात येत्या २९ एप्रिल रोजी निवडणुका आहेत. त्याचा प्रचार सध्या ऐन भरात आला आहे. त्यात सलग लग्नाचे मुहुर्त आल्याने राजकीय नेत्यांची पंचाईत होऊ लागली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर काही महिन्यातच विधानसभा निवडणुका येणार आहेत. त्यामुळे लोकसभेचा प्रसार करता करता विद्यामान आमदारांना आपल्या भवितव्याचीही काळजी आहे. लग्नसोहळा ही राजकीय नेत्यांना लोकांच्यात मिसळण्याची मोठी संधी असते. लोकप्रतिनिधी ही संधी साधतात. एकाच दिवशी अनेक मुहुर्त असले तरी त्यातील काहींना हळदी समारंभाला, काहींच्या लग्नाला तर काही़ ठिकाणी पुजेला हजेरी लावण्याचा प्रयत्न नेतेमंडळी करतात. यंदा निवडणुकीच्या दहा दिवस आधी जवळपास दररोज लग्नाचे मुहुर्त आहेत. आमदारांना किमान तीन ते दहा लग्नांना उपस्थित रहावेच, लागते.

सर्वसाधारणपणे शाळा-महाविद्याालयांना सुट्ट्या पडल्या की लग्नाचे मुहुर्त ठरविले जातात. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक मुहूर्त आहेत. निवडणूक काळात तर हे प्रमाण अधिक आहे. १९ एप्रिल ते २८ एप्रिल दरम्यान २१ एप्रिल आणि २५ एप्रिलचा अपवाद वगळता दररोज मुहुर्त आहेत.
– दा.कृ.सोमण, पंचागकर्ते
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -