घरमहाराष्ट्रवाढत्या प्रदूषणाने रोह्याची गंगा नदी ‘हो गयी मैली’ !

वाढत्या प्रदूषणाने रोह्याची गंगा नदी ‘हो गयी मैली’ !

Subscribe

प्रदूषण मंडळाची डोळेझाक

परिसरातील धाटाव औद्योगिक वसाहती लगत वाहणारी आणि कुंडलिका नदीला मिळणारी उपनदी गंगा गेले महिनाभर वाहणार्‍या रसायनयुक्त प्रदूषित पाण्यामुळे मृतावस्थेत गेली असल्याचे विदारक चित्र आहे. या नदीच्या किनार्‍यावर वसलेली रोठ बुद्रुक आणि खुर्द गावांतील नागरिक या रासायनिक सांडपाण्याच्या दुर्गंधीचा, तसेच त्यामुळे पसरणार्‍या रोगराईचा सामना करीत आहेत.

औद्योगिक वसाहत स्थापन झाल्यापासून शहर आणि परिसराला प्रदूषणाचा विळखा पडला आहे. जल प्रदूषण तर मोठी समस्या ठरत असून, एखादी विपरित घटना घडल्यानंतर तात्पुरती मलमपट्टी करून विषय सोडून दिला जात असल्याने अनेक कारखानदारांचेही आयतेच फावत आहे. योग्य प्रक्रियेविना सांडपाणी थेट नाले किंवा नदीत सोडले जात असल्या कारणाने प्रदूषित होणार्‍या पाण्यामुळे नदीमधील मासे नष्ट होत असून, जे काही जिवंत आहेत ते खाण्यास धोकादायक ठरत आहेत. स्थानिकांच्या पाळीव जनावरांसाठी हे पाणी पिणे जीवावर बेतत असून, अनेकांची दुभती आणि उमदी जनावरे दगावली आहेत.

- Advertisement -

आरआयए (रोहे इंडस्ट्रिज असोसिएशन), स्थानिक प्रशासन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडे स्थानिकांनी तक्रारी करीत कित्येकदा आपल्या व्यथा मांडल्या आहेत. मात्र थातूरमातूर आश्वासनांच्या पलीकडे कोणतीही कारवाई आजपर्यंत न झाल्यामुळे दोन्ही गावांतील ग्रामस्थ पुरते हतबल झाले आहेत. तक्रारीनंतर पहाणीसाठी येणारे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी कारखानदारांचा अलिशान पाहुणचार झोडण्यातच मग्न असल्याचा आरोप अनेकवेळा झाला आहे. कुंडलिका नदीला मिळणार्‍या गंगा या उपनदी गटारगंगा झाल्याने ग्रामस्थ हळहळ व्यक्त करीत आहेत. कारिवणे, तळाघरच्या डोंगरमाथ्यावरून उगम पावणारी ही नदी पुढे महादेव वाडी, रोठ बुद्रुक, रोठ खुर्द, वरसे या गावांच्या बाजूने येत कुंडलिका नदीला मिळते. याच नदीवर बांध घालून पाणी अडवत त्या भागातील शेतकरी कलिंगड आणि अन्य भाजीपाल्याची लागवड, तसेच मासेमारी करीत आले आहेत.

गंगा नदीमध्ये गेल्या महिनाभरापासून दुर्गंधीयुक्त काळ्या रंगाचे रासायनिक सांडपाणी मोठ्या प्रमाणात मिसळत आहे. स्थानिकांच्या तक्रारी आणि प्रसारमाध्यमांनी कान उपटल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळ, स्थानिक प्रशासन आणि आरआयएच्या अधिकारी, पदाधिकार्‍यांनी पाहणी करून नदी स्वच्छ करण्याचे आश्वासन दिले. मात्र महिना उलटून गेला तरी कोणतीही कारवाई न होता सांडपाण्याचे प्रमाण उलट दिवसेंदिवस वाढतच आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहाय्यक प्रादेशिक अधिकारी कुकडे यांच्याशी संपर्क साधला असता नदीची पाहणी करून पाण्याचे नमुने तपासणीकरिता घेणार असून, दोषींवर कारवाई करू असे सांगितले.

- Advertisement -

राज्याच्या पर्यावरण खात्याचा पदभार स्वीकारलेले आणि स्वतः पर्यावरणप्रेमी असलेले आदित्य ठाकरे यांनी वेळ काढून संपूर्ण दिवस धाटाव औद्योगिक परिसरासाठी राखीव ठेवून प्रत्यक्ष पहाणी करावी, अशी अपेक्षा आता व्यक्त केली जात आहे. संबंधित विभागाचे अधिकारी पहाणीसाठी येतात म्हणजे नेमके काय करतात, याची झाडाझडतीही ठाकरे यांनी घ्यावी, असेही बोलले जात आहे. भूमिपुत्रांच्या आरोग्याशी खेळणार्‍यांना पर्यावरणमंत्र्यांनी एकदा जमालगोटा द्यावाच, अशी परिस्थिती आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -