पॉलिटेक्निक प्रवेशप्रक्रिया १० ऑगस्टपासून सुरू

विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने २५ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार असून, तात्पुरती गुणवत्ता यादी २८ ऑगस्टला तर २ सप्टेंबरला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे.

पॉलिटेक्निक प्रथम वर्षाला विद्यार्थ्यांनी अधिकाधिक प्रवेश घ्यावे, यासाठी गतवर्षी दहावीच्या निकालापूर्वी तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत नोंदणी प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली होती. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीचा निकाल लागल्यानंतरही प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली नाही. परंतु तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत सोमवारपासून पॉलिटेक्निक प्रथम वर्ष प्रवेश प्रकियेला प्रारंभ होत आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने २५ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार असून, तात्पुरती गुणवत्ता यादी २८ ऑगस्टला तर २ सप्टेंबरला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला प्राधान्य दिले जात असताना तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे राबवण्यात येणार्‍या पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रियाही पूर्णत: ऑनलाईन राबवण्यात येणार आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी एफसी केंद्रावर विद्यार्थी, पालकांची गर्दी टाळण्यासाठी यावर्षी प्रथमच ई स्कूटनीची संकल्पना राबवण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी करणे, कागदपत्रांच्या छायाप्रती अपलोड करणे, कागदपत्रांची पडताळणी करणे व अर्ज निश्चिती करणे, नेटबँकिंगद्वारे प्रवेश शुल्क भरणे या सर्व बाबी ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या आहेत. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने http://www.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर १० ऑगस्टपासून अर्ज सादर करावयाचे आहेत. विद्यार्थ्यांना २५ ऑगस्टपर्यंत अर्ज भरता येणार आहे. याचदरम्यान विद्यार्थ्यांना कागदपत्रांची ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष सुविधा केंद्रावर जाऊन पडताळणी करता येणार आहे. त्यानंतर २८ ऑगस्टला तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर केल्यानंतर २९ ते ३१ ऑगस्टदरम्यान विद्यार्थ्यांना तक्रार करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. अंतिम गुणवत्ता यादी २ सप्टेंबरला जाहीर करण्यात येणार आहे.

असे असेल वेळापत्रक

  • १० ते २५ ऑगस्ट ऑनलाईन अर्ज नोंदणी करणे, कागदपत्रे स्कॅन छायाप्रती अपलोड करणे आणि छाननीची योग्य पद्धत निवडणे
  • ११ ते २५ ऑगस्ट – कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज भरल्याची निश्चिती करणे
  • २८ ऑगस्ट – तात्पुरती गुणवत्ता यादी प्रदर्शित करणे
  • २९ ते ३१ ऑगस्ट तात्पुरत्या गुणवत्ता याद्यांमध्ये विद्यार्थ्यांना तक्रार असल्यास , तक्रार करणे
  • २ सप्टेंबर – अंतिम गुणवत्ता याद्या प्रदर्शित करणे