मातीकाम करणारे कारागीर दुर्मिळ !

गणेशमूर्ती कारखानदारांपुढे पेच

Mumbai

ज्या काळात आधुनिक यंत्रणा नव्हती अशा काळात शाडूच्या मातीवर कलाकुसर करीत श्री गणेशाच्या आकर्षक मूर्ती ग्रामीण भागात कलाकार तयार करीत असत. आज असे काम करणारे कलाकार दुर्मीळ झाले आहेत. यामुळे गणेशमूर्ती कारखान्यांपुढे एक अवघड समस्या निर्माण होऊन बसली आहे.गेली अनेक पिढ्या गणेश मूर्ती या शाडूच्या मातीपासून तयार केल्या जात होत्या. त्यावर केली जाणारी कलाकुसर देखील हाताने केली जात होती. मूर्ती आकर्षक करण्याकडे कलाकार स्वतःला झोकून देत. मूर्ती आकर्षक आणि रेखीव असणे हे त्या कलाकाराचे कसब समजले जात होते. बदलत्या काळानुसार यामध्ये बदल होत गेले. मूर्तींची संख्या, उंची आणि दरातदेखील वाढ झाली. झटपट मूर्ती तयार करणे आधुनिक यंत्रणेने शक्य झाले. याकरिता प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर होऊ लागला आहे. यामुळे मूर्तीवर केले जाणारे रेखीव काम साच्यातच तयार होत आहे. याला वेगळी मेहनत करण्याची गरज उरली नाही. शिवाय या मूर्ती वजनाला आणि किमतीला देखील कमी आहेत. मात्र पर्यावरणाला घातक असल्याने या मूर्ती वापरण्यावर निर्बंध येत आहेत. असे असले तरी माती काम आणि मातीच्या मूर्तीवर कलाकुसर करणारे कामगार मिळत नसल्याने नाईलाजस्तव प्लास्टर ऑफ पॅरिसकडे वळणे बहुसंख्य मूर्तिकारांना भाग पडत आहे.

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने मूर्ती तयार करण्याला वेग आला आहे. ग्रामीण भागात साधारण पाच ते सहा गावांपैकी एकाच गावात एकच गणेश मूर्तिकार आहे. महाड शहरात दहाच्या आत, तर ग्रामीण भागात किमान पंधरा गणेश मूर्तिकार आढळून येतील. अनेक पिढ्या हे लोक हाच व्यवसाय करीत आले आहेत. मातीत रेखीव काम करून मूर्तीला जिवंतपणा आणण्याचे काम हे कारागीर करत होते. मात्र नवीन पिढी यातून दूर होत गेली आहे. ग्रामीण भागातील अनेक कारागिरांनी आपल्या वार्षिक मूर्ती संख्येत वाढ केलेली नाही. ज्या मूर्ती अनेक वर्षांपासून सुरू आहेत तितक्याच तयार करून देणे इतकेच काम आता शिल्लक राहिले आहे.

माती काम करताना साच्यामध्ये प्रमाणात माती भरणे, त्यानंतर साचा काढून घेणे, मूर्तीला आकर्षक बनविण्यासाठी रेखीव काम करणे आदीसाठी वेळ देऊन मेहनत करावी लागत आहे. नव्या पिढीमध्ये ही क्षमता राहिलेली नाही. झटपट काम, कमी मेहनत आणि अधिक पैसा यामुळे माती कारागीर तयार झाले नाहीत. शाडूची माती ही प्रामुख्याने गुजरात राज्यातून येते. यातून तयार होणारी मूर्ती ही आकर्षक आणि वजनदार असते. याउलट प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पाण्यात न विरघळणार्‍या आणि हलक्या असतात. शाडूच्या मातीला असलेला साचा हा वेगवेगळ्या भागात असतो. हे सर्व भाग तयार करून मग मूर्ती तयार केली जाते. फार कमी प्रमाणात तरुण कारागीर या कारखान्यांतून दिसून येत आहेत ते हा व्यवसाय म्हणून नव्हे तर केवळ हौस आणि घरातील माणसाला मदत म्हणून काम करीत असल्याचे ग्रामीण मूर्तिकार सदानंद देवगिरकर यांनी सांगितले.

शाडूच्या मातीला प्राधान्य देतो मात्र बदलत्या काळानुसार कारगीर मिळणे कठीण झाले आहे. शिवाय मोठ्या शहरात जो दर मिळतो तो दर कितीही मेहनत केली तरी ग्रामीण भागात मिळत नसल्याचे मूर्तिकार गिरीश साळी यांनी स्पष्ट केले.