भाजप-संघाच्या जीवावर निवडून येणारे इतरांना शिकवतायत; प्रसाद लाड यांचा खडसेंवर घणाघात

भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले एकनाथ खडसे आणि भाजपचे उपाध्यक्ष प्रसाद लाड यांच्यातील शाब्दिक वॉर अद्याप सुरुच आहे. पक्षाने माझ्या मुलीला हरवले, असा पुन्हा एकदा आरोप एकनाथ खडसे यांनी केला. शिवाय, जनतेने मला सलग सहा वेळा निवडून दिले, प्रसाद लाड यांनी जनतेमधून किमान एकदा तरी निवडून येऊन दाखवावे” असे खुले आव्हान एकनाथ खडसे यांनी दिले होते. याला उत्तर देताना प्रसाद लाड यांनी ट्विट करत एकनाथ खडसेंवर हल्लाबोल केला आहे. भाजप-संघाच्या जीवावर निवडणून येणारे इतरांना शिकवत आहेत, असा घणाघात केला आहे. तसेच, मी नक्कीच स्वतः ७ वेळा निवडून येईन याची मला खात्री आहे, असे म्हटले आहे.

“आजवरच्या राजकारणात भाजप संघटन आणि रा. स्व. संघाच्या जीवावर निवडून येणारे स्वतःच्या मुलीला निवडून आणू शकले नाहीत. तरीही पक्ष नेतृत्वाला दोष देऊन पक्ष त्याग केला. ज्या पक्षाने एवढे दिले, अटलजी आणि मोदींच्या जीवावर निवडून येऊन पदे उपभोगली, तेच नेते आता इतरांना शिकवत आहेत,” असे ट्विट प्रसाद लाड यांनी केले आहे. प्रसाद लाड एवढ्यावरच न थांबता “स्वतःची एवढी ताकद होती, तर स्वतःच्या मुलीला का निवडून आणू शकले नाहीत?” असा सवाल देखील एकनाथ खडसेंना केला आहे.

प्रसाद लाड यांनी एकदा तरी जनतेतून निवडून यावं

एकनाथ खडसे यांच्यात इतकीच ताकद होती, तर मग मुक्ताईनगरमधून ते स्वत:च्या मुलीला का निवडून आणू शकले नाहीत? असा सवाल भाजप नेते प्रसाद लाड यांनी उपस्थित केला होता. याला प्रत्युत्तर देताना मंगळवारी एकनाथ खडसे यांनी प्रसाद लाड यांना आव्हान दिले. जनतेने मला सलग सहा वेळा निवडून दिले, प्रसाद लाड यांनी जनतेमधून किमान एकदा तरी निवडून येऊन दाखवावे, असे खुले आव्हान राष्ट्रवादीत प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिले होते.