घरताज्या घडामोडीभाजपचा मुंबई अध्यक्षही बदलणार? प्रसाद लाड यांच्या नावाची चर्चा!

भाजपचा मुंबई अध्यक्षही बदलणार? प्रसाद लाड यांच्या नावाची चर्चा!

Subscribe

भाजप प्रदेशाध्यक्षपदाची निवड झाल्यानंतर मुंबई अध्यक्ष देखील बदलणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मंगलप्रभात लोढा यांच्या जागी प्रसाद लाड यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीमध्ये १०५ जागा जिंकूनही सत्तेपासून दूर राहिलेल्या भाजपमध्ये आता काही बदल होणार असून, भाजप आता मुंबई अध्यक्षही बदलण्याचा विचार करत आहे. मुंबई अध्यक्ष म्हणून विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप आमदार मंगल प्रभात लोढा यांची निवड करण्यात आली होती. मात्र, आता सत्ता गेल्याने, तसेच आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक लक्षात घेता भाजपला मुंबई अध्यक्षपदी आक्रमक चेहरा द्यायचा आहे. त्यामुळे मुंबई अध्यक्षपदासाठी प्रसाद लाड यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असून, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची देखील प्रसाद लाड यांच्या नावाला पसंती आहे.

म्हणून बदलणार मुंबई अध्यक्ष…

शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊन राज्यात सत्ता स्थापन केली. त्यामुळे भविष्यात जर शिवसेनेला अंगावर घ्यायचे असेल तर तोडीस तोड मुंबई अध्यक्ष असावा, असे भाजपमधील काही नेत्यांना वाटते. त्यामुळे शांत स्वभावाच्या मंगलप्रभात लोढा यांच्या ऐवजी आक्रमक प्रसाद लाड यांची मुंबई अध्यक्षपदी निवड करून मुंबईत भाजपला बळकटी देण्याचा विचार सुरू आहे. एवढंच नाही, तर प्रसाद लाड हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे जर भाजपला भविष्यात पुन्हा ‘मिशन लोटस’ करायचे असेल तर प्रसाद लाड महत्त्वाची भूमिका निभावू शकतात. या सर्व बाबींचा विचार केल्यास प्रसाद लाड यांची मुंबई अध्यक्षपदी निवड होऊ शकते, असे भाजपमधील एका नेत्याने ‘आपलं महानगर’शी खासगीत बोलताना सांगितले. दरम्यान, आशिष शेलार यांच्या देखील नावाची चर्चा पक्षातील बैठकीत झाली. मात्र शेलार यांनी पुन्हा मुंबई अध्यक्ष होण्यास नकार दिल्याचे समजते. विशेष बाब म्हणजे भाजप मुंबई अध्यक्षपदाच्या शर्यतीत योगेश सागर देखील आहेत.

- Advertisement -

प्रदेशाध्यक्ष निवडीनंतर मुंबई अध्यक्षाचा होणार विचार

१६ फेब्रुवारीला नवी मुंबई सिडको येथे भाजपची कार्यकारिणी बैठक होत असून, या बैठकीत भाजप प्रदेशाध्यक्षाची निवड होणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे भाजपच्या प्रदेशाध्यक्षांची निवड करणार असून, चंद्रकांत पाटील यांची पुन्हा भाजप प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागणार आहे. ही निवड झाल्यानंतर मुंबई अध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरू होतील, अशी माहिती मिळत आहे.


हेही वाचा – देवेंद्र फडणवीस बनणार केंद्रीय अर्थमंत्री? आतातरी अर्थव्यवस्थेला गती मिळेल का?
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -