दर्याचे राजे मासेमारीसाठी रवाना!

यंदाचा हंगाम सुगीचा जाण्याची अपेक्षा

Mumbai

गेल्या वर्षी एका पाठोपाठ आलेली नैसर्गिक संकटे आणि चार महिन्यांपूर्वी सुरू झालेली कोरोना महामारी या कारणाने एकूणच व्यवसायाला आलेल्या मरगळीने हवालदिल झालेला मच्छीमार मरगळ झटकून नव्या जोमाने आणि उत्साहाने शनिवारी मासेमारीसाठी रवाना झाला. यंदाच्या हंगामाचा यामुळे प्रारंभ झाला असून, सर्वांनीच हा हंगाम नक्की सुगीचा जाईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

कोकणाला लाभलेल्या ७२० सागरी किनार्‍यांवर सुमारे पाच लाख मच्छीमार खोल समुद्रात मासेमारी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. पकडलेली मच्छी मुंबई येथील मुख्य बाजारात विकून त्यातून चांगल्यापैकी आर्थिक फायदा मिळवत असतो. परंतु मागील हंगाम अनेक आपत्तींमुळे प्रचंड नुकसानीत गेला. त्यानंतर शासनाच्या नियमाप्रमाणे १ जून ते ३१ जुलैपर्यंत मासेमारी बंद ठेवण्यात येत असते. नैसर्गिक परिस्थिती अनुकूल असल्याने बोटी मासेमारीसाठी रवाना झाल्या. शहरासह तालुक्यातील आगरदांडा, राजपुरी, एकदरा, बोर्ली, कोर्लई, मजगाव, नांदगाव आदी ठिकाणी ६५० यांत्रिक बोटी आहेत.

रवाना होण्यापूर्वी बोटींची दुरुस्ती, रंगकाम पूर्ण करण्यात आले होते. जमिनीपासूनचा संपर्क तुटत असल्याने सर्व बोटींमध्ये तांदूळ, तेल, मसाले, तसेच रॉकेल, बर्फ असे साहित्य सोबत नेण्यात येते. कोरोनामुळे मुंबईमधील बाजार खुला झालेला नसल्याने तो लवकर सुरू व्हावा, अशी अपेक्षा मच्छीमारांनी व्यक्त केली आहे. कर्जाचे ओझे डोक्यावर असल्याने शासनाने आता सकारात्मक भूमिका घ्यावी, असेही मत व्यक्त केले.

समुद्रात मासे पकडण्यासाठी एका बोटीला ६० ते ७० हजार रुपये खर्च होतो. बर्फ, डिझेल, अन्नधान्य यावर हा खर्च होत असतो. मुंबई मच्छी बाजार उपलब्ध होत नसेल तर हा खर्च डोक्यावर बसून सर्वच मच्छीमार संकटात येतील. स्थानिक बाजारात भाव मिळत नसल्याने डिझेलचाही खर्च निघत नाही. शासनाने मासळी विक्रीसाठी कुलाबा येथील मोठा मासळी बाजार उपलब्ध करू दिला पाहिजे. तसेच लॉकडाऊनही आता कायमचा मागे घेतला पाहिजे.
– दशरथ मकू, मच्छीमार

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here