खासगी डॉक्टर्स संपावर जाणार, IMA चा सरकारला ७ दिवसांचा अल्टिमेटम

सरकारकडून वैद्यकीय क्षेत्राला गुन्हेगाराप्रमाणे वागणूक दिली जात असल्याचा निषेध

IMA

कोरोनासारख्या संकटकाळात डॉक्टर्ससोबतच इतर वैद्यकीय कर्मचारी जीव धोक्यात घालून रूग्णसेवा करत आहेत. असे असतानाही सरकारकडून वैद्यकीय क्षेत्राला गुन्हेगाराप्रमाणे वागणूक दिली जातेय. या वागणुकीच्या निषेधार्थ आणि लादलेल्या निर्बंधांविरोधात खासगी डॉक्टर्स संपावर जाणार आहे. आयएमए या डॉक्टरांच्या संघटनेने सात दिवसांत या सर्व घटनांत सुधारणा न झाल्यास संपाचा अल्टिमेटम दिला आहे.

डॉक्टरांनी कोट्यवधींचे कर्ज घेऊन हॉस्पिटल्स उभारली आहेत. वैद्यकीय साधनांवरचा खर्चही डॉक्टरांनाच करावा लागतोय. त्यामुळे सरकारी दरात उपचार करणे परवडणारे नाही. मात्र, सरकारकडून कायद्याच्या नावाने दबाव टाकला जातोय. सरकारने डॉक्टरांच्या मागण्यांबाबत निर्णय न घेतल्यास खासगी डॉक्टर संपावर जातील, असा निर्णय घेत आयएमए, नाशिकचे अध्यक्ष डॉ. समीर चंद्रात्रे यांनी सात दिवसांचा अल्टिमेटम दिला.