घरमहाराष्ट्रराखीव उद्यानातून नेली खाजगी पाइलाइन

राखीव उद्यानातून नेली खाजगी पाइलाइन

Subscribe

शहराच्या लागत असलेले आणि डोमॅटरी सिटीत समाविष्ट असलेल्या ममदापूर गावात नागरीकरणामुळे मोठमोठे गृहप्रकल्प उभे राहत आहेत. त्या ठिकाणी उद्यानासाठी भूखंड राखीव ठेवण्यात आला आहे. एका बिल्डरने तेथून स्वतःच्या इमारतीसाठी पाइपलाइन नेण्याचा प्रताप केला आहे. यासाठी कोणाचीही परवानगी न घेता ही मनमानी केल्याने संतापलेल्या ग्रामस्थांनी हे काम बंद पाडले आहे.

मध्य रेल्वेच्या माध्यमातून उपनगरीय शहरांना नेरळ जोडले गेल्याने या ठिकाणी काहीच वर्षांत झपाट्याने नागरीकरण झाले आहे. वाढत्या नागरीकरणाचा विचार करीत शासनाच्या नगरविकास विभागाने या ठिकाणी नेरळ विकास संकुल प्राधिकरण लागू केले. या प्राधिकरणात नजिकच्या ममदापूर बोपेले, धामोते या गावांचादेखील समावेश केला. त्यामुळे अल्पावधीत या ठिकाणी मोठमोठे गृहप्रकल्प साकारण्यास सुरुवात झाली. त्यामध्ये ममदापूर येथे उद्यानासाठी दीड एकराचा भूखंड राखीव ठेवण्यात आला होता. ११ नोव्हेंबर २०१७ मध्ये उद्यान विकसित करण्यासाठी त्या भूखंडाचे उद्घाटनही करण्यात आले होते. असे असताना तेथे अमरदीप कन्स्ट्रक्शन या बांधकाम व्यावसायिकाचे सुमारे ३ इमारतींचे काम सुरू आहे.

- Advertisement -

त्यातील एका इमारतीला पाण्याच्या जोडणीसाठी या बिल्डरने उद्यान भूखंडाच्या मध्यात जेसीबीच्या सहाय्याने खड्डा खणून त्यातून पाण्याची लाइन नेली आहे. उद्यानाच्या मागील बाजूस अमरदीप या इमारतीला एक जोडणी देऊन पुढील दोन पाऊण इंची जोडणी दुसर्‍या इमारतीपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला गेला आहे. त्या इमारतीत एकूण ३४ सदनिका असणार आहेत. त्यामुळे पाण्याची कमतरता पडू नये म्हणून नेरळ ग्रामपंचायतीकडून अधिकृतरित्या ही जोडणी घेतल्याचे समजते. मुख्य म्हणजे राखीव असलेल्या भूखंडातून पाइपलाइन नेण्यासाठी कोणाचीही परवानगी घेण्याची गरज बिल्डरला वाटली नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

प्राधिकरणाची यासाठी परवानगी घेतलेली नाही. अशी परवानगीदेखील देता आली नसती. कारण ममदापूर येथील तो उद्यानासाठी राखीव भूखंड आहे. त्यामुळे झालेला प्रकार चुकीचा असून, संबधित बिल्डरला नोटीस पाठवून योग्य ती कारवाई केली जाईल.
-प्रवीण आचरेकर, तांत्रिक अधिकारी, नेरळ विकास प्राधिकरण

- Advertisement -

येथे स्थानिकांना पिण्यासाठी पाणी नाही. आमच्या मुलांची, महिलांची पाण्यासाठी फरफट सुरू असताना या बिल्डर लॉबीला पाणी मिळते. त्यातूनही ते राखीव जागेतून पाइपलाइन घेऊन चाललेत. त्यांना जे वाटेल ते हे करणार का? यांची मनमानी प्राधिकरण आणि ग्रामपंचायत का सहन करते? मात्र आम्ही गप्प बसणार नाही. जे चुकीचे आहे ते आम्ही तेथेच थांबविणार.
-सुनील सोनावळे, ममदापूर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -