घरमहाराष्ट्रमहावितरणची मनमानी

महावितरणची मनमानी

Subscribe

खासगी वाहतुकीसाठी जनता वेठीला

कर्जत तालुक्यातून जेएनपीटी बंदराकडे अजस्त्र ट्रक जात असल्याने त्यांची वाहतूक निर्धोक होण्यासाठी महावितरण कंपनी चक्क जनतेला वेठीस धरण्याचे काम करीत आहे. अलीकडच्या काही दिवसात डिकसळनंतर नेरळमध्येदेखील प्रचंड मोठ्या ट्रकच्या वाहतुकीसाठी वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. मात्र त्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नसल्याने नेरळकरांना रात्र अंधारात काढावी लागली.

मुरबाड (जि. ठाणे) येथील औद्योगिक वसाहतीमध्ये तयार करण्यात आलेले भले मोठे लोखंडी बॉयलर रस्ता मार्गाने उरणच्या जेएनपीटी बंदरात नेले जात आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून 11 लांबलचक ट्रॉली असलेल्या ट्रकचा प्रवास सुरू आहे. सध्या हे ट्रक कर्जत तालुक्यात पोहचले असून त्यांचा प्रवास मुरबाड-कर्जत रस्त्याने सुरू आहे. यातील तीन ट्रेलर ट्रक कडाव येथे उभे करून ठेवण्यात आले असून, सात ट्रक नेरळ गावाच्या पुढे उभे आहेत. काही ट्रक मुरबाड-कर्जत आणि कर्जत-कल्याण रस्त्याने प्रवास करीत आहेत. नोव्हेंबर महिन्यात ते ट्रक कर्जतजवळ किरवली येथे उभे करून ठेवण्यात आले होते. त्यांना रात्रीच्या वेळी प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली असून, मुंबईमधील खासगी वाहतूकदार ही वाहतूक करीत आहे.

- Advertisement -

मात्र रस्त्यावरून जाणार्‍या वीज वाहिन्या या 25 फूट उंचीच्या अजस्त्र ट्रकसाठी अडथळा ठरत आहेत. त्यामुळे वाहतूक ठेकेदाराने स्थानिक पातळीवर महावितरणच्या स्थानिक अधिकार्‍यांना ‘आपलेसे’ करून घेत आपला प्रवास सुरू ठेवला आहे. ठेकेदाराला खूश करण्यासाठी महावितरणकडून पूर्वसूचनेशिवाय रात्रीच्या वेळी वीज पुरवठा बंद केला जात आहे. झाडे तोडताना सोशल मीडियावरून खंडित वीज पुरवठ्याची माहिती देणारे महावितरणचे अधिकारी आता गप्प का आहेत, असा सवाल संतप्त जनता विचारत आहे. मध्यरात्री १२ ते पहाटे ३ च्या दरम्यान गेल्या काही दिवसांपासून होणार्‍या खंडित वीज पुरवठ्याचे गूढ जनतेला उकलल्याने ही मनमानी त्वरित थांबविण्याची मागणी केली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -