पराभवाचा वचपा आणि हॅटट्रिकचे वेध !

Mumbai
sunil tatkare win raigad lok sabha

उन्हाची तीव्रता वाढत असताना दुसरीकडे प्रचाराही शिगेला पोहचला आहे. 32 रायगड लोकसभा मतदारसंघातील सध्याची ही परिस्थिती आहे. गेल्या निवडणुकीप्रमाणेच यावेळी महाआघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस सुनील तटकरे, तर दुसर्‍या बाजूला महायुतीकडून शिवसेनेचे केंद्रीय अवजड उद्योग खात्याचे मंत्री व विद्यमान खासदार अनंत गीते या दोन मातब्बरांमध्ये लढत होत आहे. स्वाभाविक महाराष्ट्रातील लक्षवेधी लढतींपैकी ही एक लढत असणार आहे. दोघांकडेही साधन संपत्तीची कमतरता नसल्याने प्रचाराचा जोरदार धुरळा उडालेला आहे. तटकरे यांना मागील पराभवाचा वचपा काढायचा आहे, तर अनंत गीते यांना हॅटट्रिकचे वेध लागले आहेत.

2014 निवडणुकीत अवघ्या 2110 मतांनी पराभूत झालेल्या तटकरे यांनी यावेळी निवडून येण्याचा चंग बांधल्याने त्यांचा प्रचार सुरूवातीपासून आक्रमकपणे सुरू झालेला आहे. गीते यांनी गेल्या पाच वर्षांत कोणते असे भरीव काम केले ते दाखवा आणि रोख इनाम मिळवा, असे आव्हान देत तटकरे मतदारसंघ पिंजून काढत आहेत. गीते यांचा सुरूवातीचा संथ प्रचार आता काहीसा वेग पकडताना दिसत आहे. रायगड लोकसभा मतदारसंघ नव्याने पुनर्रचित झाल्यानंतर गीते हेच युतीचे उमेदवार आहेत. रत्नागिरीचे पार्सल इथे नको, म्हणून 2009 मध्ये विरोधी पक्षांनी गीते यांची हेटाळणी केली खरी, पण त्या निवडणुकीत रायगडचे असलेल्या दिग्गज काँग्रेस नेते बॅ. अ.र. अंतुले यांचा त्यांनी जवळजवळ दीड लाखांच्या मताने पराभव करून खळबळ उडवून दिली. गीते यांना 53.69 टक्के मते मिळाली, तर बॅ. अंतुले यांना 34.80 टक्के मते मिळाली.

गेल्या निवडणुकीत आघाडीकडून तटकरे रिंगणात उतरले. नेहमी कार्यकर्त्यांत रमणारा माणूस म्हणून ओळख असलेल्या तटकरे यांनी गीतेंचे आव्हान स्वीकारले, पण त्यांना दुसरे सुनील तटकरे आडवे आले. या तटकरे यांनी 9 हजारांपेक्षा जास्त मते घेतल्याने सुनील तटकरे यांचा घात झाला हे नक्की आहे. मात्र गीते यांचा झालेला विजय युतीने जल्लोष करावा असा नव्हता. त्याच्या आधीच्या निवडणुकीतील दीड लाखांची आघाडी कुठे आणि अवघ्या 2110 वर घसरलेले मताधिक्य कुठे, हा फरक नजरेत भरणारा आहे. म्हणूनच तटकरे यांचा यावेळी पराभव करणे गीते यांना कठीण प्रश्नपत्रिका सोडविण्यासारखे आहे. गीते मात्र आपण याही वेळेला निवडून येणार असल्याचे प्रचार सभांतून सांगत आहेत.

रायगड लोकसभा मतदारसंघात पेण, अलिबाग, श्रीवर्धन, महाड व रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली व गुहागर या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यापैकी दोन मतदारसंघात शेकाप, तीनमध्ये राष्ट्रवादी, तर एका मतदारसंघात शिवसेनेचा आमदार आहे. शिवाय शेकापचे जयंत पाटील व राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे विधान परिषदेेचे सदस्य आहेत. यावेळी शेकाप राष्ट्रवादीसोबत मनापासून उतरलेला दिसत आहे. तटकरे यांच्यासोबत 7 आमदारांची भलीभक्कम फौज आहे, तर गीते यांच्यासाठी महाडचे आमदार भरत गोगावले व रत्नागिरीतून पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी ताकद लावली आहे. 2014 मध्ये शेकापचे रमेश कदम हे उमेदवार होते, ज्यांनी 1 लाख 29 हजार 230 मते घेतली. खरं तर शेकापची अधिक मते असताना बाकीची गेली कुठे, यावर ही मते त्यावेळी गीते यांनी ‘मॅनेज’ केली असे युतीचे कार्यकर्ते आजही बोलतात.

यावेळी मात्र शेकापची सर्व मते तटकरे यांच्या पारड्यात पडणार याबद्दल कुणीही शंका घेऊ नये, असे जयंत पाटील यांनी सांगितले आहे. मधल्या काळात प्रत्येक पक्षातील असंतुष्टांशी गीते, तटकरे यांनी संपर्क साधला. परंतु त्याने फार मोठा फरक पडल्याचे आज तरी दिसत नाही. पेणमधून रवी पाटील काँग्रेसमधून भाजपात गेले. पाटील यांचा निर्णय त्यांच्या अनेक समर्थकांना मान्य नसल्याने तेे गीते यांना किती मतांची बेगमी करून देणार हा औत्सुक्याचा भाग आहे. गीते यांनी बॅ. अंतुले यांच्या मुलाला शिवसेनेत आणले तरी त्याचा प्रभाव श्रीवर्धन, म्हसळे वगळता इतरत्र फारसा पडणार नाही. तटकरे यांनी महाडचे माजी आमदार सुनील तटकरे व अलिबागचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांची नाराजी दूर केल्याने काँगे्रसची मते तटकरे यांच्याच पारड्यात जातील, असे सध्याचे चित्र आहे.

यावेळी तटकरे यांना अन्य एका सुनील तटकरेंचे आव्हान आहे. त्यामुळे आघाडीची कसोटी आहे. मागच्या निवडणुकीत ‘नोटा’नेही भाव खाल्ला होता. या निवडणुकीत प्रमुख उमेदवारांना ‘नोटा’ची डोकेदुखी ठरू शकते. या निवडणुकीतील जुळलेल्या समीकरणांमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीतील तडजोडींची बिजे पेरलेली आहेत. त्यामुळे तटकरे यांना मित्र पक्षांकडून फार मोठा दगाफटका होईल, हे संभवत नाही. मनसेचीही मते तटकरे यांच्याकडे वळतील हे स्पष्ट आहे. त्यामुळे तटकरे यांचे प्रचाराच्या मधल्या टप्प्यात तरी पारडे जड वाटत आहे; तर दुसरीकडे गीते यांना भाजपा कुठपर्यंत साथ देणार यावरही त्यांचे मताधिक्य अवलंबून आहे. सेनेत अंतर्गत कुरबुरी वाढल्या असल्या तरी त्याचा परिणाम होण्याची शक्यता धूसर आहे.

गेल्या पराभवाचा वचपा हे तटकरे यांच्यापुढील ध्येय आहे, तर लोकसभेतील सलग सातवा विजय व रायगडमधील हॅटट्रीक साधायचीच, हे गीते यांचे ध्येय आहे. येत्या 23 एप्रिल रोजी मतदारसंघातील 16 लाख 37 हजार 639 (8 लाख 03 हजार 072 पुरुष, तर 8 लाख 34 हजार 766 स्त्री) मतदार पसंतीच्या उमेदवारांना आपला कौल देतील. एकूण 16 उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत अनंत गीते व सुनील द. तटकरे अशीच आहे. 2014 च्या निवडणुकीत अपक्ष व इतरांच्या मतांची गोळाबेरीज 46 हजारपर्यंत पोहचली होती, तर नोटाला 20 हजार मतदारांनी पसंती दिली. यावेळी हा आकडा कुठपर्यंत जाणार याची अर्थातच उत्सुकता असणार आहे. त्यासाठी 23 मेपर्यंत वाट पहावी लागेल.

-उदय भिसे

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here