Saturday, August 8, 2020
Mumbai
27 C
घर महामुंबई सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना मातृशोक

सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना मातृशोक

Mumbai

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई अंकुशराव टोपे यांचे दीर्घ आजारामुळे निधन झाले आहे. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही महिन्यांपासून त्या आजारी होत्या. मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. ऐन कोरोनाच्या विषाणूच्या संकटकाळात आरोग्य मंत्री राजेश टोपे हे राज्याच्या स्वास्थ्याकडेही लक्ष देत होते. तसेच त्यांच्या आजारी आईकडेही पाहात होते.

गेल्या दोन-तीन दिवसात राजेश टोपे यांच्या आईची तब्येत खालवत होती. आज संध्याकाळपासून त्यांची तब्येत आणखीनच गंभीर झाली होती. राजेश टोपे हे सध्या मुंबईतच होते. मिळालेल्या माहितीनुसार जालना येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी ट्विटच्या माध्यमातून त्यांना आदरांजली वाहिली आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई टोपे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

राज्याचे आरोग्यमंत्री तथा राज्य मंत्रिमंडळातील माझे सहकारी सन्माननीय राजेश टोपे यांच्या मातोश्री श्रीमती शारदाताई अंकुशराव टोपे यांचे निधन हा आमच्या सर्वांसाठी मोठा धक्का आहे. मी आदरणीय शारदाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. शारदाताईंनी ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार स्वर्गीय अंकुशराव टोपे साहेबांना जीवनाच्या प्रत्येक पावलावर समर्थ साथ दिली. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासारखा कर्तव्यदक्ष सुपुत्र महाराष्ट्राला दिला. मी स्वर्गीय शारदाताईंच्या स्मृतींना वंदन करतो. कोरोनाच्या संकटकाळात संपूर्ण राज्याच्या आरोग्याची काळजी घेत असताना श्री. राजेश टोपे यांनी त्यांच्या मातोश्रींच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. त्यांनी मातोश्रींचीही तितक्याच तन्मयतेने काळजी घेतली. आज मी, राज्य मंत्रिमंडळातील सर्व सहकारी आणि राज्यातील समस्त जनता श्री. राजेश टोपे कुटुंबियांच्या दुःखात त्यांच्यासोबत आहोत. स्वर्गीय शारदाताई यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच प्रार्थना.
– अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य