‘गे डेटिंग App’वर झाली ओळख; भेटायला गेला आणि…पुढे जे घडले ते भयंकर…

'गे डेटिंग App'च्या माध्यमातून ओळख करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे.

pune 35 year old man robbed and extortion of rs 10000 via online dating app in kondhwa

सोशल नेटवर्किंग साईटवर अनेकांच्या ओळखी होतात. मात्र, ओळख झालेली व्यक्ती प्रत्यक्षात कशी असेल याचा अंदाज बांधणे कठीण असते. अशाच सोशल नेटवर्गिंग साईट ‘गे डेटिंग साईट’वर ओळख झालेल्या व्यक्तीला भेटणं एका ३५ वर्षीय तरुणाला चांगलंच महागात पडले आहे. ‘गे डेटिंग App’च्या माध्यमातून ओळख झालेल्या व्यक्तीला कोंढव्यातील शिवनेरीनगर येथे भेटायला बोलवून शस्त्राच्या धाकाने लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात तिघांच्या विरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमके काय घडले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; तक्रारदार व्यक्ती ही मूळची बीड जिल्ह्यातील असून त्यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्यांनी ‘ब्लूड गे App’वर लॉग इन केले होते. त्या दरम्यान त्यांची कृष्णा नावाच्या व्यक्तीशी ओळख झाली होती. त्यामुळे त्यांच्यामध्ये काही वेळ चॅटिंग झाली होती. त्यानंतर कृष्णाने तक्रारदाराला कोंढवा खुर्द येथील शिवनेरीनगर ठिकाणी १० वाजण्याच्या सुमारास भेटायला बोलावले होते. त्यानंतर एका ठिकाणी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर तक्रारदार यांना नेण्यात आले. तेथे त्यांना कपडे काढायला लावले आणि आरोपी कृष्णाने त्यांचे व्हिडीओ आणि फोटो काढायला सुरुवात केली. यामुळे घाबरलेल्या तक्रारदाराने तिथून निघून जाण्याचा प्रयत्न केला. त्याचा राग येऊन कृष्णाने फोन करून त्याच्या दोन साथीदारांना बोलावून घेतले. यातील एकाने हत्याराचा धाक दाखवत इतर दोघांनी हाताने मारहाण केली. यानंतर तक्रारदार यांना त्यांच्या ‘गुगल पे’द्वारे दहा हजार रुपये आरोपींना देण्यास भाग पाडले. यानंतर घाबरलेल्या तक्रारदार यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. याप्रकरणी तपास करून तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.


हेही वाचा – पतीने केली पत्नीची गळा दाबून हत्या