घरमहाराष्ट्रमोठा भाऊ भाजपकडून सेनेला सत्तेत छोटाच वाटा!

मोठा भाऊ भाजपकडून सेनेला सत्तेत छोटाच वाटा!

Subscribe

आदित्य ठाकरेंच्या उपमुख्यमंत्रीपदावरही प्रश्नचिन्ह

विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर आता गुरुवारच्या निकालाची सत्ताधार्‍यांना उत्सुकता लागली आहे. एक्झिट पोलचा निकाल पाहता महायुतीला मोठे यश मिळणार असून सत्तेत भाजपच मोठा भाऊ राहणार आहे. यामुळे २०१४ प्रमाणे आता पाच वर्षांनी मोठा भाऊ छोट्या भावाला शिवसेनेला सत्तेत छोटा वाटा देण्याची शक्यता आहे. महसूल, गृहमंत्री, सार्वजनिक बांधकाम, गृहनिर्माण आणि कृषी अशी महत्वाची खाती भाजपकडेच राहतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. विशेष म्हणजे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपमुख्यमंत्रीपदावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी युती करताना शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपदासह महत्वाची खाती देण्याचे भाजपने ठरवले होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात तशी बोलणी झाली होती. मात्र लोकसभा निवडणुकीत भाजपने बहुमतापेक्षा मोठा आकडा पार केल्यानंतर भाजपने आपला मुळ रंग दाखवताना केंद्रात सत्तेत शिवसेनेकडे साफ दुर्लक्ष केले.

- Advertisement -

एनडीएमध्ये भाजपनंतर सर्वाधिक १८ जागा मिळवणारा पक्ष असूनही शिवसेनेला अवजड उद्योग हे दुय्यम खाते मिळाले. अशीच स्थिती लोकसभेच्या १६ जागा जिंकणार्‍या नितीश कुमार यांच्या जनता दल संयुक्तची करण्याचे भाजपने ठरवले होते, पण नितीश कुमार यांनी मंत्रिमंडळात जाण्यास नकार देत आपला स्वतंत्र बाण दाखवून दिला होता. जे शिवसेनेला जमले नाही ते जनता दल संयुक्तने केले. ही बाब भाजप जाणून असून विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी युती केली असली तरी सत्तेत सन्मानजनक असा कुठलाही वाटा शिवसेनेला देण्याचे भाजपने ठरवलेले नाही.

शिवसेना-भाजपा युतीने विधानसभा निवडणूक एकत्र लढवली असली तरी शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद देण्याचा कोणताही शब्द दिलेला नाही, असे भाजपाचे महाराष्ट्र प्रभारी आणि पक्षाचे सरचिटणीस भूपेंद्र यादव यांनी स्पष्ट केले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भूपेंद्र यादव यांची प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली होती. शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद द्यायचे की नाही, याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील, असेही यादव यांनी स्पष्ट केले. विधानसभा निवडणुकीच्याआधी जागा वाटप आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रीपदावरुन दोन्ही पक्षांमधील मतभेद समोर आले होते. त्यादृष्टीने भूपेंद्र यादव यांचे विधान महत्वपूर्ण आहे.

- Advertisement -

२०१४ साली विधानसभा निवडणूक भाजप आणि शिवसेनेने वेगवेगळी लढवली होती. मुख्य म्हणजे भाजप १२३ जागा जिंकून पहिल्या क्रमाकांचा पक्ष ठरल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने न मागता भाजपला पाठिंबा दिला होता आणि तो घेत भाजपने ६३ जागा जिंकणार्‍या शिवसेनेला डिवचले होते. त्यानंतर ते सत्तेत आले खरे, पण सार्वजनिक बांधकाम (उपक्रम वगळून), आरोग्य, उद्योग, परिवहन आणि पर्यावरण अशी तुलनेत दुसर्‍या क्रमांकाची खाती देऊन फार महत्व दिले नव्हते.

मुख्य बाब म्हणजे फडणवीस यांनी मोठे निर्णय घेताना गेल्या पाच वर्षात शिवसेनेला फार महत्व दिले नव्हते. आताही एक्झिट पोलचे निकाल पाहता आणि तशीच स्थिती राहण्याची मोठी शक्यता असताना भाजप सत्तेचे मोठे दान शिवसेनेच्या पारड्यात टाकणार नाही.

वावड्यांना अर्थ नाही- डॉ. नीलम गोर्‍हे
जर तरला काहीच अर्थ नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात निवडणुकीआधी महत्वाची चर्चा झाली आहे. यामुळे आम्हाला सत्तेत किती आणि कसा वाटा मिळतो, उपमुख्यमंत्रीपद मिळणार की नाही, या वावड्यांना आम्ही महत्व देत नाही. निकालानंतर सर्व गोष्टी स्पष्ट होतील, असे मत शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोर्‍हे यांनी व्यक्त केले.

सहा एक्झिट पोलच्या सर्वेक्षणानुसार भाजप सरासरी १३० चा आकडा पार करताना दिसत असून शिवसेनेला ८० च्या आसपास जागा मिळतील, असे चित्र आहे. तसे झाले तर पुन्हा एकदा भाजप महत्वाची खाती आपल्याकडे ठेऊ शकतो. यातील सर्वात महत्वाची बाब म्हणजे एका सत्तेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अशी दोन पदे तयार करून भाजप स्वत:ची ताकद कमी करणार नाही, असे राजकीय निरीक्षकांकडून सांगितले जात आहे

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -