प्रश्न आयुक्तांच्या लौकिक आणि कार्यक्षमतेचा

परमवीर सिंह हे एक धडाकेबाज अधिकारी असलेले तरी त्यांचा मुद्देसूद मांडणीवर, प्रशासकीय कामकाजावर विश्वास नसल्याचंच या प्रकरणात लक्षात आलेलं आहे. अधिकाऱ्यांमध्ये असलेली गटबाजी आणि एकमेकांचा पाडाव करण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी यामुळे गेल्या काही काळात मुंबई पोलिसांची प्रतिमा मलीन झाली आहे. इतकी गेल्या तीन दशकात झाली नसेल. बत्तीस वर्षे पोलिस सेवेत असलेले परमवीर सिंग हे गेल्या तीन वर्षापासून आयुक्तपदावर डोळा ठेवून होते. त्यांना ते पद जानेवारीत मिळालं खरं पण त्या पदाचा लौकिक आणि कार्यक्षमता या दोन्ही गोष्टी परमविर सिंह यांना जमलेलं नाही असं खेदानं म्हणावं लागतंय.

Parambir Singh

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासात मुंबई पोलिसांच्या अब्रूचे धिंडवडे निघाले. आणि तेही गुन्हे तपास करण्यासाठी ‘य’ दर्जा असलेल्या बिहार पोलिसांकडून. अर्थात याला कारणीभूत कुणी एखादा छोटा शिपाई किंवा उपनिरीक्षक दर्जाचा कर्मचारी नव्हता तर थेट पोलीस आयुक्तांनी ज्या चुका केल्या त्या चुकांची किंमत संपूर्ण पोलीस दलाला चुकवावी लागली. साहजिकच त्याचा फटका आपल्या व्यक्तिगत आयुष्यात पोलिसांमधली गटबाजी, गुन्हेगारी टोळ्यांशी संबंध आणि संपर्क याच्या पासून कोसो हात दूर असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बसला. संपूर्ण राज्यात आणि देशभरातच नव्हे तर जगभरात उद्धव ठाकरेंवर याच विषयातून जोरदार टीकाटिप्पणी झाली आणि या सगळ्याला कारणीभूत ठरले ते मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग.

१९८८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेल्या आयुक्त परमवीर सिंह यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक तपासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याच परमवीर सिंग यांनी सुशांत सिंग राजपूत प्रकरण सुरुवातीलाच गुन्हे शाखेकडे हा तपास का दिला नाही असा अनेकांचा प्रश्न आहे. अर्थात त्याचं उत्तर परमवीरच देऊ शकतील. आज जो निष्कर्ष सीबीआय, एनसीबी या संस्था काढतायत हाच निष्कर्ष मुंबई पोलिसांनी काढला आहे. परमवीर सिंग यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक पत्रकार मित्रांच्या माध्यमातून स्वतःची कामगिरी सर्वदूर पसरवली. पण त्याच माध्यमां मधल्या मंडळींना अत्यंत जाणीवपूर्वक दूर ठेवण्याचे काम आयुक्तपदाच्या काळात परमवीर सिंग करत आहेत. वाहिनीचा‌ एखादा दुसरा पत्रकार सोडला तर प्रसार माध्यमांना त्यांनी चार हात लांब ठेवल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे अभिनेता सुशांत सिंग प्रकरणात पोलीस काहीतरी लपवत असल्याचा निष्कर्ष एका इंग्रजी वाहिनीवरून सातत्याने करण्यात आला आणि पोलिसांची प्रतिमा अत्यंत मलिन झाली. हे सगळे सुरू असतानाच परमवीर सिंग यांनी पोलीस दलात असलेल्या आपल्या काही सहकाऱ्यांबरोबर राग, द्वेष आणि लोभ हेच धरण्याचा आटोकाट प्रयत्न केला. वांद्रे येथील अभिनेत्याच्या मृत्युबाबतच्या तपासाचे तपशील क्षेत्रीय वरिष्ठांना न देता थेट आयुक्तांना देण्याचा सिंह यांचा आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना दिल्याने आयुक्तांनाच संशयाच्या धुक्यात आणून उभं केलं. परमवीर सिंह यांनी सुरुवातीपासूनच हे प्रकरण खूपच हलक्यात घेण्याचा प्रयत्न केला गेला असं जाणकार सांगतात. त्याआधीच त्यांच्याकडून मुंबईतल्या बदल्यांबाबत गोंधळ घातला म्हणून नाराज होऊन बदल्यांना स्थगिती ही दिली गेली होती.

याआधी शीना बोरा हत्या प्रकरणात पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी या हायप्रोफाईल दाम्पत्याशी असलेल्या दोस्तीमुळे तत्कालीन पोलीस आयुक्त राकेश मारिया हे तपासात सहभागी झाले. अशी ओरड विरोधकांनी केली. माध्यमांमधून तशी टीका झाली आणि १९८१ च्या बॅचचे तडफदार पोलीस अधिकारी असलेले राकेश मारिया हे बदनामीने महासंचालक होमगार्ड म्हणून बाजूला पडून निवृत्त झाले. इथे एक गोष्ट, बघा पीटर आणि राणी मुखर्जी हे दांपत्य इंग्रजी पत्रकारितेतील आणि कॉर्पोरेट विश्वातील बहुचर्चित आणि वादग्रस्त कुटुंब. सुशांत सिंग राजपूत प्रकरणात पत्रकारितेचे सर्वसाधारण संकेत सपशेल पायदळी तुडवत अत्यंत बटबटीत पत्रकारिता करणारे अर्नब गोस्वामी हेदेखील इंग्रजी वृत्तवाहिन्यांचे पत्रकार. आपल्याकडे इंग्रजी वृत्तवाहिन्या पाहण्याचे प्रमाण हे हिंदी आणि भाषिक वृत्तपत्रांपेक्षा जरी कमी असलं तरी सुखवस्तू , सेलिब्रिटी कुटुंबात या वाहिन्या आवर्जून पाहिल्या जातात. त्यामुळे इंग्रजी पत्रकारांना एक वेगळे ग्लॅमर अनुभवता येतं. पालघर मधल्या साधू प्रकरणानंतर सोनिया गांधी यांच्यावर शेलक्या शब्दांत टिका करणाऱ्या ‘रिपब्लिक’ च्या अर्णब गोस्वामी यांच्या गाडीवर काळी शाई फेकून निषेध व्यक्त केला गेला. या प्रकरणाची तक्रार देण्यासाठी डिलाईल रोडच्या एन. एम. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात पोहोचलेल्या अर्नब गोस्वामी यांना पोलिसांनी नऊ तास बसवून ठेवले. हा प्रकार खरंतर चीड आणणाराच होता. पोलिसांनी वरिष्ठांच्या सांगण्यानुसार सूडभावनेतून हा प्रकार केला होता. त्यानंतर घडलेल्या सुशांत सिंग राजपूत प्रकरणात अर्णब गोस्वामी यांनी आयुक्त परमवीर सिंग यांच्या वरचा राग काढताना सगळ्या मनस्तापाची जणू भरपाईच केली. त्यांच्या वाहिनीच्या वृत्तसंकलनातून आणि त्यांच्या स्वतःच्या भाषेतून आणि सादरीकरणातून त्यांनी जे केलं त्यातून जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवणारे मुंबई पोलीस आणि ठाकरे पितापुत्र हे दोघेही पुरते बदनाम झाले. खरंच इथले पोलीस इतके पक्षपाती कुचकामी आणि निरुपयोगी आहेत का हा प्रश्न पडावा अशी परिस्थिती पोलीस दलाच्या प्रमुखांनीच आणून ठेवली.

या सगळ्यातून सावरण्यासाठी पोलिसांना एका वेगळ्या मनोबलाची, मानसिक आधाराची गरज पडणारच आहे. कारण या शहरात सर्वाधिक काम जर कोण करत असेल तर ते मुंबई पोलीस. ‘रिपब्लिक’च्या अर्नब गोस्वामी यांनी बातमीदारी करताना सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मीडिया ट्रायल केलेली आहे त्याविरोधात १० निवृत्त आयपीएस अधिकारी न्यायालयात गेलेत. अर्णव आणि त्यांचे सहकारी यांनी केलेली पत्रकारिता आणि परमवीर सिंग यांच्या आदेशानुसारच त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेला पोलीस तपास या दोन्हीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

परमवीर सिंह हे एक धडाकेबाज अधिकारी असलेले तरी त्यांचा मुद्देसूद मांडणीवर, प्रशासकीय कामकाजावर विश्वास नसल्याचंच या प्रकरणात लक्षात आलेलं आहे. अधिकाऱ्यांमध्ये असलेली गटबाजी आणि एकमेकांचा पाडाव करण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी यामुळे गेल्या काही काळात मुंबई पोलिसांची प्रतिमा मलीन झाली आहे. इतकी गेल्या तीन दशकात झाली नसेल. बत्तीस वर्षे पोलिस सेवेत असलेले परमवीर सिंग हे गेल्या तीन वर्षापासून आयुक्तपदावर डोळा ठेवून होते. त्यांना ते पद जानेवारीत मिळालं खरं पण त्या पदाचा लौकिक आणि कार्यक्षमता या दोन्ही गोष्टी परमविर सिंह यांना जमलेलं नाही असं खेदानं म्हणावं लागतंय. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात गृहमंत्रीपद हे मुख्यमंत्र्यांनी व्यतिरिक्त नेत्याकडे ठेवलं जायचं. गुजरातमध्ये नरेंद्र मोदींनी ठेवलेला आदर्श महाराष्ट्रात २०१४ साली सत्तेवर आलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी कायम ठेवत गृहमंत्रीपद स्वतःकडेच ठेवले आणि आपल्या सोयीच्या अधिकाऱ्यांना हवी तशी व्यवस्था करून देत गृहमंत्री पदाचा कारभार हाकला.पण त्यामुळे एक सक्षम आणि कसदार पोलीस दल मात्र दिवसागणिक गटबाजीच्या आणि अंतर्गत लाथाळ्यांच्या चक्रव्यूहात अडकत गेलं. आता अनिल देशमुख यांच्याकडे गृहमंत्री पदाचा कारभार आहे प्रत्यक्षात हे खातं रिमोट कंट्रोलने शरद पवार चालवत असल्याचं स्पष्ट झालेलं आहे. मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाकडे जाण्याचा रस्ता हा ठाण्याच्या आयुक्तांच्या कार्यालयाकडून जातो. ठाण्यात पोलीस सेवा बजावताना अनेक अधिकारी वादात सापडलेत. त्यात परमवीर सिंग यांच्यासह प्रदीप शर्मा, रवींद्र आंग्रे, दत्ता घुले, अभिषेक त्रिमुखे असे अधिकारी वादात अडकले. मुंबईच्या शेजारी असूनही ठाण्याची एक ‘वेगळी’ कार्यशैली पोलीस विभागाने आकाराला आणलेली आहे. आणि त्यामुळेच तीच कार्यशैली घेऊन परमवीर सिंग हे जेव्हा मुंबई आयुक्त पदाच्या खुर्चीवर बसले त्यावेळेला त्यांचं अडचणीत येणं स्वाभाविक होतं. परमवीर सिंग यांनी आयुक्त म्हणून केलेल्या चुका आणि त्यातून मुंबई पोलिसांच्या वाट्याला आलेली बदनामी दूर करण्यासाठी ठाकरे आणि पवार या दोघांनाही संयुक्तरित्या प्रयत्न करावे लागणार आहेत. अर्थात त्यासाठी अनिल देशमुख यांच्यासारख्या सौम्य प्रवृत्तीच्या आणि प्रकृतीच्या नेत्याकडे गृहमंत्री पदाचा कारभार ठेवून चालणार नाही. हे एव्हाना महाविकास आघाडीच्च्या कर्त्याकरवित्यांच्या लक्षात आलेलं आहे.