घरमहाराष्ट्रमांडवली करून यू टर्न घ्यायला मी काही उद्धव ठाकरे नाही - विरोधी...

मांडवली करून यू टर्न घ्यायला मी काही उद्धव ठाकरे नाही – विरोधी पक्षनेते

Subscribe

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांनी बोलावलेल्या चहापानावर विरोधकांनी टीका केली असून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपवर टीका करतानाच उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशवनाच्या पूर्वसंध्येला अपेक्षेप्रमाणे विरोधकांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला. यावेळी सर्व विरोधी पक्षांच्या प्रतिनिधींनी बैठक घेऊन बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजप सरकारवर कडाडून टीका केली. मात्र, असं करतानाच त्यांनी शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर शेलक्या शब्दांमध्ये निशाणा साधला. ‘मुंबईच्या विकास आराखड्यासंदर्भात मी जनहित याचिका सादर करणार आहे. आणि मी काही मांडवली करून यु टर्न घ्यायला उद्धव ठाकरे नाही’, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

Opposition Party Meeting
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांची बैठक

‘आधी गल्लीबॉय वाटायचे, आता बॅडबॉय वाटतात’

दरम्यान, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या गल्लीबॉय चित्रपटाच्या नावानेही विखे पाटलांनी टीका केली. ‘यांचे बॅनर युती भगव्या विचारांची असं सागतायत. पण ही युती भगव्या नाही तर फसव्या विचारांची आहे. ईडीच्या कारवाईपासून वाचण्यासाठी कोणतीही अट न स्वीकारता शिवसेनेने ही युती केली आहे. आणि भाजपने मोदींची घरवापसी दिसू लागल्यामुळेच शिवसेनेला ताटाखालचं मांजर केलं आहे. युतीच्या घोषणेनंतर पत्रकारांना उत्तर द्यायचं यांच्यात धाडस नाही तर महाराष्ट्राला काय उत्तर देणार हे? आधी हे गल्लीबॉय वाटायचे, आता बॅडबॉय वाटू लागलेत. म्हणून आम्ही आजच्या चहापानावर बहिष्कार टाकत आहोत’, असं राधाकृष्ण विखे पाटील यावेळी म्हणाले.

- Advertisement -
Opposition Party Letter
विरोधकांचं बहिष्काराचं पत्र

शेतकऱ्यांच्या आत्महत्या कधी थांबणार?

दरम्यान, राज्यातल्या काही मूलभूत प्रश्नांवरून विखे पाटलांनी सरकारला धारेवर धरलं. ‘आज रोजगार, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न न सोडवता हे सरकार पीक विम्यासाठी फक्त २ हजार रुपये देत आहे. राज्यात दुष्काळ आहे. नोकरभरती यासारखे ज्वलंत विषय बाजूला ठेवून फक्त फसव्या घोषणांची जाहिरात हे सरकार करत आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या आत्महत्या करणार नाही, अशी घोषणा केली. मात्र मागील तीन वर्षांत शेतकरी आत्महत्या वाढल्या. मागील साडेचार वर्षांत आत्महत्या कमी करण्यात सरकारला अपयश आले आहे’, अशी टीका विखे पाटील यांनी केली आहे.


हेही वाचा – घ्या..रॉबर्ट वाड्रांना आता राजकारणात यायचंय!

७२ हजार रोजगाराच्या घोषणेचं काय झालं?

रोजगाराच्या मुद्द्यावर देखील विरोधकांनी सरकारला काही प्रश्न विचारले आहेत. ‘२८ मार्च २०१८ ला ७२ हजार जागा भरू अशी घोषणा सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी केली. आज या घोषणेला एक वर्ष झाले, पण एकही जागा भरली नाही. त्यामुळे सरकारने कोणत्या जागा भरल्यात? याची आकडेवारी सभागृहात द्यावी. आता काही जाहिराती तरुण बेरोजगारांना गाजर दाखवण्यासाठी काढल्या आहेत. शिक्षक भरतीमध्ये देखील तोच घोळ आहे. कंत्राटी कामगारांमध्ये देखील हीच स्थिती पाहायला मिळत आहे’, असं विखे पाटील यावेळी बोलताना म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -