घरमहाराष्ट्रकोल्हापूर पुन्हा पाण्यात जाणार? राधानगरीचे सर्व दरवाजे उघडले!

कोल्हापूर पुन्हा पाण्यात जाणार? राधानगरीचे सर्व दरवाजे उघडले!

Subscribe

कोल्हापूरच्या राधानगरी धरणाचे सर्व ७ दरवाचे मुसळधार पावसामुळे उघडण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर नदी क्षेत्रातल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या महिन्यात राधानगरी धरण परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर आणि सांगली परिसरामध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. आता पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून राधानगरी धरण परिसरामध्ये पावसाने संततधार हजेरी लावली आहे. धरण पूर्णपणे भरल्यामुळे धरणाचे टप्प्याटप्प्याने आधी ३, नंतर ५ आणि आता सर्व ७ दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणातून सध्या ११ हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नदीपात्राजवळच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीपात्रात पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता लक्षात घेता पाण्यात न जाण्याचा इशारा ग्रामस्थांना देण्यात आला आहे. दरम्यान, आसपासच्या काही गावांना स्थलांतर करण्याचं देखील आवाहन प्रशासनाने केलं आहे.


हेही वाचा – मुंबईतल्या बाप्पालाही सांगली- कोल्हापूरच्या पुराचा फटका!

बंधारे पाण्याखाली, नागरिक भितीच्या छायेखाली!

दरम्यान, कोल्हापूरमध्ये कोसळत असलेल्या पावसामुळे स्थानिक जनजीवन काही प्रमाणात प्रभावित झाली आहे. अनेक मार्गांवरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. बंधारे पाण्याखाली गेले आहेत. संभाव्य परिस्थिती लक्षात घेता एनडीआरएफला टीमला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राधानगरी, कुंभी, कासारी, तुळशी, वारणा आणि दूधगंगा या नद्यांच्या परिसरामध्ये होत असलेल्या जोरदार पावसामुळे पुन्हा एकदा कोल्हापूर पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोल्हापूर शहरासह गगनबावडा, पन्हाळा, आजरा, शाहुवाडी, चंदगड, राधानगरी या तालुक्यांमध्ये पावसाचं प्रमाण वाढलं आहे. पंचगंगा नदीवरच्याच शिंगणापूर, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ आणि भोगवती नदीवरच्या हळदी, शिवगाव, राशिवडे हे बंधारे देखील पाण्याखाली गेल्यामुळे कोल्हापूरवासियांमध्ये पुन्हा एकदा भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. मात्र, पुन्हा पूर आलाच, तर त्याचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचं आश्वासन प्रशासनाकडून देण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -