घरमहाराष्ट्रतमाशा गेला, छमछम आली, तरुणाई बेताल झाली!

तमाशा गेला, छमछम आली, तरुणाई बेताल झाली!

Subscribe

रायगड जिल्ह्याला सांस्कृतिक परंपरा असली तरी बदलत्या काळानुसार सांस्कृतिक बाज राखणारा तमाशा कालबाह्य होऊन त्याची जागा डान्स बारनी घेतली आहे. नर्तकींचा नाच, गाणे पाहण्याची सुप्त इच्छा लक्षात घेऊन चाणाक्ष दाक्षिणात्य हॉटेल व्यावसायिकांनी तरूणांची सोय केली आहे. अडचण नको म्हणून स्थानिक तसेच वरच्या पातळीवरील यंत्रणांची पद्धतशीर मदत घेतली जात आहे. त्यामुळे ऑर्केस्ट्रा आणि डान्स बारचे पेव फुटले असून बारबालांच्या छमछमाटाला कोण आवर घालणार असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे.

मंद प्रकाशात, मद्याचे प्याले रिचवत, उडत्या चालीची गाणी आणि समोर नृत्यांगना असा एकूण थाट. यामुळे दिवस मावळला की ऑर्केस्टा बार आंबट शौकीनांच्या गर्दीने फुलून जात आहेत. मूळ किमतीपेक्षा चार ते पाच पट दर मद्यासाठी आकारूनसुद्धा गिर्‍हाईकांची वानवा कधी जाणवत नाही. पोटासाठी वेटरच काम करण्यासाठी पश्चिम बंगाल, अगदी बांग्लादेशातून सुद्धा महिला, मुली येत असतात. तिजोरी मात्र बार चालविणार्‍यांची भरतात.

- Advertisement -

बारबाला दुपारी 4 ते रात्री 11 पर्यंत काम करतात. त्यांना बारपर्यंत ने-आण करायला गाडी, शिवाय राहण्याची व्यवस्था असते. गिर्‍हाईकांनी उधळलेल्या पैशात बार व्यवस्थापकाचादेखील वाटा असतो. त्यामुळे बार व्यवस्थापकाची सर्व बोटं तुपात असतात. डान्स बारच्या नावाखाली चालणार्‍या अनैतिक शरीरविक्रीचा अनेकदा पर्दाफाश झाला आहे. अनेकांच्या संसाराची राखरांगोळी करणारी ही विकृती हद्दपारीसाठी सर्वच थरातून प्रयत्न होणे गरजेचे आहे. थिरकायला लावणारी ढोलकी गेली, छमछम सुरू झाली. येथे नृत्यांगनांच्या नादी लागून एक तरुण पिढी बरबाद होत असताना त्यांना आवरायला मात्र कोणी नाही हे जळजळीत वास्तव आहे.

रायगडमध्ये मागील काही वर्षांत आलेला अमाप पैसा पाहून डान्स बारचे आलेले ‘पीक’ काळजीपूर्वक जोपासले जाते आहे. खालापूर हद्दीतदेखील ही संख्या आठवर पोहचली होती. परंतु काही ठिकाणी विरोधामुळे सध्या तीन डान्सबारच सुरू आहेत.

- Advertisement -

खालापुरात 20 ते 22 वयोगटातील कंत्राटी काम करणारे तरुण कामावर जातो सांगून डान्स बारमध्ये पडलेल्या छाप्यात सापडले होते. त्यानंतर तत्कालीन सरपंच अनिल चाळके आणि माजी सरपंच मनोरमा साळवी यांनी धारण केलेल्या रूद्रावतारामुळे गावाच्या वेशीवर आलेला डान्स बार बंद झाला.

सूर्य मावळतीला जाऊ लागला की डान्स बारसमोरील पार्किंगची जागा काही वेळातच खचाखच भरते. विशेष म्हणजे ‘एमएच 12’ आणि ‘एमएच 14’ नोंदणी असलेल्या अलिशान गाड्यांची संख्या यात जास्त असते. पुणे भागातून द्रुतगती मार्गावरून तासाभराचा प्रवास करून मौजमजा करायला पनवेल, खालापूर गाठणारे अनेक रईसजादे मोठ्या संख्येने येतात. रायगडमधील पैसा खुळखुळायला लागलेल्या भागातील तरुणांचीही संख्या दुर्लक्षिण्यासारखी नाही.

डान्स बारसाठी घालून दिलेल्या नियमावलीत एकही बार बसत नाही. महिला वेटरची संख्या, डान्ससाठी ठराविक अंतरावर कट्टा आणि वेळेची मर्यादा याचे पालन होत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -