घरलोकसभा २०१९ग्राउंड रिपोर्टगीतेंचा पेपर पुन्हा एकदा तटकरेंमुळे अवघड

गीतेंचा पेपर पुन्हा एकदा तटकरेंमुळे अवघड

Subscribe

मागील निवडणुकीत रायगड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांच्या विरोधात शिवसेनेचे अनंत गीते काठावर विजयी झाले. त्यावेळी मोदी लाट असल्याने याचा फायदा गीते यांना मिळाला. मात्र यावेळी होणार्‍या निवडणुकीत तटकरे विरुद्ध गीते असाच सामना होणार आहे. त्यामुळे सलग सहाव्यांदा खासदार म्हणून निवडून आलेल्या अनंत गीतेंसमोर यावेळी मात्र राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंचे आव्हान राहणार आहे. युती होण्याअगोदर भाजपने या मतदारसंघात उमेदवार तयार केला होता. मात्र युती झाल्याने पुन्हा अनंत गीते मैदानात उतरणार आहेत.

2009 च्या पुनर्रचनेआधी कुलाबा नावाने रायगड लोकसभा मतदार ओळखला जात होता. 1984 मध्ये राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात काँग्रेसने मोठे यश मिळवले. परंतु कुलाबा मतदारसंघ त्यावेळी शेकापबरोबर राहिला. 2014 ला देशात मोदी लाट असतानाही शिवसेनेचे अनंत गीते जेमतेम 2 हजार 110 मतांनी विजयी झाले. 1989 ते 1996 पर्यंत सलग तीन निवडणुकांमध्ये काँग्रेसचे बॅ. ए. आर. अंतुले यांनी शेकापचे अ‍ॅड. दत्ता पाटील यांचा पराभव केला. त्यानंतर दोनवेळा शेकापचे रामशेठ ठाकूर निवडून आले. 2004 च्या निवडणुकीत बॅ. अंतुले पुन्हा खासदार झाले. 2009 आणि 2014 मध्ये अनंत गीते निवडून आले. सलग सहाव्यांदा खासदार म्हणून निवडून आलेले अनंत गीते केंद्रात अवजड उद्योग खात्याचे मंत्रीपद सांभाळत आहेत. या भागातील कुणबी समुदायाचा त्यांना पाठिंबा होता.

- Advertisement -

raigad

दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी शिवसेनेत नाराज आहेत. तसेच गीते आणि दळवींचे राजकीय संबंध चांगले आहेत. या मतदारसंघात कुणबी मतांचे प्राबल्य आहे. एरवी कुठल्याही पक्षाशी बांधिलकी सांगणारे कुणबी मतदार लोकसभेला मात्र आपला माणूस म्हणून गीतेंच्या पाठीशी उभे राहतात. अनंत गीते यांच्याकडे केंद्रातील अवजड उद्योग खात्याचे मंत्रीपद आहे. कोकणात एखादा तरी उद्योग येईल, अशी इथल्या तरुणांची अपेक्षा होती. परंतु शासनाच्या धोरणामुळे ती सपशेल फोल ठरली. मंत्री म्हणून अनंत गीते फारसा प्रभाव पाडू शकलेले नाहीत. नियमित बैठका आणि खासदार निधी संपवण्यापलिकडे त्यांचे काहीच काम समोर आलेले नाही. त्यामुळे शिवसैनिकही त्यांच्यावर नाराज असल्याचे राजकीय वर्तुळात सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

या मतदारसंघाला अनेक समस्यांनी ग्रासले आहे. दहा वर्षात त्या सोडविण्यासाठी गीतेंनी काय केले, असा प्रश्न आता विरोधक थेट विचारत आहेत. याचाच फायदा तटकरे यांनी घ्यायला सुरुवात केली आहे. शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांचा मुलगा योगेश कदम दापोली मतदारसंघातून विधानसभेसाठी इच्छुक आहे. आधी लोकसभा निवडणूक आहे. रामदास कदमांनी गीतेंच्या विरोधात काम केले तर विधानसभा निवडणुकीत गीतेंकडून त्याची परतफेड होईल. त्यामुळे रामदास कदमांना गीतेंच्या प्रचारात एक कदम पुढेच राहावे लागणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी सुनील तटकरे यांच्यावर जलसंपदा विभागातील भ्रष्टाचारांच्या आरोपांची राळ उठली होती. शेकापचे जयंत पाटील यांनी त्यांच्याविरोधात आघाडीच उघडली होती. तटकरेंचे राष्ट्रवादीतील कट्टर समर्थक चिपळूणचे रमेश कदम यांनाच त्यांच्या विरोधी मैदानात उभे केले होते. तरीही तटकरेंनी गीतेंच्या अडचणी वाढवल्या होत्या. राष्ट्रवादीला शेकापची साथ मिळणार असल्याचे जवळपास निश्चित असल्याने त्यांच्या लोकसभा निवडणुकीतील मोठा अडसर दूर होणार आहे.

दापोलीचे आमदार संजय कदम, माजी आमदार सूर्यकांत दळवी, मनसेचे वैभव खेडेकर यांची अलिखित आघाडी आहे. त्याचाही फायदा उचलण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून होईल. रायगड लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यात राष्ट्रवादीचे 2 आमदार आहेत. कागदावर राष्ट्रवादीची बाजू भक्कम दिसत असली तरी अंतर्गत वाद मोठा आहे. गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी पक्षाकडे लोकसभेची उमेदवारी मागितल्याने तटकरेंची अडचण वाढली आहे. राष्ट्रवादीत तटकरे विरुद्ध भास्कर जाधव असा वाद आहे. तटकरे विजयी झाले तर जाधवांच्या गुहागर मतदारसंघात तटकरेंचा हस्तक्षेप वाढेल. तटकरेंच्या नाकाबंदीसाठीच जाधवांनी उमेदवारी मागितल्याची चर्चा आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघाची माहिती
कोकणातील एक महत्त्वाचा जिल्हा म्हणून रायगडची ओळख आहे. रायगडच्या पश्चिमेला अरबी समुद्राची किनारपट्टी आहे. तर जिल्ह्याच्या काही भागाला सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत. रायगडचे पूर्वीचे नाव कुलाबा असे होते, त्यानंतर त्याचे रायगड असे नामकरण करण्यात आले. रायगड जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ 7,152 चौरस किमी आहे. जिल्ह्याचे मुख्यालय अलिबाग येथे आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील पेण, अलिबाग, श्रीवर्धन आणि महाड असे चार तालुके येतात. तर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि गुहागर असे दोन तालुके येतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -