रेल्वे अधिकार्‍यांना रेल नीरची अ‍ॅलर्जी, खासगी पाण्यावर लाखोंची उधळपट्टी

Mumbai

इंडियन रेल्वे टुरिझम कॉपोरेशन (आयआरसीटीसी)ला महापालिकेचे पाणी असूनसुद्धा मध्य रेल्वेच्या सीएसएमटी मुख्यालयात कर्मचारी आणि अधिकारी दररोज खासगी कंपीनीच्या १०० बॉटल संपवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे आयआरसीटीसीचे ‘नीर पाणी’ सगळे प्रवाशी पित असताना रेल्वेच्या अधिकार्‍यांना आयआरसीटीसीचे आपलेच पाणी नकोसे झाले आहे. यामुळे सर्वसामन्यांच्या पैशाची उधळपट्टी होत असताना रेल्वे अधिकारी मात्र बेफिकीर वागत आहेत.

मध्य रेल्वेचे मुख्यालय असलेले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही एक हेरिटेज इमारत आहे. या ठिकाणी रेल्वे प्रशासनाकडून आवश्यक सोयीसुविधा पुरवल्या जात नसल्याचा आरडाओरडा नेहमीच रेल्वे अधिकारी आणि कर्मचार्‍यांकडून केला जातो. रेल्वे मुख्यालयात बीएमसीचे पाणी येत असूनसुद्धा रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी खासगी कंपनीचे पिण्याचे पाणी पित आहेत. दर आठवड्याला मध्य रेल्वेच्या मुख्यालायात २० लिटरच्या ५०० बॉटल विकत घेण्यात येतात. प्रत्येक दिवशी १०० तर महिन्याला सरासरी १६०० ते २००० बॉटल रेल्वे मुख्यालयात लागतात. या संबंधित मध्य रेल्वेमध्ये निर पाणी बॉटल वितरकाकडे विचारणा केली असता, त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, मध्य रेल्वेच्या मुख्यालायात आठवड्यातून दोन वेळा पाणी द्यावे लागते.

एका फेरीत २५० तर दुसर्‍या फेरी २५० अशा एकूण ५०० पाण्याच्या बॉटल आठवड्यातून देत असतो. उन्हाळा असल्यामुळे पाण्याची रेल्वे मुख्यालयात मागणी वाढली आहे. मात्र रेल्वेकडे इंडियन रेल्वे केटरिंग टूरिझम कार्पोरेशनकडून (आयआरसीटीसी) पाणी दिले जाते. त्यासाठी अंबरनाथ येथील काकोळे तलाव परिसरात फॅक्टरी आहे. रेल्वे प्रवाशांकडून आयआरसीटीसीच्या या पाण्याला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. मात्र स्वत: रेल्वे अधिकारी आणि कर्चचारी हे पाणी प्यायला तयार नाहीत.

आयआरसीटीसीने रेल्वे स्थानकांवर वॉटर व्हेंडिंग मशिन लावल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना शुद्ध पाणी स्वस्त दरात उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या देशभरात रेल्वे स्थानकांवर आयआरसीटीसीच्या पाण्याची मागणी वाढली आहे. मात्र रेल्वे अधिकार्‍यांना या पाण्याची अ‍ॅलर्जी झाली आहे. लाखो रुपये खर्च करून खासगी कंपनीकडून पिण्याचे पाणी रेल्वे अधिकारी घेत आहे. या संबंधित रेल्वे अधिकार्‍यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, मागील काही दिवसापासून पालिकेचे गढूळ पाणी येत असल्यामुळे रेल्वे कार्यालयात खासगी कंपनीचे पाणी घेण्याची वेळ आली आहे. सोबतच अनेक कर्मचार्‍यांना या पाण्यातून आजार झाले होते. त्यामुळे पाणी घेण्यात येत आहे. मात्र आयआरसीटीसीच्या पाण्याबद्दल विचारणा केली असता यावर काही बोलण्यास त्यांनी नकार दिला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here