घरमहाराष्ट्रमहाड हळूहळू पूर्वपदावर

महाड हळूहळू पूर्वपदावर

Subscribe

मुसळधार पावसाची काहीशी विश्रांती व आठ दिवसांच्या महापुराने काढता पाय घेतल्यानंतर शहरासह तालुक्यातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मात्र घर व दुकानांतून भिजलेले साहित्य, माल बाहेर काढल्यानंतर आता साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली असून, नगर पालिका प्रशासनासमोर हे मोठे आव्हान ठरणार आहे.

पुराने शहरातील सर्वच भाग बाधित झाले होते. यामुळे भिजलेले संसार, दुकानांतील सामानसुमान यांचे नुकसान झाले. चिखल व फेकून देण्यात आलेले साहित्य उचलण्याचे काम पालिकेने युद्धपातळीवर केली असून, साफसफाई मोहीम राबविण्यात येत आहे. बाजारपेठेतील सफाईचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून, यासाठी 70 कामगारांसह ५ डंपर, २ जे. सी. बी., ३ टिपर वापरले जात आहेत. शहरात जवळपास ७० कामगार काम करत आहेत. गुरुवारी रात्री रस्त्यातील चिखल फायर फायटरने काढून टाकण्यात आला. तसेच संपूर्ण शहरात धूर फवारणी, जंतुनाशक पावडर टाकण्याचे काम सुरू करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या स्वच्छता विभागाचे किशोर शिंदे यांनी दिली.

- Advertisement -

शहराला पाणी पुरवठा करणार्‍या कुर्ला धरणाची जलवाहिनी दादली पुलावरील प्रवाहात वाहून गेल्याने पाणी पुरवठा ठप्प झाला. ही वाहिनी पूर्ववत करण्यात आली आहे. दादली येथील जलशुद्धीकरण प्रकल्पात गॅस क्लोरिनेशन आणि तुरटी प्रक्रिया केली जात असल्याने नागरिकांनी पाण्यात गढूळपणा असला तरी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी केले आहे. दरम्यान, बँक ऑफ इंडियाचे काम पुन्हा सुरू झाले आहे. सणासुदीचे दिवस असल्याने शहरी व ग्रामीण ग्राहकांचे हाल होऊ नयेत म्हणून अनेक दुकानदारांनी आहे त्या स्थितीत दुकाने उघडून सेवा देण्याचा प्रयत्न चालविला असल्याचे व्यावसायिक महेश मेहता यांनी सांगितले.

खा. तटकरे नाराज
महाड शहरात इतकी मोठी पूर परिस्थिती उद्भवूनही सरकारी मदत पोहचली नसल्याने खा. सुनील तटकरे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. संवेदना नसलेले हे सरकार आपत्कालीन परिस्थितीत सपशेल अपयशी ठरल्याचा आरोपही त्यांनी केला. शनिवारी खा. तटकरे यांनी शहरात भेट देऊन पुरानंतर उद्भवलेल्या परिस्थितीची पाहणी करून आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माणिक जगताप व अन्य उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -