घरमहाराष्ट्रनाणारवासीयांनी मानले राज ठाकरेंचे आभार; दिली आंब्याची पेटी भेट

नाणारवासीयांनी मानले राज ठाकरेंचे आभार; दिली आंब्याची पेटी भेट

Subscribe

नाणार प्रकल्प रद्द झाल्याबद्दल येत्या १६ आणि १७ तारखेला नाणारमध्ये आयोजित केलेल्या विजयोत्सवात सहभागी होण्याचे आमंत्रणही ग्रामस्थांनी राज ठाकरेंना दिले.

नाणार प्रकल्पावरुन राजकीय नेते आक्रमक झाले असतानाच एकाएकी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संपूर्ण प्रकल्परोहा परिसरात हलविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राजापूर तालुक्यातील नाणारवासीयांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, नाणारमधील तेल शुद्धीकरण प्रकल्प रद्द झाल्यानंतर त्या गावातील आंब्याची पहिली पेटी, आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘कृष्णकुंज’वर पोहोचली. राज ठाकरे यांची स्वदिच्छा भेट घेण्याच्या आणि त्यांचे आभार मानण्याच्या उद्देशाने नाणारवासीयांनी राज यांची भेट घेतली. यावेळी ग्रामस्थांनी आपुलकीची भावना म्हणून आंब्याची पेटी भेट स्वरूपात राज यांना दिली. तसंच प्रकल्प रद्द झाल्याबद्दल येत्या १६ आणि १७ तारखेला नाणारमध्ये आयोजित केलेल्या विजयोत्सवात सहभागी होण्याचे आमंत्रणही ग्रामस्थांनी राज ठाकरेंना दिले.

यावेळी नाणारवासीयांनी तेल शुद्धीकरण प्रकल्पाच्या विरोधात पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिलेल्या सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांचे आभार मानले. याआधी त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना विजयोत्सवाचे आमंत्रण दिलं आहे.

- Advertisement -

दरम्यान, नाणार प्रकल्प रोह्यामध्ये हलवण्याबाबत लवकर अधिकृत घोषणा केली जाणार असल्याचं समजतंय. या प्रकल्पासाठी रोहा, अलिबाग आणि मुरूड तालुक्यांतील किनारपट्टीवर सिडकोच्या माध्यमातून वसाहत उभारली जाणार आहे. या गावांमधील क्षेत्र नवनगर म्हणून अधिसूचित करून सिडकोला नवनगर विकास प्राधिकरण म्हणून जाहीर करण्यात आलं आहे. शिवसनेने नाणार प्रकल्पाला कायमच विरोध दर्शवला आहे. खरंतर शिवसेनेने भाजपबरोबर युती करतानादेखील नाणार प्रकल्प रद्द करण्याची अट घातली होती. मात्र, त्या अटीबाबत अंतिम निर्णय घेण्याआगोदरच मुख्यमंत्र्यांनी हा महत्वाचा निर्णय घेतला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -