घरमहाराष्ट्रराज ठाकरे नऊ तास ईडीच्या कार्यालयात

राज ठाकरे नऊ तास ईडीच्या कार्यालयात

Subscribe

राजसोबत होते ठाकरे कुटुंबीय, थांबले ग्रॅण्ड हॉटेलमध्ये मनसेच्या नेत्यांची धरपकड पोलिसांचा चोख बंदोबस्त

कोहिनूर गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजवणी संचालनालयाकडून (ईडी) तब्बल साडे आठ तासांहून अधिक वेळ राज ठाकरे यांची चौकशी झाली. सकाळी अकरा वाजल्यापासून रात्री सव्वा आठ वाजेपर्यंत ते ईडी कार्यालयात होते. पण ईडी ऑफिसमधून बाहेर पडल्यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता थेट गाडीत बसून राज ठाकरे कृष्णकुंजकडे निघून गेले. ईडीच्या अधिकार्‍यांकडून मॅरेथॉनपद्धतीने चार भिंतीच्या आत चौकशी झाली.

या चौकशीदरम्यान राज ठाकरे यांचा जबाबही टप्प्याटप्प्याने नोंदवण्यात आला. राज ठाकरे सकाळी १०.३० च्या सुमारास कृष्णकुंजहून निघाले. त्यांनी ११.०० वाजता ईडीचे बॅलार्ड पियर येथील कार्यालय गाठले. मुंबई पोलिसांकडून राज ठाकरे यांच्यासाठी विशेष एस्कॉर्टही तयार करण्यात आला होता. राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या गाडीच्या पुढे धावणार्‍या दोन गाड्यांनी हा एस्कॉर्ट करून देत कृष्णकुंज ते ईडी कार्यालयादरम्यानची वाट मोकळी करून दिली. दरम्यानच्या, काळात मुंबई पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवत मुंबईकरांची गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेतली. तसेच मनसेचे कार्यकर्ते ईडी कार्यालयाजवळ पोहचणार नाहीत याचीही खबरदारी घेण्यात आली होती. राज ठाकरे यांना विचारण्यात येणार्‍या प्रश्नांनुसार त्यांचा जबाब हा टप्प्याटप्प्याने नोंदवण्यात आला. नोंदवण्यात आलेल्या जबाबाची खातरजमा राज ठाकरे यांच्याकडून करून घेतल्यानंतरच चौकशीचा पुढचा टप्पा पार पडत होता.

- Advertisement -

राज ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला मनसे कार्यकर्ते आणि समर्थक यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याने ईडीच्या कार्यालयानजीक कोणताही गैरप्रकार घडला नाही. अनेक ठिकाणी मुंबई पोलिसांनीही सर्वसामान्य मुंबईकरांना या सगळ्या पोलीस बंदोबस्ताचा त्रास होणार नाही याची काळजी घेतली होती.

राज ठाकरे झाले नर्व्हस
एरव्ही राज ठाकरे हे माध्यमांना सामोरे जाताना त्यांच्यात असणारा आत्मविश्वास आणि स्मितहास्य गुरुवारी ईडीच्या कार्यालयाची पायरी चढतेवेळी हरवल्यासारखा दिसत होता. राज ठाकरे यांनी माध्यमांकडे हातवारे करत ईडीच्या कार्यालयाची पायरी चढली खरी; पण नेहमीच्या शैलीतले राज ठाकरे गुरुवारी पहायला मिळाले नाहीत. राज ठाकरेंवरही मानसिक दडपण येते आणि तेदेखील नर्व्हस होतात हे आजच्या त्यांच्या हातवार्‍याच्या निमित्ताने पहायला मिळाले. राज ठाकरे यांना एकट्याच ईडीच्या कार्यालयात घेण्यात आले.

- Advertisement -

माझा आवाज बंद होणार नाही-राज
‘कितीही चौकशा केल्या तरी माझा आवाज बंद होणार नाही’, असा आक्रमक पवित्रा राज ठाकरे यांनी ईडीच्या चौकशीनंतर घेतला. कृष्णकुंजवर परतल्यानंतर या एका वाक्यात राज यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केल्यानंतर मोठ्या संख्येने जमलेल्या मनसे सैनिकांनी एकच जल्लोष केला.

उन्मेष जोशी, राजन शिरोडकर यांनी दिलेली उत्तरे राज ठाकरेंच्या उत्तरांशी पडताळून पाहिली

राज यांनी दिलेली उत्तरे मिळती जुळती, जबानीने ईडी अधिकार्‍यांचे समाधान

११.३० ला ईडी कार्यालयात रात्री ८.१५ वाजता बाहेर पुन्हा चौकशीची शक्यता कमी

जी व्यक्ती या सरकारच्या विरोधात बोलते त्या व्यक्तीला ईडी, सीबीआयची भीती दाखवून त्यांचा आवाज दाबण्याचे काम केले जाते.
– सुप्रिया सुळे, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस

राजकारणात आम्ही सतत एकमेकांच्या विरुद्ध उभे आहोत, पण संकट काळात परिवार एकत्रच असतो. मतभेदांची जळमटे गळून पडतात हे उद्धव ठाकरे यांनी दाखवले.
– संजय राऊत, शिवसेना नेतेे

राज ठाकरे सहकुटुंब ईडीच्या चौकशीला निघाले आहेत की सत्यनारायणाच्या पूजेला? बायको, मुलगा, सून, मुलगी आणि बहीण, सगळे मिळून माहिती देणार का? काय हा ड्रामा? की सहानुभूती मिळवण्याचा हा प्रयत्न?
– अंजली दमानिया, कार्यकर्त्या

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -