घरमहाराष्ट्रदुसऱ्या टप्प्यात घडेल की बिघडेल? वाचा पडद्यामागची गणितं!

दुसऱ्या टप्प्यात घडेल की बिघडेल? वाचा पडद्यामागची गणितं!

Subscribe

१८ एप्रिल रोजी देशभरात एकूण ९७ मतदारसंघात निवडणूक होत असून त्यात महाराष्ट्रातल्या १० मतदारसंघांचा समावेश आहे. त्यापैकी ५ मतदारसंघांमध्ये मोठ्या लढती होणं अपेक्षित आहे.

पहिल्या टप्प्यासाठी मतदान झाल्यानंतर आता लोकसभा निवडणुकांचा ज्वर चांगलाच चढू लागला आहे. सर्वच पक्षांचे स्टार प्रचारक एकामागून एक सभा घेत आहेत. त्यातच राज ठाकरेंनी महाराष्ट्रात निवडणुका न लढवताही भाजपच्या पोटात गोळा आणला आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला जरी दिलासा मिळाला असला, तरी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या प्रत्येक सभेमध्ये शरद पवारांना टार्गेट करून आघाडीच्या स्टार प्रचारकावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. अशातच आता उद्या म्हणजेच १८ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यासाठी देशभरात मतदान होत आहे. यामध्ये १३ राज्यांमधल्या ९७ मतदारसंघ अर्थात ९७ खासदारांसाठी मतदान होणार आहे. एकूण ७ टप्प्यांपैकी खासदारांची सर्वाधित संख्या या टप्प्यात आहे.

कुठे किती जागांसाठी मतदान?

दुसऱ्या टप्प्यात देशभरातल्या एकूण १३ राज्यांमध्ये मतदान होणार असून त्यामध्ये आसाम – ५ जागा, बिहार – ५ जागा, छत्तीसगड – ३ जागा, जम्मू – २ जागा, कर्नाटक – १४ जागा, महाराष्ट्र – १० जागा, मणिपूर – १ जागा
ओडिशा – ५ जागा, तमिळनाडू – ३९ जागा, त्रिपुरा – १ जागा, उ. प्रदेश – ८ जागा, प. बंगाल – ३ जागा आणि पाँडिचेरी – १ जागा यांचा समावेश आहे. यातल्या महाराष्ट्राच्या १० जागांमध्ये बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर या जागांचा समावेश आहे. महाराष्ट्रातल्या अनेक दिग्गजांचं भवितव्य उद्या मतपेटीमध्ये बंद होणार आहे. कोणत्या आहेत या बिग फाईट्स?

- Advertisement -

सोलापुरात दोघांच्या भाडणात तिसऱ्याचा लाभ?

या १० जागांपैकी सर्वाधिक लक्षवेधी ठरणार आहे ती सोलापूरची लढत. ‘ही माझी शेवटची निवडणूक असेल’, असं म्हणत सुशीलकुमार शिंदे यांनी अखेरच्या क्षणी निवडणुकीला इमोशनल टच देण्याचा प्रयत्न केलाय. पण प्रकाश आंबेडकरांनी गेल्या काही दिवसांमध्ये काँग्रेसविरोधात उठवलेलं रान त्यांना अडचणीचं ठरू शकतं. आंबेडकरांचे पुत्र शुजात देखील सोलापुरातच तळ ठोकून होते. दुसरीकडे लिंगायत कार्ड खेळत भाजपनं उभ्या केलेल्या जयसिद्धेश्वर स्वामी यांना लिंगायत समाजाबाहेरची मतं कितपत खेचता येतात, यावर प्रश्न आहे. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली असतानाच दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होतोय का? याची आता उत्सुकता आहे.

वाचा सोलापुरातली राजकीय गणितं

नांदेडमध्ये अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला

२०१४मध्ये अवघ्या ८१ हजार मतांनी जिंकून आलेल्या अशोक चव्हाणांचा सामना यंदा युतीचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांच्याशी होत आहे. भाजपकडून ३ सभा घेऊन या मतदारसंघातली निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. शिवाय अशोक चव्हाणांच्या बालेकिल्ल्यालाच हात घालत भाजपनं मोठं आव्हान निर्माण केलं आहे. मात्र, त्याचवेळी राज ठाकरे फॅक्टर भाजपसाठी किती त्रासदायक ठरतो? हाही प्रश्न महत्त्वाचा आहे. शिवसेनेच्या तिकिटावर आमदारकी निभावलेल्या चिखलीकरांनी ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश करत तिकीट मिळवलं. त्यामुळे विद्यमान आमदार विरूद्ध विद्यमान खासदार असा सामना नांदेडमध्य होतोय.

- Advertisement -

वाचा नांदेडमधली राजकीय गणितं

अकोला पॅटर्न मदतीला येणार का?

चार आमदार भाजपचे असलेल्या अकोला मतदारसंघात अवघ्या एका आमदाराच्या जोरावर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यामध्ये प्रचार केला. १९९८-९९मध्ये ज्या अकोला पॅटर्नने त्यांना विजय मिळवून दिला होता, त्यानंतर मात्र त्याने आंबेडकरांना कधीही साथ दिली नाही. मात्र, वंचित बहुजन आघाडीच्या रुपाने त्यांनी पुन्हा एकदा एमआयएमच्या साथीनं कंबर कसली आहे. आंबेडकरांच्या याच प्रस्थापितविरोधी आघाडीमुळे भाजपसमोर आव्हान निर्माण केलं आहे. कारण २०१४मध्ये मोदी लाटेत २ लाखांच्या मताधिक्याने निवडून आलेले संजय धोत्रे २००९मध्ये प्रकाश आंबेडकरांसमोर फक्त ६४ हजार मतांनी निवडून आले होते. त्यामुळे यंदा मोदी लाट नसताना भाजपला ही निवडणूक कठीण जाण्याची शक्यता आहे.

वाचा अकोल्यातली राजकीय गणितं

बीडमध्ये प्रीतम मुंडेंचा यंदा कठीण पेपर

७ लाखांच्या विक्रमी मताधिक्यानं २०१४मध्ये जिंकून आलेल्या विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांच्यासाठी ही निवडणूक तुलनेनं सोपी जरी वाटत असली, तरी यंदा २०१४सारखी परिस्थिती नक्कीच नाही. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे पोटनिवडणुकीत प्रीतम मुंडे यांना भावनिक लाटेवर प्रचंड मताधिक्य मिळालं होतं. मात्र यंदा मोदीलाट आणि भावनिक लाट या दोन्हींच्या गैरहजेरीत प्रीतम मुंडेंच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. दुसरीकडे माजी आमदार आणि अनुभवी नेते अमरसिह पंडित यांना डावलून राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिलेले जिल्हाध्यक्ष बजरंग सोनावणे तयारी करत आहेत. पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीत उतरलेल्या बजरंग सोनावणेंसमोर प्रीतम मुंडेंना थोपवण्याचं आव्हान असेल. त्यातच पक्षाचे कसलेले नेते जयदत्त क्षीरसागर यांनी ऐनवेळी राष्ट्रवादीला रामराम ठोकत प्रीतम मुंडेंच्या बाजूने उडी घेतल्यामुळे सोनावणेंपुढचं आव्हान अधिकच कडवं झालं होतं.

वाचा बीडमधली राजकीय गणितं

अमरावतीत ‘वंचित’ फॅक्टर अडसूळांना किती तापदायक?

नवनीत कौर राणा यांच्या उमेदवारीमुळे ‘ग्लॅमरस’ झालेल्या या मतदारसंघात आनंदराव अडसूळ गेल्या २ निवडणुकांपासून अमरावतीत खासदार आहेत. पण मूळच्या बुलढाण्याच्या असलेल्या आनंदराव अडसूळांसाठी मोदी लाट असूनही २०१४ची निवडणूक काँटे की टक्कर झाली. ४ लाख ६७ हजार मतं घेणाऱ्या अडसुळांसमोर काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या नवनीत कौर राणांनी ३ लाख २९ हजार मतं घेत टफ फाईट दिली. शिवाय बसपाच्या गुणवंत देवपारेंनीही ९८ हजार मतं घेतली. यावेळी देवपारे वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे मोदी लाटेच्या अभावी अडसूळांसमोर दोन्ही उमेदवारांचं कडवं आव्हान दिसत आहे.

वाचा अमरावतीतली राजकीय गणितं

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -