घरमहाराष्ट्रसाताऱ्याच्या सभेत राज ठाकरेंचे नवे प्रश्न, नवे व्हिडिओ!

साताऱ्याच्या सभेत राज ठाकरेंचे नवे प्रश्न, नवे व्हिडिओ!

Subscribe

एकीकडे निवडणुकांसाठीचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच दुसरीकडे प्रत्यक्ष निवडणूक न लढवताही राज ठाकरे मात्र जोरदार चर्चेत आहेत ते त्यांच्या प्रचाराच्या आगळ्या वेगळ्या पद्धतीमुळे आणि सभांमधून ते दाखवत असलेल्या मोदींच्या वेगवेगळ्या व्हिडिओंमुळे. बुधवारी साताऱ्यामध्ये झालेल्या सभेत देखील त्यांनी मोदींचे आणि प्रशांत परिचारकांचे व्हिडिओ दाखवून पंतप्रधान होण्याआधीची मोदींची वक्तव्य आणि नंतरची वक्तव्य यांची तुलना करून दाखवली. यावेळी मोदींच्या नुकत्याच झालेल्या मुलाखतीमधला व्हिडिओ राज ठाकरेंनी दाखवला, ज्यात मोदी ‘शेतकऱ्यांचे मृत्यू निवडणुकीचा मुद्दा ठरू शकतो, तर जवान मेल्याचा मुद्दा निवडणुकीचा का ठरू शकत नाही?’ असा प्रश्न विचारत आहेत. ‘या व्हिडिओंमुळेच आम्हाला असं वाटतंय की पुलवामा घडवून आणलंय आणि आमचे ४० जवान ठार मारेल की काय?’ असा प्रश्न देखील राज ठाकरेंनी उपस्थित केला.

मोदींचा अजून एक व्हिडिओ दाखवला!

यावेळी राज ठाकरेंनी मोदींची २०१४च्या निवडणुकांच्या आधीची एक व्हिडिओ क्लिप दाखवली. यामध्ये मोदी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना अतिरेकी कारवाया नियंत्रित न करण्यासाठी जबाबदार ठरवत होते. मात्र सत्ते आल्यापासून मोदींच्या कार्यकाळात आधीपेक्षा जास्त जवान शहीद झाले, त्याचं मात्र मोदींकडे उत्तर नाही, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. उलट मोदी पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफांना केक भरवून आले. त्यावेळी शहीद जवानांच्या परिवाराला काय वाटलं असेल? यावेळी त्यांनी प्रशांत परिचारक यांनी सैनिकांच्या पत्नींविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची ऑडिओ क्लिप देखील दाखवली. तसेच, मोदींच्या बुधवारी झालेल्या अकलूज येथील सभेत स्टेजवर उपस्थित असलेल्या प्रशांत परिचारकांचा फोटो देखील राज ठाकरेंनी यावेळी दाखवला. ‘मोदींच्या मनात काय आस्था असेल?’ असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी विचारला. यावेळी १४ फेब्रुवारीच्या पुलवामा हल्ल्यानंतर २२ फेब्रुवारीपर्यंत मोदींचे दररोज नवीन कपडे आणि हास्य असलेले फोटो छापलेली टेलिग्राफची बातमी देखील राज ठाकरेंनी यावेळी उपस्थितांना दाखवली. ‘४० जवान शहीद झाल्यानंतरही मोदी हसतात कसे?’ अशा प्रश्नही त्यांनी विचारला.

- Advertisement -

‘..तर असेच व्हिडिओ दिसत राहणार’

दरम्यान यावेळी राज ठाकरेंनी असेच व्हिडिओ दाखवत राहणार असं सांगितलं. ‘मी निवडणूक लढवत नाही याचा अर्थ चुकीच्या गोष्टींवर बोलू नये असा होत नाही. मी तर बोलणारच. अशाच व्हिडिओ क्लिप दिसत राहणार. ५ वर्ष जे काही या लोकांनी बोललं, ते मी चव्हाट्यावर आणणार. औरंगजेबाच्या शेवटच्या काळात त्यानं जी काही पत्र लिहिली, त्यात त्यानं म्हटलं होतं ‘शिवाजी मला अजून छळतोय’. संभाजी महाराज, संताजी-धनाजी, ताराबाई लढल्या त्यामागे प्रेरणा या ३ अक्षरांची होती ती म्हणजे ‘शि-वा-जी’. देशावरच्या अन्यायाविरोधात महाराष्ट्र सर्वात आधी उभा राहिला. मग मोदी-शहांविरोधात आपण का उभं राहू शकत नाही. मोगल-इंग्रज तरी आक्रमण करून आले, पण हे तर खोटं बोलून आले’, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

‘मोदी पत्रकार परिषद का घेत नाहीत?’

मोदींच्या पत्रकार परिषद न घेण्यावर देखील राज ठाकरेंनी निशाणा साधला. ‘मोदी देशाच्या इतिहासातले पहिले पंतप्रधान आहेत ज्यांनी त्यांच्या ५ वर्षांच्या कार्यकाळात एकही पत्रकार परिषद घेतली नाही. जी स्वप्नं त्यांनी देशाला दाखवली, त्या स्वप्नांबद्दल ते बोलायला तयार नाहीत. वर्षाला २ कोटी रोजगाराच्या आश्वासनाचं काय झालं? झटका आला म्हणून नोटबंदी केली. मंत्रीमंडळाला खोलीत बंद करून बाहेर घोषणा केली. मंत्रीमंडळावर, रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरवर इतका अविश्वास का दाखवला? त्याच नोटबंदीमुळे ४ ते ५ कोटी लोकांचे रोजगार गेले’, असं ते म्हणाले.

- Advertisement -

भाजपकडे हा पैसा आला कुठून?

दरम्यान, निवडणुकांमध्ये इतका पैसा खर्च करण्यासाठी पैसा आला कुठून? असा सवाल यावेळी राज ठाकरेंनी विचारला. ‘नोटबंदीनंतर वर्षभरातच दिल्लीतलं भाजपचं सेव्हन स्टार कार्यालय उभं राहिलं. त्याआधी देशात अनेक ठिकाणी जमिनींच्या खरेदीचे व्यवहार झाले. अनेक राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपनं वापरलेला पैसा आला कुठून? पोलिसांच्या देखत हे पैसे वाटत आहेत. पण पोलीस काय करणार? कारण तक्रार केली आणि नोकरी गेली तर काय करणार?’ असंही ते म्हणाले.

‘सोशल मीडिया त्यांचाही बाप निघाला’

तुमच्यापर्यंत काही पोहोचूच दिलं जात नाही. पण सोशल मीडिया यांचाही बाप निघाला. त्यानं सगळं तुमच्या घराघरांत पोहोचवलं. मोदी आश्वासनांवर बोलत नाहीत. पण पुलवामाबद्दल बोलतायत. त्यावर मतं मागतायत. तुमच्या निवडणुकांच्या राजकारणासाठी तुम्ही ही गोष्ट घडवली का? मी कल्याणमध्ये बोलताना पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की २०१९च्या निवडणुकांपूर्वी मोदी युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण करतील. तसंच झालं.

इथे पाहा संपूर्ण सभा!

#Live : सातारा येथून राज ठाकरे यांची जाहीर सभा

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಬುಧವಾರ, ಏಪ್ರಿಲ್ 17, 2019

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -