उदयनराजे-रामराजे वाद पेटला; साताऱ्यात रामराजेंच्या पुतळ्याचे दहन

Satara
raje pratishthan fires symbolic statue of ramraje naik nimbalkar at satara
रामराजे निंबाळकर यांच्या पुतळ्याचे साताऱ्यात दहन

सातार्‍याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले, माढ्याचे भाजप खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर
आणि माण-खटावचे काँग्रेस आमदार जयकुमार गोरे यांनी दोन दिवसांपूर्वी सातार्‍यात संयुक्त पत्रकार परिषद घेवून रामराजेंवर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देण्यात आले होते. त्यानंतर सातार्‍यातील राजे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते प्रक्षुब्ध झाले. त्यांनी भर दुपारी सातारा शहरातील पोवई नाका येथे रामराजेंनी केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. तसेच घोषणाबाजी करून पळ काढला.

हे वाचा – तर रामराजेंची जीभ हासडली असती, उदयनराजेंचा राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर संताप

उदयनराजे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये विधानपरिषदेचे सभापती रामराजे यांच्यावर बोचरी टीका करून शासकीय पाणी वाटप आदेशाला रामराजें यांच्या पूर्वीच्या धोरणांना जबाबदार धरले होते. त्याला रामराजेंनी काल फलटण येथे पत्रकार परिषद घेत या तिघांवरही त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले होते. तसेच सातारच्या छत्रपती घराण्याबद्दलही अपशब्द काढले होते. त्याला काही प्रसारमाध्यमांनी चांगलीच प्रसिद्धी दिली. त्यामुळे कालपासूनच सातारा जिल्ह्यासह माढा लोकसभा मतदारसंघातही रामराजेंविरोधात उदयनराजेंच्या समर्थकांनी निषेध म्हणून रामराजेंचा पुतळा जाळला. पोवई नाका येथे नेहमी पोलीस बंदोबस्त असतो. पण, दुपारच्या वेळी पोलीस त्याठिकाणी नाहीत हे पाहून हा पुतळा जाळण्याचा कार्यक्रम राजे प्रतिष्ठान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आयोजित केला होता.

 

याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात तणाव निर्माण झाला आहे. नीरा कालवा पाणी वाटप प्रश्न चांगलाच गाजत असून सामान्य सातरकरांना कोणाची बाजू घ्यावी? असा प्रश्न पडला आहे.