CoronaVirus : पुण्या-मुंबईतून येणाऱ्यांकडे संशयानं पाहू नका – राजेश टोपे

Mumbai
Health Minister Rajesh Tope Corona
आरोग्य मंत्री राजेश टोपे

राज्यात करोनाग्रस्त रुग्णांची संख्या शंभरीपार झालेली असताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्याला उद्देशून आज दुपारी फेसबुक लाइव्ह केलं. यामध्ये त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई किंवा पुण्यामधून गावी जाणाऱ्या किंवा गावात येणाऱ्या लोकांकडे संशयानं पाहू नका, असं आवाहन त्यांनी केलं. त्याशिवाय, उद्याच्या पाडव्याच्या निमित्ताने घरात राहण्याचा संकल्प करून करोनाला हरवुयात, असं देखील आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केलं.

‘त्यांच्याकडे माणुसकीने पाहा’

मुंबई आणि पुण्यामध्ये करोनाचे रुग्ण काही प्रमाणात आढळले आहेत. मात्र, यामुळे मुंबई-पुण्यातून गावी जाणाऱ्या लोकांकडे गावकरी संशयाने पाहातात, त्यांना चांगली वागणूक देत नाहीत अशा काही घटना समोर आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर राजेश टोपेंनी ग्रामीण भागातल्या जनतेला आवाहन केलं आहे. ‘ग्रामीण भागात मुंबई-पुण्यातून लोकं गावी आले, याचा अर्थ त्यांना करोना झालाय असा होत नाही. त्यांच्याकडे माणुसकीच्या नजरेतून पाहायला हवं. फक्त लक्ष असू द्या. त्यांना काही लक्षणं आढळली, तर डॉक्टरांकडे नेण्याची व्यवस्था करावी. बाहेरून गावात येणाऱ्या लोकांनी देखील सोशल डिस्टन्सिंग ठेवावी’, असं राजेश टोपे म्हणाले.

पाडव्याचा संकल्प करा!

दरम्यान, यावेळी पुन्हा एकदा राजेश टोपेंनी लोकांना घराबाहेर न पडता घरातच थांबण्याचं आवाहन केलं. ‘शहरांमध्ये भाजीपाला, किराणाच्या दुकानांमध्ये मोठी गर्दी होत आहे. सरकारच्या संचारबंदीच्या नियमाचं पालन होत नाही. ते व्हायला हवं. लोकांना वस्तू सहज मिळाव्यात, यासाठी प्रशासनाने देखील काळजी घ्यावी’, असं ते म्हणाले. शिवाय, ‘पाडव्याच्या निमित्ताने आपण असा संकल्प करू की सगळे घरी थांबुयात आणि करोनाला हारवुयात… करोना इतक्या सहज पद्धतीने घेण्यासारखा विषय नाही. तरूण मंडळी गाड्यांवरून फिरताना दिसतायत, करोनाची मस्करी करताना दिसतायत’, असं देखील ते म्हणाले.


Coronavirus – करोनाच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा, नागरिकांना दिलासा!

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here