ऊस दरासाठी राजू शेट्टींचा ११ तारखेला चक्का जाम

Mumbai
पत्रकार परिषदेत बोलताना खासदार राजू शेट्टी

ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एल्गार पुकारला आहे. सरकारविरोधात ११ नोव्हेंबर रोजी ऊस पट्ट्यात चक्काजाम करुन बंद पुकारण्याची घोषणा खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. शेतकर्‍यांसाठी तिजोरी खाली करण्याची घोषणा करणार्‍या मुख्यमंत्र्यांचे घोडे कुठे अडले आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. सांगलीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शेट्टी यांनी मुख्यमंत्री, महसूल मंत्री यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोल्हापुरात ऊस उत्पादक शेतकर्‍यांसाठी सरकारची तिजोरी खाली करू, अशी घोषणा केली होती. मग आता एफआरपी अधिक २०० रुपये शेतकर्‍यांना द्यायला कशाची अडचण आहे. मुख्यमंत्र्यांचे घोडे कोठे अडले आहे? असा सवाल त्यांनी केला. ऊसदराच्या प्रश्नावर दिल्लीला जायची मुख्यमंत्र्यांची हिम्मत नाही? की त्यांना दिल्लीत किंमत नाही? असा टोला शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

गत हंगामातील शेतकर्‍यांची अजून कारखानदारांकडे थकबाकी आहे. तेही अद्याप कारखानदारांनी दिलेली नाहीत. कारखानदारांनी खुलेआमपणे कायदा मोडला आहे. त्यांच्यावर सरकार कारवाई का करत नाही? त्यामुळे बेकायदेशीरपणे वागणार्‍या कारखानदारांना सरकार पाठीशी घालत आहे का? असा प्रश्न यावेळी राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे. मध्यस्थी करणारे चंद्रकांत पाटील आता कोठे आहेत? थकबाकी मिळवून देण्याची जबाबदारी त्यांची होती. पण ती त्यांनी पूर्ण केली नाही. त्यामुळे आता सरकारला चर्चा करायची असल्यास चंद्रकांत पाटील यांची मध्यस्थी नको. मुख्यमंत्र्यांनी दुसरा माणूस नियुक्त करावा, अशी मागणी त्यांनी केली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here