पाच दिवसांच्या आठवड्यावरून राजू शेट्टी नाराज

नितेश राणेंची सरकारवर टीका

Raju shetty
राजू शेट्टी

राज्य सरकारी कर्मचार्‍यांसाठी ठाकरे सरकार ५ दिवसांचा आठवडा गिफ्ट दिला असला तरी यावरुन विरोधकांनी टीकास्त्र सोडले आहे. भाजपा आमदार नितेश राणे यांनी यावरुन कर्मचार्‍यांच्या कामाची गुणवत्ता याचे मोजमाप कधी होणार? असा प्रश्न उपस्थित केला आहे. तर तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.

याबाबत नितेश राणेंनी ट्विट करुन म्हटले की, मंत्रालयाच्या कामकाजात कामाची वेळ नव्हे तर गुणवत्ता पाहिजे. मग आठवडा ५ दिवसांचा असो किंवा ७ दिवसांचा, याचे मोजमाप कधी होणार?

गेल्या अनेक वर्षापासून राज्य शासकीय कर्मचारी संघटनेकडून ५ दिवसांचा आठवडा करावा ही मागणी लावून धरली होती. केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील कर्मचार्‍यांना ५ दिवसांचा आठवडा करावा असं कर्मचार्‍यांचे म्हणणे होते. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने बुधवारच्या बैठकीत कर्मचार्‍यांची मागणी मान्य करुन राज्य सरकारी कर्मचार्‍यांसाठी हा निर्णय घेतला आहे.

या निर्णयामुळे शासकीय कर्मचार्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. ठाकरे सरकारने घेतलेल्या या निर्णयावर राज्यातील मंत्रिमंडळातील सदस्य बच्चू कडू यांनी जाहीर विरोध केला. सरकारी कामासाठी लोकांना वारंवार अधिकार्‍यांकडे फेरे मारावे लागतात. काही कर्मचारी प्रामाणिकपणे काम करतात. पण काहीजण सरकारी वेळेतही काम करत नाही. मग अशा कर्मचार्‍यांना ५ दिवसांचा आठवडा कशासाठी? असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच सरकारला जर ५ दिवसांचा आठवडा करायचा असेल तर कर्मचार्‍यांना ७ दिवसांचा पगार का दिला जातो? असंही त्यांनी म्हटले आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनीही या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे पगारवाढ अन् दुसरीकडे सुट्ट्यांमध्ये वाढ, सरकारच्या मनात नेमकं चाललंय काय? असा सवाल त्यांनी केला आहे. सध्या केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी 5 दिवसांचाच आठवडा आहे. तर, देशातील 7 राज्यांमधील कर्मचार्‍यांनाही 5 दिवसांचा आठवडा असून 2 दिवस सुट्टीचा लाभ मिळत आहेत. त्याच, पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनेही हा निर्णय घेतला. त्यामुळे सरकारी कर्मचार्‍यांचा विकेंड कुटुंबासमवेत आनंदी जाणार आहे.