घरमहाराष्ट्रनाशिकराजू शेट्टी आघाडीत आल्याने अधिक बळ मिळेल - छगन भुजबळ

राजू शेट्टी आघाडीत आल्याने अधिक बळ मिळेल – छगन भुजबळ

Subscribe

विरोधी सरकारला घालविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीतसोबत आल्याने आघाडीला अधिक बळ मिळेल, असे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

गेल्या पाच वर्षाच्या काळात देशातील शेतकऱ्यांची पूर्ण वाताहत झाली असून कर्जमाफी, शेतमाल हमीभाव यासह सर्वच पातळ्यावर सरकार अपयशी ठरले असून या शेतकरी विरोधी सरकारला घालविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीतसोबत आल्याने आघाडीला अधिक बळ मिळेल, असे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज, शनिवारी नाशिक येथे छगन भुजबळ यांची त्यांच्या कार्यालयात सदीच्छा भेट घेतली. भेटीनंतर पत्रकारांशी ते बोलत होते.

भुजबळांनी भाजपवर केली टीका 

यावेळी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार माजी खासदार समीर भुजबळ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले,माजी खासदार देविदास पिंगळे माजी आमदार जयवंतराव जाधव, जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, गजानन शेलार, निवृत्ती अरिंगळे यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. या भेटीनंतर छगन भुजबळ म्हणाले की, सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महागाई, नोटबंदी, जीएसटी या सर्वांचा परिणाम देशातील शेतकऱ्यांवर झाला आहे. परिणामी शेतीसाठी लागणाऱ्या सर्व उत्पादनाचे भाव वाढल्याने शेतकऱ्याला शेती करणे अत्यंत कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची वाताहात झाली आहे. नाशिक जिल्ह्यासारख्या शेतकरी सदन असलेल्या जिल्ह्यात देखील आता शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे. ही चिंतेची बाब आहे.

- Advertisement -

भाजप या हुकूमशाही सरकारला पराभूत करू 

नुकतीच सरकारने शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान निधी योजना जाहीर केली त्यातून शेतकऱ्यांना मदत मिळाली आणि काही तासांतच काढून घेण्यात आली त्यामुळे ही योजना म्हणजे सन्मान योजना नव्हे तर अपमान योजना झाली असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. त्यामुळे या शेतकरी विरोधी सरकारला सत्तेतून पायउतार करण्यासाठी राजू शेट्टी आघाडीत आल्याने आघाडीला आणखी जोर मिळेल, असे भुजबळ यांनी यावेळी सांगितले. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी म्हणाले की, शेतकरी विरोधी धोरण असलेल्या भाजप या हुकूमशाही सरकारला पराभूत करून गाडायचे आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी पक्ष आघाडीसोबत आला असून आघाडीकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला हातकनगले मतदार संघाची एक जागा निश्चित करण्यात आली असून वर्धा किंवा सांगली या दोन्ही जागांपैकी एक जागेबाबत चर्चा सुरु असून दोन दिवसात त्या जागेचा प्रश्न देखील निकाली लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -