घरमहाराष्ट्रराजे, तुम्ही गेलात तर जनसामन्यांचा कुणी वाली राहणार नाही - राजू शेट्टी

राजे, तुम्ही गेलात तर जनसामन्यांचा कुणी वाली राहणार नाही – राजू शेट्टी

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उदयनराजे भोसले भाजपच्या वाटेवर आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. दरम्यान, उदयनराजेंनी भाजपात प्रवेश करु नये यासाठी विरोधी पक्षांकडून त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी उदयनराजेंची भेट घेतली.

‘छत्रपती उदयनराजे हे विरोधकांमधील महत्त्वाची ताकद आहेत. याशिवाय राजे तुम्ही गेलात तर शेतकरी, कष्टकरी आणि जनसामान्यांचा कुणी वालीच राहणार नाही’, असे शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी म्हणाले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे मोठमोठे नेते पक्षांतर करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून साताऱ्याचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले देखील भाजपात प्रवेश करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांकडून उदयनराजेंची मनधरणी करण्याचे काम सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते अमोल कोल्हे यांनी उदयनराजेंची भेट घेऊन यासंदर्भात बंद दरवाज्याआड चर्चा केली होती. त्यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देताना अमोल कोल्हे ‘मावळा छत्रपतींना फक्त विनंती करु शकतो’, असे म्हणाले होते. त्यानंतर आज म्हणजे बुधवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी उदयनराजे यांच्या साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहात भेट घेऊन त्यांच्याशी बंद दरवाज्या आड चर्चा केली. राजू शेट्टी यांनी देखील त्यांना पक्ष सोडून न जाण्याची विनंती केली. उदयनराजे आज विरोधकांमधील महत्त्वाची ताकद आहेत, अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी माध्यांना दिली.


हेही वाचा – उदयनराजे, रामराजे करणार भाजप प्रवेश

- Advertisement -

 

नेमके काय म्हणाले राजू शेट्टी?

उदयनराजे यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर राजू शेट्टी पत्रकार परिषदेत म्हणाले की, ‘मी लोकसभा निवडणूक पराभूत झाल्यावर उदयनराजेंना फार वाईट वाटले होते. मला भेटून चर्चा करायची आहे, असे मत त्यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केले होते. आजच्या भेटीत संसदेतील अनुभव एकमेकांशी शेअर केले. काही दिवसांपासून उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाच्या उलट-सुलट चर्चा सुरु आहेत. या विषयावर उदयनराजेंशी चर्चा केली. उदयनराजेंसारखे जनसामान्यांत स्थान असलेले नेते भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेऊ लागले तर जनसामान्यांचा कुणी वाली राहणार नाही. सध्याच्या परिस्थितीत उदयनराजेंची विरोधी पक्षांना खरी गरज आहे.’ दरम्यान, भाजप प्रवेशावर उदयनराजेंना प्रश्न विचारला असता, ‘यावर अद्यापही मी कोणताही निर्णय घेतलेला नाही’, अशी प्रतिक्रिया उदयनराजेंनी दिली. त्यामुळे आता कठीण परिस्थितीत उदयनराजे आपल्या पक्षासाठी उभे राहतात का? की भाजपमध्ये प्रवेश करतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

- Advertisement -

हेही वाचा – मनाला पटेल तोच निर्णय घेईन – उदयनराजे भोसले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -