पोलिसांच्या बदल्यांना पुन्हा मुदतवाढ आता ३० सप्टेंबरची तारीख

Advertisement

राज्यातल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या बदल्यांसाठी ‘तारीख पे तारीख’, अशा पद्धतीने मुदतवाढ दिली जात आहे. नव्या निर्णयानुसार आता बदल्यांसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याआधी ही तारीख ५ सप्टेंबरपर्यंत होती. कोरोनाची साथ सुरू झाल्यापासून दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात होणार्‍या बदल्या यावर्षी प्रलंबित राहिल्या होत्या. त्यासाठी एकामागोमाग मुदतवाढ दिली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारच्या मार्फत पोलिसांच्या होणार्‍या बदल्यांवर विरोधकांकडून मोठ्या प्रमाणावर टीका केली जात असताना राज्य सरकारने पुन्हा एकदा बदल्यांना मुदतवाढ दिल्यामुळे या प्रकरणावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र, असं असलं, तरी राज्य सरकार बदल्या करणारच, अशी स्पष्ट भूमिका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जाहीर केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात बदल्यांना ३१ मार्चपर्यंत स्थगिती आणण्यात आली होती. त्यानंतर ही स्थगिती उठवून ३१ जुलैपर्यंत १५ टक्के बदल्या करण्याला मान्यता देण्यात आली. त्याला १० ऑगस्टपर्यंत पहिली मुदतवाढ दिली गेली. ती वाढवून पुन्हा १५ ऑगस्ट करण्यात आली. १५ ऑगस्टची मुदत ५ सप्टेंबर केली गेली आणि आता ५ सप्टेंबरवरूनही ही मुदतवाढ ३० सप्टेंबरपर्यंत करण्यात आली आहे.