नगरसेविकेच्या लेटर बॉम्बमुळे दिलीप वळसे पाटलांची उचलबांगडी?

Mumbai
Dilip Walse Patil and Jitendra Awhad
उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड

सोलापूरमध्ये पालकमंत्री म्हणून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची वर्णी लागण्यामागे खुद्द सोलापूर जिल्हा कॉंग्रेसची बंडाळी हे कारण असल्याचे कारण आता समोर आले आहे. दिलीप वळसे पाटील यांच्याकडून तडकाफडकी जिल्ह्याचे पालकमंत्रीपद काढून घेण्यामागे कॉंग्रेसच्या नगरसेविकेचा लेटर बॉम्ब कारणीभूत ठरला आहे. थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याकडे निवेदन पाठवत त्यांनी पालकमंत्री हटावची मागणी केल्यामुळेच ही मोठी खांदेपालट झाली आहे, अशी चर्चा अता सुरु आहे.

सोलापूर दौऱ्यावर आल्यास प्रशासकीय यंत्रणेवर ताण पडेल म्हणून दिलीप वळसे पाटील यांनी सोलापूर दौरा करणे टाळले होते. दौरा करण्याऐवजी त्यांनी थेट व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना सूचना देणे पसंत केले. त्यामुळेच सोलापुरात पालकमंत्र्यांविरोधातली नाराजी वाढत होती. लॉकडाऊनच्या काळात सोलापूरात यंत्रणांचा असणारा अभाव यामुळे जनसामान्यांना जीवनावश्यक गोष्टींसाठीही संघर्ष करावा लागत आहे. या परिस्थितीत पालकमंत्री कुठेच दिसत नाहीत. याच मुद्द्यावर नेमके बोट ठेवत कॉंग्रेसच्या नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी सहकारी पक्षाच्याच पालकमंत्री हटावची मागणी केली.

पालकमंत्री नियमित बैठका घेत नाहीत, याचा ठपका ठेवत त्यांनी ही मागणी केली होती. पालकमंत्री जिल्ह्याची काळजी घेण्याऐवजी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत आहेत. आरोग्य मंत्री राजेश टोपे तसेच गृहमंत्री अनिल देशमुख स्वतः बाहेर पडून काम करत आहेत. पण सोलापूरचे पालकमंत्री मात्र घरात बसूनच प्रशासनाला आदेश देत आहेत. सोलापूर शहरातले बंद झालेले व्यवहार तसेच सर्वसामान्यांचे दैनंदिन गोष्टी खरेदी करण्यासाठी होणारे हाल पाहता त्यांनी या सगळ्या मुद्दयांना आपल्या निवेदनातून वाचा फोडली होती. पण आता जितेंद्र आव्हाड यांची वर्णी लागल्यानंतर धाडसी पालकमंत्री मिळाल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले आहे.

खुद्द वळसे पाटली यांना नको होते पालकमंत्रीपद

सोलापूरच्या पालकमंत्री पदातून मुक्त करावे, अशी मागणी खुद्द दिलीप वळसे पाटील यांनीही शरद पवार यांच्याकडे केली होती. वळसे पाटील यांच्याकडे असणाऱ्या कामगार आणि राज्य उत्पादन शुल्क या खात्याच्या कार्यभारामुळे सोलापूरसाठी वेळ देता येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. पण कोरोनासारख्या संकटाच्या काळात त्यांच्याकडून पालकमंत्रीपद काढण्यात आल्याने आता राजकीय चर्चांना वेग आला आहे.

सोलापूर कॉंग्रेस मात्र गॅसवर

सोलापूरच्या नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी मुख्यमंत्री आणि शरद पवार यांना दिलेल्या निवेदनात भाजप आमदार विजय देशमुख आणि भाजप नेते लक्ष्मण ढोबळे यांचे कौतुक केले आहे. सोलापूरात काही वर्षांपूर्वी दंगल झाली होती, तेव्हा कर्फ्यू लागला होता. विजयसिंह मोहिते पाटील यांनी सोलापुरात ठाण मांडून परिस्थिती हाताळली होती. दिलीप सोपल, लक्ष्मणराव ढोबळे यांनी अतिशय कठीण काळात चांगले काम केले, असेही कौतुक त्यांनी निवेदनात केले आहे. याआधी महापालिकेच्या सभागृहाला कुलुप लावण्याच्या प्रकरणात कॉंग्रेसने साथ न दिल्यामुळे फुलारे यांनी आपला राजीनामा पक्षाकडे सुपुर्द केला आहे. मात्र तो अद्याप स्विकारण्यात आलेला नाही.