बंडखोरीचे वादळ, युतीला बंडाचा सर्वाधिक फटका

Mumbai
नवी मुंबई येथील संतप्त शिवसैनिक

राज्याच्या १३ व्या विधानसभेसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीत उमेदवारी न मिळालेल्या सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी बंडाचे निशाण उभारले असून राज्यभरात निर्माण झालेल्या बंडोबांच्या आव्हानाने सगळ्याच पक्षांचे नेते हबकले आहेत. या उदंड झालेल्या बंडोबांना थंड कसे करायचे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. बंडोबांची सर्वाधिक लागण भाजप-शिवसेना युतीला झाली असून एकमेकांविरोधात दंड थोपटण्यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी या उमेदवारांना ‘बळ’ दिल्याचे बोलले जात आहे.

युतीतील या संकटाने दोन्ही पक्षात अस्वस्थता निर्माण झाली असताना काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतही काही आलबेल नाही. तिथेही बंडोबांना आवर घालताना नेत्यांच्या नाकी नऊ येत आहेत. युती आणि आघाडातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर होताच बहुतांश ठिकाणी बंडखोरांनी डोकी वर काढल्यामुळे नेत्यांच्या डोक्यावरून पाणी जाऊ लागले आहे.

अनेक वर्षे शिवसेनेच्या ताब्यात असलेला वडाळा मतदारसंघ नव्याने भाजपच्या वाट्याला गेल्याने सेनेच्या माजी महापौर श्रध्दा जाधव यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे.

या मतदारसंघातून तयारी करण्याच्या सूचना जाधव यांना ‘मातोश्री’तूनच देण्यात आल्या होत्या. हाता कालिदास कोळंबकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसैनिकांनी काम न करण्याचा इशारा दिला आहे. मुंबादेवी ते कुलाबा विधानसभा मतदारसंघात गेली सहा टर्म निवडून येणारे राज पुरोहित यांचा पत्ता कापून कुलाब्याची जागा रामराजे निंबाळकर यांचे जावई राहुल नार्वेकर यांना देण्याचा घाट घातला जात आहे. विशेष म्हणजे मंगलप्रभात लोढा आणि स्वत: मुख्यमंत्रीच यामागे असल्याची चर्चा आहे. या निर्णयाविरोधात राज पुरोहित यांनी महाराष्ट्राचे प्रभारी केशव प्रसाद मोर्या यांच्याकडे तक्रार केल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र मुख्यमंत्र्यांविरोधात ब्र काढण्याची हिंमत स्वत: मोर्या यांच्याकडे नाही. यामुळे राज यांच्या उमेदवारीचे नक्की काय होईल, हे कोणीही सांगू शकत नाही.

कोकणातही युतीत मारामारी आहे. सेनेकडे नव्याने दाखल झालेले भास्कर जाधव यांना परंपरेने भाजपकडे असलेली गुहागरची जागा देण्यात आली आहे. याच जाधव यांच्या विरोधात भाजपने विनय नातू यांना तयारी करण्याचे संकेत दिले होते. नातू यांच्या मागे ताकदीने उभे राहण्याचा शब्द विनोद तावडे आणि अशिष शेलार यांनी दिला होता. मात्र आता ही जागा सेनेकडे गेल्याने नातू चांगलेच भडकले आहेत. त्यांनी ताकद दाखवण्याचा इरादा उघडपणे बोलून दाखवला आहे. नातू यांची ही तयारी भाजप नेत्यांच्या उघड चिथावणीमुळेच सुरू असल्याचा आरोप भास्कर जाधव यांचे समर्थक करत आहेत. माजी मुख्यमंत्री नारायण राणे भाजप प्रवेशासाठी कित्येक दिवसांपासून तिष्ठत आहेत. सेनेच्या विरोधामुळे राणे यांचा भाजप प्रवेश लांबला आहे.

आता हा प्रवेश होण्याऐवजी मित्रपक्ष म्हणून उमेदवारी देण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. नितेश यांचे सेनेबरोबरील हाडवैर लक्षात घेऊन त्यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्याची तयारी सेनेच्या स्थानिक नेतृत्वाने सुरू केली आहे. दापोली-मंडणगडमधून मंत्री रामदास कदम यांचे पुत्र योगेश यांना सेनेने उमेदवारी दिली आहे. या संघात शिवसेनेला भाजपहून स्वपक्षाच्या विरोधाला तोंड द्यावे लागणार आहे. सेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते यांच्या विरोधाला कदमपुत्राला तोंड द्यावे लागणार आहे. दळवी यांनी कदम यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तर लोकसभेच्या निवडणुकीच्या पराभवाला रामदास कदम हेच कारणीभूत असल्याचा आरोप गिते यांच्या समर्थकांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीला सामोरे जाणे योगेश यांना जिकरीचे आहे.

उरण मतदारसंघात सेनेचे मनोहर भोईर हे विद्यमान आमदार आहेत. भोईर यांची उमेदवारी जाहीर होताच भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश बालदी यांनी उमेदवारी दाखल केली आहे. बालदी हे नितीन गडकरी यांचे उजवे हात समजले जातात. उरण आणि पनवेल येथे आयोजलेल्या अनेक कार्यक्रमात बालदी यांची भावी आमदार म्हणून स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच ओळख करून दिली होती. बालदी यांच्या उमेदवारीमागे फडणवीस असल्याचा आक्षेप शिवसेनेचे पदाधिकारी घेत आहेत. आघाडीची या मतदारसंघातील जागा शेकापकडे आहे. मात्र काँग्रेसचा परंपरागत विरोध लक्षात घेत काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी श्रुती श्याम म्हात्रे यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे.

कल्याण पश्चिम हा भाजपचा परंपरागत मतदारसंघ शिवसेनेला सोडण्याविरोधात आता भाजपचे कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले आहेत. कल्याण पश्चिमेतील सर्व भाजप नगरसेवक आणि पदाधिकार्‍यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. कल्याण पश्चिम मतदारसंघावरून गेल्या काही दिवसांपासून वातावरण चांगलेच तापले आहे. नरेंद्र पवार हे २०१४ च्या निवडणुकीत भाजपमधून निवडून आले होते. ही जागा सेनेला बहाल करण्यात आली आहे. विश्वनाथ भोईर यांची उमेदवारीही सेनेने कल्याणमधून जाहीर केली आहे. या उमेदवारी विरोधात बंड करण्याचा पवित्रा केवळ भाजप नेत्यांच्या आग्रहावरून घेण्यात आल्याची चर्चा आहे.

ठाणे जिल्ह्यातील ऐरोली आणि बेलापूर विधानसभा जागांच्या उमेदवारीवरून सुरुवातीपासूनच हाणामारी सुरू होती. बेलापूरहून उमेदवारी देण्याचा शब्द पक्षाने पाळला नाही, असा आक्षेप नोंदवत त्याविरोधात ऐरोलीची उमेदवारी गणेश नाईकांचे पुत्र संदीप यांनी न लढवण्याचा इशारा दिला. वडिलांसाठी काहीपण करण्याचा इरादा व्यक्त करत वडिलांना उमेदवारी देण्यास भाग पाडले आहे. यामुळे बेलापूरच्या मंदा म्हात्रे यांच्या जागेचे काय होणार असा प्रश्न त्या पक्षापुढे निर्माण झाला आहे.

तिकडे मराठवाड्यात नांदेडच्या लोहा मतदारसंघ शिवसेनेला सोडल्याने खासदार प्रताप पाटील चिखलीकर नाराज झालेत. मुलगा प्रवीणसाठी खासदार प्रयत्नशील होते. मात्र गेल्या निवडणुकीत शिवसेनेचा आमदार असताना चिखलीकरांनी बंड केल्यामुळे शिवसेनेने ही जागा प्रतिष्ठेची केली होती. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांसारखा तगडा उमेदवार पाडूनही पक्षाने लोहा शिवसेनेला सोडल्यामुळे चिखलीकरांचे कार्यकर्ते नाराज आहेत. या संघात बंडाचा झेंडा उभारला जाईल, असे एकूण चित्र आहे.

याच जिल्ह्यात हदगावमध्ये शिवसेनेत जोरदार बंडखोरी उफाळली आहे. विद्यमान आमदार नागेश पाटील यांना पक्षाने पुन्हा उमेदवारी दिल्याने ही बंडाळी उफाळली आहे. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाबुराव कदम यांना उमेदवारी द्यावी अशी कार्यकर्त्यांची मागणी होती. मात्र पक्षाने विद्यमान आमदार नागेश पाटील आष्टीकर यांना उमेदवारी दिली. पाटील यांच्या विरोधात सेनेतूनच बंडखोरी होईल, असे चित्र आहे. या घटनेच्या निषेधार्थ हदगाव हिमायतनगर तालुक्यात शिवसैनिकांनी जागोजागी बंद पुकारला. आपल्याकडे पैसे नसल्याने आपणास उमेदवारी दिली नसल्याचा आरोप कदम यांनी केला आहे.

पुण्यात भाजपच्या तीन विद्यमान आमदारांचा पत्ता कापला गेला आहे, तर एकूण चार नवीन चेहरे पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. कोथरूडमधून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यावरून पक्षात जोरदार हंगामा झाला. विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांचा रुद्रावतार पाहून पाटीलही हबकले होते. अखेर कुलकर्णी यांची विधान परिषदेवर वर्णी लावण्याची तयारी दर्शवत बंड शमवण्यात आले.

भोसरी भाजप-शिवसेनेच्या उमेदवारांची घोषणा होताच एकच खळबळ उडाली. भोसरी विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे असताना तो भाजपला सोडण्यात आला. भोसरी विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेने दावा केला होता. मात्र, शिवसेनेच्या कोणत्याही पदाधिकार्‍याला विश्वासात न घेता किंवा चर्चा न करता मतदारसंघ भाजपला सोडण्यात आला. यामुळे नाराज झालेल्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीत पदाधिकार्‍यांमध्ये जोरदार हमरी-तुमरी झाली. त्याचे रुपांतर हाणामारीत होऊन एका पदाधिकार्‍याने महिला पदाधिकार्‍याच्या कानाखाली लगावली. त्यामुळे दोन्ही पदाधिकार्‍यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. अखेर हे प्रकरण निगडी पोलीस ठाण्यात पोहचले. या ठिकाणी दोन्ही पदाधिकार्‍यांनी गर्दी केली होती.

नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात भाजपने विद्यमान आमदार सुधाकर कोहळे यांचे तिकीट कापण्यात आले. तिकीट कापल्यानंतर आमदार कोहळे यांचे समर्थक तीव्र संतप्त झाले आहेत. माझे काय चुकले हे सांगावे, आता कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढची वाटचाल ठरवणार असल्याची प्रतिक्रिया कोहळे यांनी दिली आहे. कोहळे यांच्या प्रतिक्रियेतून बंडखोरीचे संकेत मिळत आहे. कोहळे यांच्या घरासमोर समर्थक कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. तर तिकडे दक्षिण नागपूरमधून उमेदवारी मिळालेल्या मोहन मते यांच्या कार्यालयासमोर जल्लोष सुरू होता.

नागपूरमधील 12 जागापैकी 9 जागांवरील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. नागपूर मध्यमधून विद्यमान आमदार विकास कुंभारे यांना उमेदवारी देण्यात आली असून भाजपा शहराध्यक्ष प्रवीण दटके यांना डावलण्यात आले आहे. यामुळे भाजपा कार्यकर्ते नाराज असल्याचे स्पष्ट झाले आहे. 21 व्या शतकाच्या गोष्टी करतो आणि आपणच जातीवर उमेदवार उभे करतो असा प्रश्न एका बॅनरद्वारे कार्यकर्त्यांनी भाजप नेत्यांना केला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेल्यावरून भाजप कार्यकर्ते सामूहिक राजीनाम्याच्या तयारीत आहेत. भाजप इच्छुक उमेदवार प्रा. अतुल देशकर यांना अपक्ष उमेदवारी लढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामागेही मुख्यमंत्र्यांची फूस असल्याचा आरोप होऊ लागला आहे. फडणवीस यांनी गोंदियाच्या तिरोडा मतदारसंघाच्या बदल्यात ब्रह्मपुरीचा बळी घेतल्याची भाजप कार्यकर्त्यांचा आरोप आहे. आता तेच मुख्यमंत्री अपक्ष उमेदवारीचा अनाहुत सल्ला देत असल्याचा आक्षेप घेतला जातोय. औसा हा मतदारसंघ अभिमन्यू पवार यांच्या गावचा.

पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पी.ए. खास बाब म्हणून पवार यांना उमेदवारी देण्यास मुख्यमंत्र्यांनी भाग पाडल्याने विद्यमान मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे बंधू अरविंद पाटील चांगलेच संतापले आहेत. जाहीर झालेल्या या उमेदवारीविरोधात काल औसात जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. शिवाय रस्तेही रोखण्यात आले.

संभाव्य बंडखोर

कुलाबा : राज पुरोहित – राहुल नार्वेकर
वडाळा : कालिदास कोळंबकर – श्रध्दा जाधव
गुहागर : भास्कर जाधव – विनय नातू
देवगड : नितेश राणे – शिवसेना
दापोली : योगेश कदम – शिवसेना
उरण : मनोहर भोईर – महेश बालदी
उरण : विवेक पाटील – श्रुती म्हात्रे
कल्याण : विश्वनाथ भोईर – नरेंद्र पवार
ऐरोली : गणेश नाईक – विजय चौगुले
लोहा : शिवसेना – प्रवीण चिखलीकर
हदगाव : नागेश पाटील – शिवसैनिक
कोथरूड : चंद्रकांत पाटील – मेधा कुलकर्णी
भोसरी : महेश लांडगे – शिवसेना
नागपूर(द): मोहन मते – सुधाकर कोहळे
नागपूर (म) : विकास कुंभारे – प्रवीण दटके
ब्रम्हपुरी : शिवसेना – प्रा. अतुल देशकर
औसा : अभिमन्यू पवार – अरविंद पाटील निलंगेकर